मणिपूर दंग्यांच्या सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विश्लेषणाचे प्रमुख पैलू ...
कुकी- मैतेई दंग्याशी ७ दशकांच्या हिंदुत्व प्रसाराचा, भाजप, संघ आणि केंद्र सरकारचा नेमका संबंध काय?
(०६-मणिपुरच्या अशांततेवरील लेखमालेतील सहावा लेख )
(ICRR - Assam & North East)
भारतातल्या धार्मिक- जातीय, वांशिक हिंसाचाराची वस्तुस्थिती...
भारतात ब्रिटिश काळापासून धार्मिक दंग्यांचा मोठा इतिहास आहे. यात काही प्रमाणात दोन जातींच्या संघर्षाच्या घटनाही घडत असतात. काही जाती समूहांची सशस्त्र संघटना आणि तिने केलेली हत्याकांडे यांचाही समावेश आहे. नॉर्थ ईस्ट भारतात दोन ट्राईबच्या सशस्त्र टोळ्यांनी एकमेकांची गावे जाळली, सामूहिक हत्याकांडे केली अशा घटनाही घडत आलेल्या आहेत. या लेखमालेच्या दुसऱ्या लेखात आपण १९९३ ला एनएससीएन- इसाक, मुईवा या नागा अतिरेकी गटाने कुकींचा केलेला नरसंहार, जो "जौदे हत्याकांड" (Joude Massacre ) नावाने ओळखला जातो त्याच्यावर नजर टाकली होती. या हत्याकांडात शेकडो कुकी मारले गेले आणि ३५० कुकी गावे नागांनी उध्वस्त करून बळकावली, १९९२ ते ९७ या ५ वर्षात नागांनी सुमारे ३५०० कुकी मारून शेकडो गावे प्रस्तावित "ग्रेटर नागालँड" ला जोडली असा आरोप कुकी नेहमी करत असतात.
मध्य बिहारमध्ये १९७७ ते २००१ या काळात जमीनदार विरुद्ध मागास जाती यांनी एकमेकांची ९० हत्याकांडे केली यात जेहानाबाद , लक्ष्मणपूर- बाथे आणि दालेलचाक- भंगुरा हि विशेष गाजली कारण यात प्रत्येकी ५० पेक्षा जास्त लोकांना एकाच वेळी गोळ्या घातल्या गेल्या. या २४ वर्षात दोन्ही बाजूनी काही शेकडा माणसे मारली गेली.
मणिपूर आणि उर्वरित दंग्यातला फरक आणि नवीन राजकीय परिस्थिती..
वर उल्लेख केलेले सर्व हिंसाचार, दंगे, नरसंहार सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडियाच्या उदयापूर्वीचे आहेत त्यामुळे त्याचा तेव्हा फार गवगवा झाला नाही. शिवाय मणिपूरचा हिंसाचार सुरु होऊन ३ ऑगस्टला ३ महिने झाले तरी अजूनही लहान मोठ्या हिंसक घटना घडत आहेत म्हणजे याचा कालावधी खुप मोठा आहे. याशिवाय राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजप सरकार आहे ज्याला भारतातले स्वतःला "सेक्युलर" किंवा "धर्मनिरपेक्ष" म्हणवणारे जातीय, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक अस्मितांच्या मुद्द्यावर राजकारण करणारे सगळे राजकीय पक्ष, मीडिया आणि लेखक "हिंदुत्ववादी" आणि "मुस्लिम", "ख्रिश्चन" विरोधी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मणिपूर हिंसाचाराचं विश्लेषण प्रत्येक जण आपापल्या सोयीने करू पाहतो. सध्या मणिपूरच्या छोट्याश्या गावापासून सर्वोच्च न्यायालय आणि देशाच्या संसदेपर्यंत मणिपूरचा हिंसाचार व्यापलेला असल्याने आपल्यालाही त्याचं सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून याकडे पाहून खरं काय आणि अपप्रचाराचा भाग किती हे वेगळं काढावं लागेल. यासाठी आपण या घटनांचा चार विविध अंगाने विचार करू.
संघ परिवाराच्या ७ दशकांच्या व्यापक हिंदुत्व प्रसाराची मणिपूर हिंसाचारात नेमकी भूमिका काय? भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारने हा हिंसाचार भडकवला आहे का?
मणिपूरच्या घटना सुरु झाल्यानंतर कम्युनिस्ट आणि सेक्युलर ब्लॉकच्या लेखक, पत्रकारांकडून एक बाब आक्रमकपणे प्रसारित होत आहे ती अशी किगेल्या ७० वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित विविध संघटनांनी ख्रिश्चन द्वेषावर आधारित आक्रमक हिंदू राष्ट्रवाद अख्ख्या नॉर्थ ईस्टमध्ये गावागावात पसरवला त्याचा हा परिणाम आहे आणि हिंदू- ख्रिश्चन संघर्ष भडकावून भाजपाला त्या ७ राज्यात आपली जागा बळकट करायची आहे. यातला पहिला फोलपणा असा आहे कि मणिपुरी हिंदू हे गेली काही शतके थेट "वैष्णव हिंदू" आहेत आणि त्यांच्यात संघाला कल्चरल ऍप्रोप्रिएशन" च्या आडमार्गाने प्रवेश करण्याचं काहीही कारण नाही. मैतेई हिंदूंचं रास नृत्य प्रमुख भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारात मोडतं त्यांच्यावर हिंदुत्व लादण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि कुकी समाजात- ते ख्रिश्चन असूनही वनवासी कल्याण आश्रमाच्या आणि अन्य संस्थांच्या शाळा आणि अन्य प्रकल्प आहेत.
थोडक्यात काय तर दोन्ही बाजूला संघ संबंधित संस्था खोलवर पोचलेल्या आहेत आणि त्यामुळे या संघर्षातून आपला फायदा करून घेणं सोडाच उलट वर्षानुवर्षं त्यांच्यात केलेल्या कामावर पाणी ओतल्यासारखी हि सध्याची परिस्थिती आहे.
राहिली गोष्ट भाजपच्या राजकीय लाभाची तर त्यात अजून मोठी चमत्कारिक परिस्थिती आहे. भाजपचे कुकी आणि मैतेई दोन्ही समाजातून आलेले आमदार आहेत त्यामुळे भाजपाला असा हिंदू- ख्रिश्चन संघर्ष भडकावून यातून काहीही मिळण्यासारखी स्थिती नाही उलट झालेल्या संघर्षामुळे कदाचित दोन्ही समाजात भाजप अलोकप्रिय होईल.
नॉर्थ ईस्ट मध्ये संघाच्या "कल्चरल ऍप्रोप्रिएशन" वर चर्च प्रायोजित कम्युनिस्ट मीडियाचे आक्षेप आणि वास्तविकता...
संघ नॉर्थ ईस्ट मधल्या वैविध्यपूर्ण ट्राईब्जना कल्चरल ऍप्रोप्रिएशनच्या माध्यमातून व्यापक- बृहद हिंदुत्वाच्या छत्रछायेखाली आणू पाहतो आहे आणि यात संघाला अफाट यश मिळालं आहे, याचा परिणाम म्हणून नॉर्थ ईस्टमध्ये हिंदू- ख्रिश्चन संघर्ष भडकत आहे हा चर्च प्रायोजित कम्युनिस्ट मीडियाचा आरोप आहे. या आरोपाचा विचार करताना "कल्चरल ऍप्रोप्रिएशन" म्हणजे काय याचा थोडक्यात विचार करावा लागेल.
कल्चरल ऍप्रोप्रिएशन!
या शब्दाचा तंतोतंत अर्थ "सांस्कृतिक उचलेगिरी" असा होत असला तरी ऍप्रोप्रिएशनचा खरा अर्थ दुसऱ्याची गोष्ट आपली आहे असा दावा ठोकणं, दुसऱ्याची गोष्ट, काम, प्रतीक, विचारधारा आपलीच किंवा आपल्यासारखीच आहे असं भासवणं असा होतो. आपण त्याच अर्थाने तो वापरू.
नॉर्थ ईस्ट मधल्या शेकडो ट्राईब्ज निसर्गपूजक आहेत. त्यांच्यात त्या निसर्ग प्रतिकांची कायमस्वरूपी मूर्ती, प्रतिमा करून ती पुजण्याची पद्धत नव्हती. आपल्याकडे नवरात्रात घटस्थापना होते तेव्हा जश्या त्यात वेगवेगळ्या नैसर्गिक पानाफुलांची, बी-बियाण्यांची आरास करून पूजा केली जाते तसाच हा प्रकार. संघ प्रणित संस्था- संघटनांनी ख्रिश्चनिटीच्या विध्वंसक आक्रमणाला तोंड देण्यासाठी या ट्राईब्जना तयार करताना त्यांच्या पारंपरिक प्रतिकांना चित्र आणि मूर्ती स्वरूपात आणण्यासाठी प्रोत्साहित केलं किंवा ज्यांनी तसा प्रयत्न केला होता त्यांच्या मागे संघाची ताकद उभी केली. यात संघाने कुठेही उचलेगिरी अर्थात "ऍप्रोप्रिएशन" केलेलं नाही तर आहे त्याचं "अँप्लिफिकेशन" म्हणजे "ध्वनीवर्धन" केलेलं आहे. नॉर्थ ईस्टच्या ट्रायबल्सना चर्च येण्यापूर्वी संस्कृती नव्हती, ते रानटी होते म्हणून आम्ही त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी "धर्म म्हणजे जीझस आणि बायबल" दिला या दुष्प्रचाराला या ध्वनीवर्धनाच्या माध्यमातून संघाने उत्तर दिलं, याचे जमिनीवर अतिशय खोल, सकारात्मक आणि मोठे परिणाम झाले.
अरुणाचल प्रदेशात आदी, न्यिशी, आपातानी, गालो, तागीन या जातींच्या सूर्य- चंद्र पूजा "डोन्यी-पोलो" म्हणून आणि तांगसा जातीच्या शिवाला समकक्ष देवता "रंगफ्रा" याची पूजा प्रचलित होती पण त्याचं ध्वनीवर्धन होऊन "डोन्यी-पोलो" आणि "रंगफ्रा" यांची चित्र आणि प्रतिमा बनल्या. यांच्या नावाने शाळा, संस्था, कॉलेज, विमानतळ, इमारती उभ्या राहू लागल्या आणि यांची मंदिरे बनली. चर्चच्या आक्रमक विस्तारवादाला हे एक अति मोठं आव्हान आहे आणि यामुळे चर्चला नव्या मार्गांचं अनुसरण करावं लागेल अशी अवस्था आहे.
नॉर्थ ईस्टची सगळ्यात मोठी ट्राईब बोडो जात "बाथौ" या शिवरुपाची पंचमुखी निवडुंगाच्या रूपात पूजा करत होती, ती आता अधिक संघटित झाली आहे आणि जागोजाग "बाथौ" मंदिरं बांधली जाऊन एक संघटित, सुटसुटीत कर्मकांड- पूजापाठ त्याच्या अवतीभवती तयार झालं आहे.
हीच स्थिती मेघालयाच्या खासींच्या "सेंग खासी" संघटनेच्या बाबतीत आहे. सेंग खासी संघटना "नियम खासी" हा परंपरागत खासी धर्म मानणाऱ्या लोकांची आहे आणि हि संघटना १८८९ साली स्थापन झालेली आहे. याचा अर्थ संघाचे संस्थापक डॉ हेडगेवार ज्या वर्षी जन्मले त्या वर्षी सेंग खासी स्थापन होऊन तिने वेगाने ख्रिश्चन होणाऱ्या खासी जमातीला "प्रेस्बीटेरियन चर्च" ला अजून बळी पडू नये यासाठी प्रयत्न सुरु केले, कित्येक वर्षं एकाकी लढा दिला आणि स्थापनेनंतर जवळपास ७० वर्षांनी या संघटनेचा संघाशी संपर्क येऊन तो मजबूत होऊन या चळवळीचं ध्वनीवर्धन होऊन एक आत्मविश्वास निर्माण झाला. मेघालयात गारो ट्राईब मध्ये अशीच एक चळवळ ३० वर्षांपूर्वी सुरु होऊन आता ती अल्पसंख्य असूनही चांगली जोर धरत आहे.
मी ज्या गारो ट्राईब मध्ये अनेक वर्षं राहिलो ती जात गोमांस खाते, प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात गाईचा बळी दिला जातो आणि तरीही आज त्या स्वधर्मी सोंगसारेक गारो जातीमध्ये (ख्रिश्चन नं झालेले गारो) संघाची स्वधर्मावर आधारित संघटना वाढत आहे. इथेही कधीही संघाने त्यांच्या चालीरीती व्यापक हिंदू धर्माच्या साच्यात दाबून, ओतून, ठोकून त्यांचा आकार बदलण्याचा प्रयत्न केला नाही. गोमांस आणि गोवध तिथे हजारो वर्षं चालत आलेला आहे त्या मुद्द्यावर आधीच ९०% ख्रिश्चन झालेल्या जातीला बृहद हिंदू समाजापासून लांब ठेवण्यात कोणता शहाणपणा आहे? भारताच्या विविध भागात गोमांस खाणाऱ्या हिंदूंचे काही समूह आहेत आणि तिथेही संघ सक्रिय आहेच.
अशाच चळवळी नॉर्थ ईस्टच्या सातही राज्यात प्रत्येक जातीत संघाच्या सक्रिय समर्थनाने निर्माण होत आहेत आणि पुढे जात आहेत. यात कुठेही संघाने "ऍप्रोप्रिएशन" केलेलं नाही तर जे आहे त्याचं "अँप्लिफिकेशन" केलेलं आहे.
कल्चरल ऍप्रोप्रिएशनचं भारतातलं खरं उदाहरण बघायचं असेल तर मुस्लिम मझारी आणि टोम्ब! कट्टर सुन्नी वह्हाबी पंथीय मुस्लिम मझारी आणि थडग्यांची पूजा गैर इस्लामी मानतात पण भारतात हे प्रकार सर्रास होताना दिसतात. मझारीची पूजा हि वह्हाबी मुस्लिम "बुतपरस्ती" अर्थात मूर्तिपूजेच्या जवळची मानतात ज्याला इस्लामचा ठाम विरोध आहे. त्यामुळे कल्चरल ऍप्रोप्रिएशन म्हणजे काय बघायचं असेल तर हि मझार पूजा बघावी, यात हिंदूंच्या मूर्तिपूजेची थेट नक्कल केलेली आहे त्यावर धूप, अगरबत्ती, फुलांच्या माळा वगैरे चढवलेल्या असतात. अल्लाच्या स्तुतीपर "कव्वाली" हि सुद्धा कल्चरल ऍप्रोप्रिएशनचाच एक भाग आहे कारण अशी कुराण बाह्य स्तुती वह्हाबी इस्लामला मंजूर नाही!
मणिपूरच्या पार्श्वभूमीवर ऍप्रोप्रिएशन आणि अँप्लिफिकेशन...
ऍप्रोप्रिएशन आणि अँप्लिफिकेशन यापैकी एकही गोष्ट संघाने केलेली नाही अशी एक जागा आहे मणिपूर. कारण धार्मिक, भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असलेला मैतेई समाज हा आपला आपण विकसित होत गेलेला आहे त्यात संघाने हिंदू संघटन या मुद्द्यावर आपलं काम वाढवलं. मूळचे ठाण्याचे असलेले भास्करराव कुलकर्णी १९६२-६३ पासून सलग २० वर्षे मणिपूरमध्ये संघ प्रचारक होते, त्यानंतर २०१० पर्यंत विविध प्रकल्प उभारण्याच्या कामानिमित्त अख्ख्या नॉर्थ ईस्ट मध्ये सक्रिय होते आणि आता ते गुवाहाटीला निवृत्त जीवन जगत आहेत.. अत्यंत सुंदर मणिपुरी भाषा बोलणारे भास्कर जी तिथे स्वतःचा मणिपुरी पद्धतीने के. भास्कर सिंग असा परिचय करून द्यायचे. मुद्दा हा कि तिथे त्यांना मैतेई वैष्णव समाजाच्या कोणत्याही चालीरीतींचं ऍप्रोप्रिएशन करायची वेळ आली नाही तर आहे तेच पुढे घेऊन चला, संघटित रहा हा मूलमंत्र देत ते संघकाम वाढवत राहिले.
अर्कोटोंग लोंगकुमेर यांच्या "द ग्रेटर इंडिया एक्सपेरिमेंट- हिंदुत्व अँड द नॉर्थ ईस्ट" या पुस्तकाच्या निमित्ताने....
मणिपूर संघर्ष उफाळल्यापासून चर्च प्रायोजित कम्युनिस्ट मीडिया अर्कोटोंग लोंगकुमेर यांच्या वरील पुस्तकाच्या माध्यमातून कुकी- मैतेई संघर्षा बद्दल संघाला दोष देण्यात गुंतलेले आहेत. ७ प्रकरणे आणि ३२१ पानांच्या या पुस्तकात लोंगकुमेर यांनी नॉर्थ ईस्ट मध्ये संघाने गेल्या ७० वर्षात स्थानिक जातींच्या परंपरा, मान्यता आणि पूजापद्धती यांना व्यापक हिंदुत्वाच्या घोळात घेऊन आपला विस्तार कसा वाढवला आणि भाजप कसा पसरला यावर बऱ्यापैकी संतुलित लिहिलेलं आहे. यासाठी संघाने चालवलेल्या कित्येक प्रकल्पात ते प्रत्यक्ष गेले आहेत आणि चर्चा केल्या आहेत.
भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी हि अरुणाचलच्या ईदू मिशिमी जातीतली होती हे "मिथक" संघाने अरुणाचली ट्राईब्जच्या गळ्यात मारलं आणि आता चक्क आपण एका मोठ्या हिंदू परिवाराचे एक महत्वाचे अंग आहोत असा अभिमान त्यांना वाटू लागला आहे असा शोध एका कम्युनिस्ट पत्रकाराने लावला.
संघाने अशीच अन्य मिथके नॉर्थ ईस्टच्या लोकांच्या गळ्यात मारली जसे कि मणिपूरची उलुपी हि धनुर्धारी अर्जुनाची पत्नी होती आणि नागालँडच्या दिमापूरची हिडिंबा (डिमासा जातीची) ही पांडव भीमाची पत्नी होती आणि या बाबी ऐतिहासिक आहेत आणि त्यामुळे पूर्व ते पश्चिम, दक्षिण ते उत्तर असा संपूर्ण भारत हि एक सांस्कृतिक आयडेंटिटी आहे हिलाच संघवाले "अखंड भारत" म्हणतात असा दावा अजून एका कम्युनिस्ट वेबसाईटने केला. आणि हे संघाचं कल्चरल ऍप्रोप्रिएशन आहे, याच्यामुळे मणिपूर सारखे संघर्ष अजून अधिक प्रमाणात निर्माण होतील अशी भविष्यवाणी यांनी केली आहे.
संघ ज्या सांस्कृतिक इतिहासाच्या आठवणी नॉर्थ ईस्टच्या ट्रायबल लोकांना करून देतो त्याला कम्युनिस्ट मीडियाच्या म्हणण्याप्रमाणे काहीही ऐतिहासिक पुरावा नाही आणि त्या धादांत खोट्या आणि काल्पनिक आहेत, पण चर्चने कुमारी मातेच्या पोटी जीझस जन्माला आला हे इथल्या ट्राइबल्स च्या गळ्यात मारलं त्याला कोणते ऐतिहासिक पुरावे आहेत हा प्रश्न मात्र चर्च प्रायोजित कम्युनिस्ट मीडिया विचारात नाही कारण तेवढी हिम्मत त्यांच्यात नाही!
वास्तवात मणिपूर सह अन्य कोणत्याही राज्यात संघाच्या सांस्कृतिक, पारंपरिक मूल्यांवर आधारित संघटन तंत्राने संघर्ष उत्पन्न झाल्याचं उदाहरण नाही. पण संघाच्या प्रयत्नाने या जातींना जेव्हा आपल्या इतिहासाची आणि विखरून पडलेल्या सांस्कृतिक एकत्वाची जाणीव होते तेव्हा त्याचा चर्चच्या वसाहतवादी विस्तारवादाला मोठा अडथळा निर्माण होतो. यामुळेच मणिपूर संघर्षात संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला बळेबळे ओढून जगभरात भ्रामक गोष्टी पसरवण्याचा मोठा प्रकल्प "चर्च प्रायोजित" कम्युनिस्ट मीडिया करत आहे.
मणिपूर सह संपूर्ण नॉर्थ ईस्ट मध्ये चर्चची दुविधा!
संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला नॉर्थ ईस्टच्या विविध ट्राईब्ज मध्ये मिळणारा व्यापक प्रतिसाद चर्च साठी मोठ्या चिंतेची गोष्ट आहे. एका बाजूला स्थानिक ट्राईब्जची शतप्रतिशत भारतीय पद्धतीची निर्सगपूजा (युरोपातल्या जवळपास संपलेल्या आणि आता पुनरुज्जीवन होऊ पाहत असलेल्या पागन्स चळवळींप्रमाणे) वेगाने उसळी मारायची तयारी करत आहे. दुसऱ्या बाजूने चर्चने आजपर्यंत बेधडक विकलेल्या इमॅक्युलेट कन्सेप्शन (कुमारी मातेच्या पोटी जीझस जन्माला येणं) आणि व्हिकॅरियस ऍटोन्मेंट (जगाने केलेल्या पापाचं प्रायश्चित्त जीझसने घेतलं) अशा तद्दन भंपक, अशास्त्रीय, धादांत खोट्या आणि अवैज्ञानिक ख्रिश्चन संकल्पना यांची वैज्ञानिक छाननी (Scientific Scrutiny) नवशिक्षित ट्राइबल तरुणांनी सुरु केली आहे. याचा चर्चच्या स्पिरिच्युअल अपील वर मोठा परिणाम होत आहे. यातून मार्ग कसा काढायचा हि चर्चची मोठी दुविधा आहे.
मणिपूर- ढासळते किल्ले वाचवण्याची शेवटची संधी!
ख्रिश्चन बोलबाला असलेल्या नॉर्थ ईस्टमध्ये भाजप वाढू शकणार नाही हा सिद्धांत कोसळला, हिंदुत्वाच्या आधारावर संघ नॉर्थ ईस्टमध्ये फार पसरणार नाही हा सिद्धांत खोटा ठरला याच्या धक्क्यातून बाहेर येण्याचा एकमेव उपाय संघ आणि भाजपाला नं केलेल्या पापाबद्दल शरमेने मान खाली घालायला लागेल असा दुष्प्रचार करणे हा आहे.
या प्रदीर्घ आणि भीषण हिंसाचाराचा वापर सध्या राष्ट्रीय पातळीवर २०२४ च्या निवडणुकीसाठी मोदी- शहांना घेरण्यासाठी करणे आणि जागतिक पातळीवर भारताची बदनामी करून हिंदूंना धार्मिक असहिष्णुतेच्या बाबतीत "तालिबानच्या" रांगेत नेऊन बसवणे यासाठी केला जात आहे. यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला खऱ्या माहितीसह अद्ययावत राहण्या शिवाय पर्याय नाही. मुंबईचा कॅथॉलिक आर्चबिशप कार्डीनल ओस्वाल्ड ग्रेशियस स्वतः म्हणत आहे कि मणिपूरचा हिंसाचार हिंदू- ख्रिश्चन नाही पण त्याचेच बांधव जगभर पीडित ख्रिश्चनांच्या नावाने कोट्यवधी रुपये जमा करत आहेत- या दुविधेमागेही स्थानिक आणि आंतराष्ट्रीय उद्दिष्टांचा संघर्ष हे मोठं कारण आहे.
थोडक्यात बघायला गेलं तर मणिपूरचे दंगे सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या अंगानी बघितल्यास वेगवेगळं दृष्य दिसत आहे. म्हणून हि सगळी अंगे बाजूला ठेऊन, आपण मैतेई आणि कुकी हे आपलेच बांधव आहेत आणि यांच्यात लवकरात लवकर सलोखा निर्माण होऊन मणिपूरमध्ये शांतता कशी नांदेल याचा विचार केला पाहिजे. एका भारतीय राज्यात सुरु असलेली सामाजिक अशांतता संधीसाधू चर्च आणि आंतराराष्ट्रीय खेळाडूंना कोणतीही नवीन संधी देणार नाही याचीही काळजी घेणं आपलं महत्वाचं कर्तव्य आहे.
पुढील भागात मणिपूर संघर्षावर नेमका काय उपाय असू शकतो आणि याबाबतीत सद्यस्थिती काय आहे याचा विचार करू
----- विनय जोशी