स्पेनची अयोध्या:- कोर्दोबाचं मेझकिता कॅथेड्रल अर्थात मशीद चर्च!
(ICRR- Other Conflicts)
श्रीराम जन्मभूमी उदघाटनाच्या निमित्ताने स्पेनमध्ये ख्रिश्चनांनी मशिदीचं रूप बदलून पुनरुद्धार केलेल्या एका चर्चची कथा! उम्मयाद अरब कुळाने स्पेन दक्षिण स्पेनचा अंदालुस प्रांत जिंकून तिथल्या ख्रिश्चन चर्चेसचा विध्वंस केला आणि राजधानी कोर्दोबा मध्ये असलेल्या मोठ्या चर्चची मशीद केली. पुढे तेराव्या शतकात मुस्लिम शासकांना हाकलून लावल्यानंतर ह्याच मशिदीचं म्हणजे स्पॅनिश भाषेत "मेझकिता" चं परत एकदा चर्च मध्ये रूपांतर करण्यात आलं. म्हणूनच या चर्चला कोर्दोबा मेझकिता कॅथेड्रल म्हणतात; त्याचा हा धावता इतिहास...
सन ७११ मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी पार करून तारिक इब्न झियादने राजा रॉड्रीकला हरवून दक्षिण स्पेनचा अंदालुस भाग जिंकला. तिथून आफ्रिकेत परत जाण्याऐवजी तारिकने व्हिसिगॉथिक राजधानी तोलेदो जिंकली. सन ७१४ पर्यंत तारिक आणि त्याचा सहकारी सेनापती मुसा यांनी उत्तेरच्या पर्वतराजींपर्यंतचा जवळपास अख्खा आयबेरियन द्वीपसमूह आपल्या टाचेखाली आणला.
स्पेनच्या हिस्पानो आणि व्हिसिगॉथिक समाजात म्हणावा तितका एकजिनसी सामाजिक व्यवहार आणि त्यातून उत्पन्न होणारी एकजिनसी राष्ट्रीय भावना नसल्यामुळे अरब मुस्लिमांना अत्यंत कमी काळात एवढं प्रचंड सैनिकी यश मिळालं. शिवाय मुस्लिम राज्यकर्ते कर जमा करण्याच्या बाबतीत आळशी होते त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि स्पॅनिश ज्यूंना व्यापारात फायदा वाढत गेला आणि यामुळे नव्या मुस्लिम शासकांना त्यांनी मोठा विरोध केला नाही असाही एक मतप्रवाह आहे.
पुढे पुढे अरबी टोळ्यांच्या आपापसातील संघर्षामुळे आणि स्थानिक लोकांच्या प्रतिकारामुळे मुस्लिम राज्याची व्याप्ती कमी होत गेली. सन ९२९ मध्ये उमय्याद कुळाच्या इब्न आलं रहमानने दक्षिण स्पेनच्या अंदालुस भागात आपली स्वतंत्र खलिफेत म्हणजे राज्य स्थापन करून त्याला अल अंदालुसची खलिफेत असं नाव दिलं आणि याची राजधानी झाली कोर्दोबा!
कोर्दोबाचं पॅगन मंदिर, व्हिसिगॉथिक कॅथेड्रल, मशीद ते चर्च असा प्रवास...
ज्या जागेवर सध्या कोर्दोबा मेझकिता कॅथेड्रल आहे त्या जागेवर प्राचीन पॅगन मंदिर होतं. ख्रिश्चन लोकांनी याचं चर्च केलं याला व्हिसिगॉथिक कॅथेड्रल म्हणून ओळखलं जात होतं. पुढे अरब मुस्लिम शासकांच्या काळात याच कॅथेड्रलचा विध्वंस करून त्या जागी मूरिश पद्धतीची भव्य मशीद उभारण्यात आली.
वास्तुशास्त्रीय दृष्टीने हि मशीद अत्यंत सुंदर आणि नयनरम्य आहे. परंतु आधीच्या चर्चच्या जागेवर ती बांधल्यामुळे तिचं तोंड मक्केच्या दिशेने नाही. कोर्दोबाच्या आग्नेय दिशेला मक्का आहे पण कोर्दोबा मशिदीचं तोंड दक्षिणेला आहे. सध्याच्या लिबरल इतिहासकारांच्या दृष्टीने लिहिलेल्या इतिहासाला धरून हि जागा सुरुवातीला ख्रिश्चन लोक चर्च म्हणून आणि मुस्लिम मशीद म्हणून वापरत होते. पुढे मशिदीची जागा "कमी पडू लागल्याने" उम्मयाद खलिफाने ख्रिश्चनांकडून जागा विकत घेतली आणि चर्चचं अस्तित्व मिटून जाऊन तिथे भव्य मशीद उभी राहिली! डाव्या लिबरल इतिहासकारांची नागमोडी पद्धतीने इतिहास सांगायची हि अनोखी पद्धत जगात सर्वत्र सारखीच दिसते!
स्पॅनिश मुस्लिमांचे सामूहिक धर्मांतर, कोर्दोबा मशिदीचे कॅथेड्रल मध्ये रूपांतर आणि अरब मुस्लिम ओळख पुसून टाकण्याचं अभियान!
सन १२३८ मध्ये स्पॅनिश राजा फर्डिनांड पाचवा आणि राणी इसाबेला यांनी अल अंदालुसची खालिफेत खालसा केली म्हणजेच मूरिश स्पेन परत एकदा ख्रिश्चन राजाच्या हातात आला. पुढे सतत २०० वर्ष उरल्यासुरल्या मूरिश मुस्लिम खुणा मिटवण्याचा चंग ख्रिश्चन राजांनी बांधला. २ जानेवारी १४९२ ला शेवटचा अरब राजा बोआबदिलने शरणागती पत्करली आणि ग्रानाडा भाग स्पॅनिश राजाच्या हवाली केला. यानंतर सन १५०२ मध्ये स्पेनच्या राजाने सर्व मुस्लिमांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचे आदेश काढले सन १६०९ मध्ये शेवटचा मूर मुस्लिम स्पेनमधून हाकलून देण्यात आला! जवळपास ८०० वर्षांनंतर आता स्पेनमध्ये एकही मुस्लिम शिल्लक राहिलेला नव्हता!
हे सर्व राजकीय बदल सुरु झाल्या झाल्या राजा तिसरा फर्डिनांड याने कोर्दोबा जिंकताक्षणी कोर्दोबा मेझकिता म्हणजे मशिदीला चर्चचा दर्जा दिल्याची घोषणा करून टाकली आणि या भव्य मूरिश मशिदीच्या बरोब्बर मधोमध एक छोटंसं चर्च बांधून काढलं. यावेळी त्याने मूळ मशिदीच्या रचनेला जराही हात लावला नाही. पुढे सलग ३०० वर्षे इथे हि मशीद चर्च म्हणून वापरली गेली.
पुढे सोळाव्या शतकात कोर्दोबाच्या कॅथॉलिक बिशपने हि संपूर्ण मशीद जमीनदोस्त करून नवीन कॅथेड्रल बांधण्याचा प्रस्ताव मांडला पण मूरिश इमारतीच्या सौंदर्यामुळे बिशपच्या प्रस्तावाला स्थानिकांनी मोठा विरोध केला. यातून सुवर्णमध्य म्हणून सम्राट पाचवा चार्ल्सने या भव्य मूरिश इमारतीची फार पाडापाडी नं करता मूळ इमारतीच्या आत गॉथिक पद्धतीचं नवीन बांधकाम करण्याची योजना आखली.
मुस्लिमांचे आरोप आणि मागण्या...
कोर्दोबाच्या मेझकिता कॅथेड्रलच्या अप्रतिम रचनेमुळे ही इमारत एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मुस्लिमांचा आरोप आहे की कट्टर ख्रिश्चन लोकानी मुद्दामहून या चर्चमध्ये मुस्लिमांना वर्ज्य असलेलं डुकराचं मांस खाण्याची पद्धत रूढ केली. आणि लोक जाणीवपूर्वक आत बसून डुक्कर खातात. जगभरातील मुस्लिम या चर्चकडे ऐतिहासिक वैभवशाली मुस्लिम राजवटीची एक महत्वाची खूण आणि मानबिंदू म्हणून बघतात आणि म्हणून हि इमारत परत मशीद म्हणून वापरली जावी आणि ख्रिश्चनांनी यावरचा आपला हक्क सोडावा अशी मागणी उठत राहते.
सन २००० पासून ह्याचा मशीद म्हणून वापर करू द्यावा अशी मागणी सातत्याने व्हॅटिकन आणि स्पॅनिश कॅथॉलिक चर्च कडे केली जात आहे आणि दरवेळी ती फेटाळली जात आहे. २०१० ला काही मुस्लिम पर्यटकांनी याच्या आतमध्ये जाऊन नमाज अदा करण्याचा प्रयत्न केला होता पण तो हाणून पाडण्यात आला. याचा निषेध म्हणून स्पॅनिश मुस्लिम नेता मन्सूर एस्कोदेरो दर शुक्रवारी मशिदीच्या बाहेर नियमितपणे नमाज अदा करत असतो.
जगातल्या सगळ्या मुस्लिमाना यहुद्यांच्या राजकीय ताब्यात असलेली अल अकसा मशीद, कोर्दोबा कॅथेड्रल आणि अयोध्येची कथित बाबरी या परत मुस्लिमांच्या ताब्यात याव्यात असं वाटत असतं. इस्लामच्या वैभवशाली राजकीय काळात त्यांनी कमावलेला भूभाग आणि राजकीय, सैनिकी वर्चस्व आता उरलेलं नाही हि बोचणी जगभरातील मुस्लिम सतत बाळगून असतात.
अयोध्या आणि कोर्दोबा!
इस्लाम आणि ख्रिश्चनिटी जिथे जाते तिथे तिथे स्थानिक स्वधर्मी लोकांच्या संस्कृती, धर्म आणि धार्मिक प्रतीकांचा विध्वंस करते असा इतिहास आहे. भारतात मुस्लिम शासकांनी ३०,००० च्या वर हिंदू मंदिर लुटून, पाडून त्याच्या मशिदी केल्या अशी नोंद आहे.
गोव्यात हिंसक कॅथॉलिक पोर्तुगीजांनी लाखो हिंदूंच्या कत्तली करून शेकडो मंदिरे पाडून तिथे चर्च उभारली, त्यापैकी सप्तकोटेश्वराच्या मंदिराच्या शिवछत्रपतींनी त्यांच्या हयातीतच जीर्णोद्धार केला होता.
हे दोनही धर्म विरूद्ध धर्माच्या लोकांना बळाने धर्मांतरित करून, त्यांची मंदिरे आणि महिला यांच्यावर आपला कब्जा करतात आणि त्यामुळे त्यांना विरोध करायला कुणीही धजावत नाही.
अयोध्येतही प्राचीन सुंदर आणि भव्य असं श्रीरामजन्मभूमी मंदिर पाडून तिथे अत्यंत विद्रुप अशी गावंढळ इमारत रानटी मुघल सरदाराने बांधली. मूलभूत तर्कशास्त्राची भयंकर वानवा असलेल्या कित्येक हिंदूंनी त्याला ऐतिहासिक वास्तुशास्त्रीय रचनेचा दर्जा दिला आणि १९९२ च्या पतनाने भारतातील एका मौल्यवान ऐतिहासिक ठेव्याचा विध्वंस केल्याची बोच भारतीय डाव्या लिबरल लोकांना लागली. कोर्दोबा मशीद आणि अयोध्या यात हाच मोठा फरक आहे. कोर्दोबा अप्रतिम वास्तुशास्त्रीय रचना आहे, त्यामुळेच ती तशीच ठेवून काही बदल करून ती चर्च म्हणून वापरात राहिली आहे आणि अयोध्येला बांधलेली ओबडधोबड इमारत पाडून तिथे नवीन सुंदर वास्तू बांधण्यावाचून कोणताही पर्याय हिंदूंसमोर उपलब्ध नव्हता.
धार्मिक प्रतीके, माता भगिनी आणि संस्कृतीचा सन्मान!
विकसित समाजात माता, भगिनींचा सन्मान आणि राष्ट्रीय, धार्मिक, सांस्कृतिक प्रतीकांच्या सन्मानासाठी मोजावी लागणारी किंमत हि आर्थिक आणि व्यावहारिक परिमाणात मोजली जात नाही. अशा प्रतीकांच्या सन्मानासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची जगभरात परंपरा आहे. पण याबाबतीत घाबरट आणि अविकसित समाज आर्थिक आणि व्यावहारिक पैलूंचा प्राधान्याने विचार करतो.
अयोध्येच्या पुनर्निर्माणाच्या निमित्ताने आपल्या मनात त्याची आर्थिक आणि व्यावहारिक किंमत काय आहे असा विचार येत असेल तर आपण कोणत्या प्रकारचे लोक आहोत याचा विचार ज्याचा त्याने करायचा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात हातून निसटलेली धार्मिक स्थळे काय मूल्य चुकवून परत मिळवली जातात याचा अभ्यास केल्यास "अयोध्या" मुद्द्यावरून आपल्या मनात निर्माण झालेले किंतु परंतु संपून जातील अशी आशा आहे, त्यासाठीच आज "कोर्तोबा मेझकिता कॅथेड्रल अर्थात मशीद चर्च" च्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची आपण थोडक्यात चर्चा केली आहे!
----- विनय जोशी