चिनी एजन्सीज आणि त्यांचे गुप्तहेरखाते.

16 Jun 2021 12:59:20

चिनी एजन्सीज आणि त्यांचे गुप्तहेरखाते.

 

इतर कुठल्याही देशापेक्षा कितीतरी पट गुप्तहेर आज चिनी गुप्तहेर संघटनेत आहेत. चीनविरुद्ध हेरगिरी करण्यात इतर देशांना मुख्य अडथळा हा इथल्या भाषेचा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिनी नागरिकांना पीएलएचा भयंकर धाक आहे.

 

औद्योगिक हेरगिरीसोबतच चीन आपल्याच नागरिकांवर, आपल्या विरोधकांवर आणि पर्यटकांवर हेरगिरी करण्यासाठी बदनाम आहेच. शिवाय सायबर युद्ध खेळण्यातही तो तरबेज आहे.

 

भारत, पाकिस्तान, अमेरिका, रशिया आणि इस्राएल यासारख्या अनेक देशांच्या गुप्तहेर संस्था सुप्रसिद्ध आहेत. पण चिनी गुप्तहेरसंस्थेविषयी आपण अनभिज्ञ आहोत. चीनने आतापर्यंत अत्यंत चलाखीने आपल्या गुप्तचरसंस्थेविषयी माहिती दडवून ठेवली आहे. परंतु आता हळूहळू त्यासंबंधी माहिती हातास लागत असल्याचे संरक्षण आणि सुरक्षा आस्थापनांच्या सूत्रांनी सांगितले आहे.

 

चिनी गुप्तहेर संस्थेचे अनेक स्तर आहेत. अगदी तळागाळातून ते काम करतात. सर्वात महत्त्वाचा स्तर हा मीडिया आणि व्यावसायिक संस्था आहेत. अनेक चिनी टेक कंपन्या आणि इतर कंपन्यांचे चिनी कम्युनिस्ट पार्टी आणि चिनी लष्कराशी लागेबांधे आहेत असे म्हटले जाते. याला काही पुरावा नसला तरी यात तथ्य असल्याचे सगळ्या जगाचे म्हणणे आहे. कारण चीन हा असा देश आहे की इथली कुठलीही गोष्ट ही कायम गुप्तच ठेवली जाते. इथले नागरिक देशाबद्दल कधी वाईट बोलत नाहीत. एखाद्याने हे धाडस केले तर त्याचा आवाज चिनी सरकार दडपून टाकते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिनी भाषा ही अतिशय किचकट असल्याने तीचे आकलन होण्यास खूप वेळ लागतो.

 
PLA_1  H x W: 0
 

न्यूझीलंडच्या कॅन्टरबरी विद्यापीठाचे पॉलिटिकल सायन्स चे प्रोफेसर अ‍ॅनी-मेरी ब्रॅडी यांनी ऑस्ट्रेलियन  फॉरेन अफेअर्स च्या अंकात प्रकाशित केलेल्या पार्टी फेथफुल' या लेखात मुख्य चिनी गुप्तचर यंत्रणांविषयी लिहिले आहे.

 

राज्य सुरक्षा मंत्रालय किंवा एमएसएस

 

ज्याप्रमाणे सोव्हिएत युनियनची केजीबी ही कमिटी फॉर स्टेट सिक्युरिटीया नावाखाली जगावर हेरगिरी करते त्याप्रमाणे सगळ्यात मोठी चिनी नागरी गुप्तचर संघटना ही राज्य सुरक्षा मंत्रालय किंवा एमएसएस आहे असे ब्रॅडी म्हणतात.

 

एमएसएस ही काउंटर इंटलिजन्स, फॉरेन इंटलिजन्स तसेच देशांतर्गत हेरगिरी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गुप्तहेरांची नेमणूक करण्यासाठी अधिकृतपणे १९८३ साली स्थापन करण्यात आली आहे. अमेरिकन सेंट्रल इंटलिजन्स एजन्सी आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या दोहोंची सरमिसळ म्हणजेच ही एमएसएस होय.

 

एमएसएसची एक बाजू म्हणजे याला सार्वजनिक रिसर्चदेखील आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांना यांच्यापर्यंत पोचता येते. १९८० मध्ये स्थापना झालेली चायना इन्स्टिट्यूट्स ऑफ कॉन्टेम्पररी इंटरनॅशनल रिलेशन्स या एकल संस्थेच्या आता अनेक शाखा झाल्या आहेत. त्याच्या अनेक इन्स्टिट्युट्स निघाल्या आहेत.

 

२०१७ मध्ये लागू करण्यात आलेल्या नॅशनल इंटलिजन्स कायद्यानुसार इतर गुप्तचर संस्थांसह एमएसएसला देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यक्तींवर, संस्थांवर नजर ठेवणे आणि त्यांची हेरगिरी करण्याचे अधिकार मिळाले आहेत. तपासणी दरम्यान सहकार्य न करणार्यांना किंवा माहिती लपवणार्यांना १५ दिवसांपर्यंत ताब्यात ठेवण्याचे अधिकारही या कायद्याद्वारे त्यांना मिळाले आहेत.

 

सार्वजनिक सुरक्षा मंत्रालय

 

चीन मधील सार्वजनिक सुरक्षा मंत्रालय हे दहशतवादी कारवाया आणि अंतर्गत सुरक्षा व असंतोषावर लक्ष ठेवण्याचे काम करते. चीनमधील अंतर्गत सायबर पॉलीसी नियंत्रणाचे कामही याच मंत्रालयाकडे असतं. चीनमधील लोकांची नोंदणी, त्यांची राष्ट्रीयता, चीनमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांवर देखरेख, चीनमध्ये भरणारे मेळावे आणि प्रात्यक्षिके आणि सीमाव्यवस्थापन यासारखी कामे या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. त्यांचे नियम आणि कायदे खूप कडक असल्याने भ्रष्टाचार किंवा देशाविरुद्ध गद्दारी करण्याचा विचारही कुणी करत नाही.

 

जॉइंट स्टाफ डिपार्टमेंट इंटलिजन्स ब्युरो (जेएसडी)

 

चीनच्या पीएलएची जॉइंट स्टाफ डिपार्टमेंट इंटलिजन्स ब्युरो (जेएसडी) ही बाह्य गुप्तचर संस्था आहे. ही संस्था आपल्या गुप्तहेरांना परदेशात अनेक प्रकारच्या कंपन्या, विद्यापीठे अश्या ठिकाणी गुप्त कारवायांसाठी पाठवते. वरकरणी आंतरराष्ट्रीय लष्करी अधिकाऱ्यांचे सामरिक अभ्यासात  स्वागत करणे, त्यांना मदत करणे यासारख्या गोष्टींसाठी ही संस्था उभारली गेली असली तरी तिचे मुख्य काम हेरगिरी आहे असे त्या फेथफुल या लेखात ब्रॅडी यांनी म्हटले आहे.

 

स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स

 

पीएलएची ही एजन्सी सायबर युद्धाशी संबंधित सर्व गोष्टी हाताळते. परदेशातील राजकीय हस्तक्षेपापासून ते लष्करी आणि व्यायवसायिक सर्व भागामध्ये यांची हेरगिरी चालते. अनेक प्रकारची सायकॉलॉजिकल वॉर खेळण्यातही हे तरबेज आहेत. महत्त्वाची कागदपत्रे, ई-मेल्स, पासवर्डस हॅक करून सामरिक माहिती गोळा करून पीएलएला महत्त्वाचा ऐवज पुरवणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सायबर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉरफेअर आणि सायकॉलॉजिकल ऑपरेशन्स हे त्यांचे दुसरे उद्दिष्ट आहे.

 

Source : google, the print

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Powered By Sangraha 9.0