भारताच्या सीमेजवळील चीनच्या नवीन हालचाली.
- प्राची चितळे जोशी.
( ICRR Content Generation )
संपूर्ण जग आज चीनकडून आलेल्या भयंकर विषाणूशी लढत असताना चीन भारताच्या सीमेवर लढाईचा सराव करत आहे. भारतात मृत्यूचे थैमान चालू असतानाही आमचे जवान सीमेच्या रक्षणासाठी आपली छाती पुढे काढून उभे आहेत. देशात हाहाकार उडाला असतानाही देशाच्या सीमा मजबूत करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
गेल्या वर्षीपासून लडाखमधील अनेक संवेदनशील ठिकाणी भारत आणि चीनमध्ये चकमकी उडाल्या. अनेक चर्चांच्या फेरीनंतर दोन्ही बाजूच्या सैन्याने पॅंगॉन्ग लेकजवळील उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरील सैन्य मागे घेतले आहे. परंतु बाकीच्या संवेदनशील ठिकाणावरून चीनने आपले सैन्य अजून मागे घेतले नाही. चीन प्रत्येक चर्चेवेळी सैन्य मागे घेण्याची तयारी दाखवतो पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करत नसल्याचे भारतीय सैन्याचे म्हणणे आहे. त्या प्रदेशात शांतता राखण्यासाठी दोन्ही बाजूची तयारी हवी. कोणा एकाची मक्तेदारी नव्हे. चर्चेसाठी येणाऱ्या चिनी अधिकाऱ्यांच्या वागण्यात लवचिकता आढळून येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अलीकडेच चीनने आपल्या हवाई दलाच्या कमांड साखळीत सैन्याच्या हवाई संरक्षण युनिटला एकत्रितपणे हवाई संरक्षण प्रणाली तयार करण्यासाठी भारताच्या सीमेवरील प्रदेशात पाचारण केले आहे. नवीन हवाई संरक्षण प्रणालीची स्थापना हा चीनच्या डब्ल्यूटीसीच्या (वेस्टर्न थिएटर कमांड) युद्ध सरावाचा भाग असल्याचे चीनने डेली या वृत्तपत्राजवळ कबूल केले.
भारताच्या सीमेवरील सर्व घडामोडी या वेस्टर्न थिएटर कमांडच्या अखत्यारीत येतात. या कमांडकडून लडाख सीमेवर मोठ्या प्रमाणात तैनात सुरु असते. वर्षभरापूर्वी पूर्व लडाखमधील चकमक सुद्धा याच कमांडमुळे झाल्या होत्या. डेली च्या मुखपत्रात या हालचालीला " संयुक्त लढाईसाठी आणि संयुक्त प्रशिक्षणाच्या दृष्टीने उचललेले ठोस पाऊल " असे म्हटले आहे.
सैन्याच्या हवाई संरक्षण दलाची तयारी तपासण्यासाठी अतिशय खडतर असा सराव पीएलएच्या आदेशाने घेण्यात येतोय. दहापेक्षा जास्त हवाई संरक्षण दलांनी पीएलए एअर फोर्स (पीएलएएफ) कमांड साखळीमध्ये प्रवेश केला आहे. युद्धाची तयारी तपासण्यासाठी, कठीण सरावासाठी हे दल डब्ल्यूटीसीमध्ये सामील झाले आहे.
शी जिनपिंग यांच्या आदेशाने हा संयुक्त सराव होत आहे. २०२१ चा हा सराव प्रत्यक्ष लढाई, संयुक्त कमांड आणि संयुक्त प्रशिक्षण, नवीन उपकरणे आणि प्रशिक्षण प्रणालीची कार्यप्रणाली यावर केंद्रित असेल. लष्कराची तयारी अशी पाहिजे की " कोणत्याही क्षणी कृती करण्यास " ते तत्पर असले पाहिजे असे शी ने लष्कराला बजावले आहे. नवीन उपकरणे, नवीन सैन्य आणि नवीन लढाऊ प्रशिक्षण यात पारंगत असलेच पाहिजे.
पीएलएने डब्ल्यूटीसीमध्ये १७,००० फुटांवर एक शस्त्रास्त्रांनी आणि दारुगोळ्याने सज्ज प्रगत रॉकेट लाँचर तैनात केले असल्याची माहिती डेली ने दिली आहे.
पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील गेल्या वर्षभरात जो संघर्ष चालला आहे तो सोडविण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरु आहेत. दोन्ही सैन्यांनी पॅंगॉन्ग लेकच्या जवळचे आघाडी सैन्य मागे घेतल्यानंतर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशात दहावी बैठक झाली. चर्चेची अकरावी फेरी ९ एप्रिल ला झाली पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी बुधवारी पूर्वेकडील लडाख आणि सियाचीनमधील विविध भागांचा दौरा केला. सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी भारताच्या सैन्य सज्जतेचा आढावा घेण्यासाठी हा दौरा होता.
भारत आणि चीन यांच्यातील चर्चेच्या अकराव्या फेरीनंतर दोन्ही बाजूकडील सैन्य हॉट स्प्रिंग्ज, गोगरा आणि देप्सांग यासारख्या अति संवेदनशील भागातून बाजूला होण्यास तयार नसल्याने या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही.
अतिशय खडतर भूप्रदेशात, कमाल उंचीवर आणि हवामानातील स्थित्यंतरांशी तितक्याच दृढतेने सामना करत असलेल्या जवानांच्या धैर्याचे त्यांनी या भेटीवेळी कौतुक केले. या भेटीवेळी जनरल नरवण्यांसोबत उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी आणि फायर अॅण्ड फ्युरी कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन होते. लडाख सीमेवर वास्तविक नियंत्रण रेषेचे (एलएसी) रक्षण फायर अॅण्ड फ्युरी कॉर्प्स करतात.
चीनच्या अश्या बेभरवशी वागण्यामुळे पॅंगॉन्ग लेकच्या बाजूने धोका कमी झाला असला तरी पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. भारताचे लष्कर टक्कर देण्यास समर्थ आहे.
पॅंगॉन्ग त्सो च्या घटनेला एक वर्ष होत नाही तोवर चीनने मोठ्या प्रमाणात सीमेवर आपले सैन्य जमा करून सरावाला सुरवात केली आहे. भारतासोबत शांतीवार्तेच्या फैरीच्या फैरी झाडायच्या आणि प्रत्यक्षात सीमेवर कुरापती काढत राहायच्या हे चीन नेहमीच करत आलाय. भारत त्याच्या या हुलकावण्याला फसणार नाही. जनरल नरवणे यांच्या भेटीमुळे भारतीय सैन्याचे मनोबळ नक्कीच वाढले आहे.
Source : Hindustantimes, economictimes, daily, google