ग्रेटा थुनबर्ग आणि तिचं कुटिलतेचं टूलकिट.
- प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
प्रा. डॉ. गीता भट्ट यांच्या लेखाचा अनुवाद-
स्वतःच्याच वर्तुळात रमणाऱ्या, स्वतःच्या क्षेत्राबाहेर क्वचितच बोलणाऱ्या तीन स्त्रिया अचानकपणे फक्त दिल्लीपुरत्या मर्यादित ठिकाणी चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधांवर भाष्य करताना आढळतात. या तीनही स्त्रियांची क्षेत्रे वेगवेगळी आहेत. अमेरिकेतील पॉप सिंगर रिहाना, स्वीडनची युवा पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग आणि पॉर्न अभिनेत्री मिया खलिफा यांनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटचा वापर करून भारतातील नवीन कृषिकायद्याच्या विरोधात आपला पाठिंबा दर्शवला. अत्यंत पद्धतशीरपणे एखादी गोष्ट अनेक लोकांपर्यंत पोचवणे आणि त्यांच्या मनावर ठसवणे यासाठी सोशल मीडिया हे साधन वापरले जाते. त्यामुळे या तिघींचे असे अचानक व्यक्त होणे हा योगायोग मानणे कठीण जातेय.
या सेलिब्रिटींनी भारतीयांना ज्या तीक्ष्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहता त्यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे. एकविसाव्या शतकात एकाचवेळी अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पीआर मोहिमा राबविल्या जात आहेत. लोकांची मने बदलण्याकरिता, त्यांची मते वळविण्याकरिता या साधनांचा कसा वापर केला गेला हे आपण अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पाहिले आहे. डिजिटल ऍक्सेसने लोकांवर प्रभाव टाकल्याचे आरोप होत आहेत. २०१६ मधील डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्ष म्हणून निवड ते २०२० मधील त्यांचा पराभव याच प्रकारच्या आरोपांनी घेरला होता. या आभासी जगात वावरणारा प्रत्येकजण जगभरात चालणाऱ्या घडामोडींबाबत येथे आपापले मत आणि विचार नोंदवतात. सेलिब्रिटीज सुद्धा याला अपवाद नाहीत. त्यांचा तो अधिकार आहे. आणि म्हणूनच कृषी कायद्यासंदर्भात त्यांनी केलेली टीका ही त्यांची एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारी आस्था आणि काळजी आहे.
बरेच सेलिब्रिटीज सतत चर्चेत राहण्यासाठी किंवा त्यांच्या काही उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी चालू घडामोडींवर भाष्य करताना दिसतात. गेल्यावर्षी होस्टेलच्या फी वाढीसंदर्भात जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या निषेध आणि हिंसाचाराच्या वेळी बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेली असताना तिने जेएनयू च्या या आंदोलनामध्ये जाऊन त्यांना सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच वेळा काही सेलिब्रेटी उत्पादनांच्या जाहिरातीसाठी काही काळ स्वतःला त्या उत्पादकाला ' rent a cause ' देऊन बसतात. स्काय रॉकेट नावाच्या जनसंपर्क कंपनीने पॉपस्टार रिहानाला १८ कोटी रूपये दिल्याचे आरोप आधीपासूनच मीडियामध्ये होत आहेत. विशेष म्हणजे, एमओ धालीवाल हे या फर्मचे संचालक आहेत. तसेच पोएटिक जस्टीस फाउंडेशन नावाच्या कॅनेडियन संस्थेचेही ते संस्थापक आहेत.
पोएटिक जस्टिस फाउंडेशन ही अशी संस्था आहे जी माहिती, सार्वजनिक कार्यक्रम, रणनीती, आपले वजन आणि व्हिडीओ यांच्यामार्फत कृषी कायद्याविरुद्ध सोशल मीडियामध्ये अशांतता आणि असंतोष निर्माण करते असा त्यांच्यावर आरोप आहे. आणि ही सर्व माहिती ग्रेटा थुनबर्ग हिने अजाणतेपणी त्याच सोशल मीडियावर शेअर केली. तिने शेअर केलेले बिंदू जोडूनच हा प्लॉट कसा रचला गेला याचा उलगडा झाला. पर्यावरणात कार्बनडायऑक्साईडची भर विमानांमुळे पडते म्हणून विमानप्रवास न करणाऱ्या पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थुनबर्ग हिचं शेत कचरा जाळण्यासंदर्भातील सरकारच्या भूमिकेवर काय म्हणणं आहे हे अजून समोर यायचं आहे. हिच्या स्वतःच्याच देशात खोटा प्रचार आणि प्रसार हा गुन्हा मानला जातो आणि जनतेच्या मनावर हेतुपुरस्सर एखादी गोष्ट बिंबवणे हा सुद्धा गुन्हा मानला जातो.
भारतातील सर्व शेतकऱ्यांना सर्व नागरिकांप्रमाणेच शांततापूर्वक निषेध करण्याचा आणि आपल्या शंका, भीती व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हे आंदोलन २७ पैकी केवळ २ राज्यांपुरतेच मर्यादित कसे? आणि त्याला सातासमुद्रापार असलेल्यांकडून समर्थन कसे? सुजाण व्यक्तीना नक्कीच याचा सुगावा लागेल.
मूळ लेखिका प्रा. डॉ. गीता भट्ट, दिल्ली विश्वविद्यालय
Source : https://www.icrr.in/Encyc/2021/2/7/Greta-Thunberg-s-Tool-Kits.html