ताजिकिस्तानातील गृहयुद्ध

13 May 2020 09:19:13
 
 

tajikistan_1  H 
                              Picture credit: Al Jazeera
 
 
भौगोलिकदृष्ट्या मध्य आशियातील भारताच्या सगळ्यात जवळचा असा देश म्हणजे ताजिकिस्तान. १९९१ च्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर ताजिकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. उत्तर पूर्व बाजूला किर्गिझस्तान, पूर्वेला चीन, पश्चिमेला उझबेकिस्तान आणि दक्षिणेला अफगाणिस्तान अश्या ह्या देशाचा सीमाविस्तार झाला आहे. वाखाण कॉरिडोर नावाचा अफगाणिस्तानातील छोटासा प्रांत ताजिकिस्तानला उत्तर गिलगिट-बाल्टिस्तान म्हणजेच पाकिस्तान-नियंत्रित काश्मीर पासून विभक्त करतो. मध्य आशियातील क्षेत्रफळदृष्ट्या सगळ्यात लहान परंतु पामीर आणि अल्ताई पर्वतरांगांनी ताजिकिस्तानचा ९३% प्रदेश वेढलेला आहे. सोव्हिएत संघातून १९९१ ला वेगळा झाल्यानंतर नऊ महिन्यांच्या आतच ह्या देशाला गृहयुद्धाचा सामना करावा लागला. गृहयुद्धाची सुरवात झाल्यानंतर प्रथमतः ते साम्यवादी विचारसरणीचे शिलेदार आणि इस्लामिक मूलतत्ववाद्यांमध्ये लढले जाईल असे वाटत होते. परंतु जसजसे युद्ध वाढत गेले तसतसे वांशिक आणि प्रादेशिक घटकांमधील वाद समोर येऊ लागले. ताजिकिस्तानातील गृहयुद्ध हे मध्य आशियातील सगळ्यात मोठा राजकीय पेच होता.
 
नोव्हेंबर १९९१ साली झालेल्या राष्ट्रीय निवडणुकांमुळेही ताजिकिस्तानात अस्वस्थता पसरली होती. १९९१ साली ताजिकिस्तानात झालेल्या निवडणुकांमध्ये नाबियेव हे अतिशय थोड्या मतधैक्याने जिंकले होते. निवडणुकांना फोल ठरवत इस्लामिक रेनेसान्स पार्टी आणि विरोधकांनी नवीन निवडणुकांची मागणी केली होती नाबियेव ह्यांनी हि मागणी नाकारली आणि विरोधकांविरुद्ध बळाचा वापर करत दडपशाहीची मोहीम चालू केली.
  
पण, ताजिकिस्तानातील गृहयुद्धाची सुरवात एका छोट्याश्या अफवेमुळे झाली. काळ्या समुद्रावर असलेला आणि पूर्वी सोव्हिएत संघाचा भाग असलेला अझरबैजान नावाच्या देशात अर्मेनिया आणि अझरबैजानच्या सीमेजवळ नागोरनो काराबाख नावाचा एक भाग आहे. सोविएत संघाच्या विघटनानंतर इस्लामिक अझरबैजान आणि ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती अर्मेनिया हे दोन्ही देश स्वतंत्र झाले. नागरनो काराबाख हा प्रांत अझरबैजान देशात येतो पण त्यात आर्मेनियन ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती धर्माचे पालन करणाऱ्या जनतेचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दोन्ही देश ह्या प्रांतावर हक्क सांगू लागले आणि युद्धाला तोंड फुटले. फेब्रुवारी १९९२, ताजिकिस्तानची राजधानी दुशानबे येथे अर्मेनियातून येणाऱ्या निर्वासितांना घरं दिली जातील अशी अफवा पसरली आणि उठवांना सुरवात झाली.
 
इस्लामिक रेनेसान्स पार्टीने कम्युनिस्ट पार्टी ऑफ ताजिकिस्तानला विरोध करण्यासाठी ह्या उठवांना हवा देणे चालू केले. इस्लामिक रेनेसान्स पार्टी हि सोविएत संघात इस्लामच्या गुप्त प्रचारासाठी सुरु करण्यात आलेली भूमिगत चळवळ होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या निदर्शनांचे प्रमाण पाहून फक्त ताजिक सरकारच नाही तर मध्य आशियातील सगळ्याच नेत्यांना आपापल्या देशांमध्ये मूलतत्त्ववादी इस्लामचा प्रसार होऊन सरकार पडण्याची भीती वाटू लागली. त्यामुळे प्रथमदर्शनी हा वाद कम्युनिस्ट विरुद्ध मूलतत्त्ववादी असा आहे असे भासू लागले.
 
ताजिकिस्तानचे पूर्व अध्यक्ष रहमान नाबियेव ह्यांच्या गठीत सरकारात असलेल्या खुर्द आणि कुलोब भागातील लोकांच्या वर्चस्वाविरुद्व ताजकिस्तानमधील गार्म आणि गोरोनो-बदाख्शान भागात मे १९९२ रोजी उठाव सुरु झाले आणि सोविएत संघात दाबून ठेवल्या गेलेल्या अनेक प्रश्नांना तोंड फुटू लागले. दुशानबे येथील उठावाची तीव्रता पाहून देशात कर्फ्यू जाहीर केला गेला. कर्फ्यू जाहीर केल्यानंतर तासाभरातच राजधानीतील सगळ्या सरकारी इमारतींचा ताबा निदर्शकांनी घेतला आणि अध्यक्षीय भवनाला वेढा दिला. दोनच दिवसात विरोधकांसोबत युती करण्याचे जाहीर करून नाबियेव सरकारने करारावर सह्या केल्या.
 
करार झाल्यावरसुद्धा नाबियेव आणि विरोधकांमध्ये सशस्त्र संघर्ष चालूच होता. विरोधकांनी नाबियेव ह्यांनी राजीनामा द्यावा म्हणून मागणी चालूच ठेवली. तर खोडजेन्ट भागातील नाबियेव समर्थकांनी प्रांताला वेगळे करून देशाचे तुकडे करू अशी धमकी देण्यास सुरवात केली. सरकार आणि विरोधकांमधील वाद संपूर्ण देशभर पसरला आणि प्रत्येक प्रांताने आपली स्वायत्तता (autonomy) जाहीर करून, वेगळं होण्याची री ओढली. नाबियेव ह्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असूनही दुशानबे बाहेरील वर्चस्व संपुष्टात आले. गुलबुद्दीन हिकमेत्यार, अहमद शाह मसूद ह्यासारख्या अफगाण मुजाहिद्दीन सरदारांनी इस्लामिक रेनेसान्स पार्टीला सशस्त्र मदत पुरवण्यास सुरवात केली. पार्टी समर्थकांना युद्ध प्रशिक्षण देण्यासाठी अफगाण सरदार पुढे येऊ लागले. नाबियेव हे दुशानबे येथून खोडजेन्ट येथे पळून जाताना इस्लामिक रेनेसान्स पार्टीच्या दहशदवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यानंतर नाबियेव ह्यांनी राजीनामा दिला.
 
रशियाने संपूर्ण मध्य आशियात विजेचा प्रवाह सुरु राहण्यासाठी मध्य आशियातील पुढाऱ्यांना हाताशी घेऊन आपली २०१ मोटोराईज्ड रायफल डिव्हीझन नुरेक हैड्रोइलेकट्रीक प्लांट येथे पाठवली. सुरवातीला प्लांटची देखरेख केली गेली परंतु, ताजिकिस्तानातील सरकारी सैन्य देशासाठी लढायचे सोडून आपापल्या जमातींसाठी लढत असल्याची सबब पुढे करून आणखी रशियन फौज कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेन्डन्ट स्टेट्स ह्या पूर्व सोविएत संघांच्या गटाद्वारे पाठवण्यात आली. रशियन सैन्याने ताजिकिस्तानातील हवाईतळ आणि बाकीच्या महत्वाची उपकरणं असलेल्या जागांचा ताबा घेतला. वर्षभरात ताजिकिस्तानात दोन लाख रशियन सैन्य येऊन दाखल झाले.
 
 
नाबीयेव ह्यांच्यानंतर प्रभारी राष्ट्राध्यक्ष झालेले अकबार्शो इस्कंद्रोव ह्यांनी रशियन फौजांना पाठिंबा दर्शवला तर, इस्लामिक रेनेसान्स पार्टीने रशियन फौजांविरुद्व निदर्शने चालूच ठेवली सरकारमधील गटांचाच एकमेकांना विरोध बघून ह्यातून काही राजकीय उपाय निघणे अशक्य वाटू लागले. गृहयुद्धात रशिया सोबतच ताजिकिस्तानवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी इतर देशांचा हस्तक्षेप वाढू लागला. इराण, अफगाण मुजाहिद्दीन आणि पाकिस्तानातील जमात-ए-इस्लामीने मूलतत्ववाद्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण आणि पुरवठा करणे चालू केले. इराणने दुहेरी खेळी खेळण्यास सुरवात केली एकीकडे ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इस्कंद्रोव ह्यांना उघडपणे पाठिंबा देण्यास सुरवात केली तर दुसरीकडे डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ ताजिकिस्तान ह्या ताजिकिस्तानातील युनाइटेड ऑपोसिशन मधील सरकार विरुद्ध कारवाया करणाऱ्या पक्षाला आर्थिक मदत आणि रेशन पुरवण्यास सुरवात केली. अनेक परदेशी मुस्तद्यांच्या मते इराण इस्लामिक रेनेसान्स पार्टी साठी हवाईमार्गाद्वारे शास्त्र पुरवठा करत होती. इराण मध्य आशियात वरचढ ठरण्यासाठी, सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि अफगाण मुजाहिद्दीन ह्यांच्याद्वारे इस्लामिक मूलतत्ववाद्यांना पुरवल्या जाणाऱ्या मदतीपेक्षा अधिक मदत पुरवण्याच्या प्रयत्नांत होता.
 
गठबंधन सरकारची कुलियाब आणि खोदजेन्ट प्रांतातून हाकलपट्टी झाल्यानंतर देशात नव्याने निवडणुका घेण्यात आल्या आणि कुलियाब येथील कम्युनिस्ट नेते इमोमाली रहमोन ह्यांची राष्ट्रीय अध्यक्ष आणि खोडजेन्ट येथील नेते अब्दुलजानोव्ह ह्यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. रहमोन ह्यांची अध्यक्ष म्हणून झालेली निवड हि इस्लामिक मुलतत्ववादी आणि युनाइटेड अपोसिशनची हारच होती. परंतु सीझफायर किंवा गृहयुद्धावर तोडगा निघण्याची काहीही चिन्ह दिसत नव्हती. फक्त एका शारतूज शहराजवळील ७०,००० निर्वासित कम्युनिस्ट अत्याचारांना कंटाळून अफगाणिस्तानात जाण्यासाठी अमुदर्या नदीच्या उत्तरेला जमा होऊ लागले. थंडीत योग्य सोयीसुविधा नसल्याने अनेक जण तेथेच मृत्युमुखी पडले तर, ज्यांनी नदी पार करण्याचा प्रयत्न केला त्यांना कुलियाबी सैन्याकडून गोळ्या घालण्यात आल्या अनेक जण नदीत वाहून गेले. गृहयुद्ध सुरु झाल्यावर वर्षभरातच ताजिकिस्तानात जवळपास पाच लाख लोकं देशांतर्गत निर्वासित झाले.
 
 
रहमोन ह्यांच्या विजयानंतर सी.आय.एस आणि उझबेक सैन्याच्या पाठिंब्यामुळे राजधानी दुशानबे वर कम्युनिस्ट समर्थकांनी विजय मिळवला. रहमोन ह्यांचे सरकार उत्तर अफगाणिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या आतंकवाद्यांच्या पाडाव करण्याकडे जास्त भर देऊ लागले. आतंकवाद्यांनी सरकारी सैन्याचा डोळा चुकवून अफगाणिस्तानातील कुंडुझ आणि माझार-ए-शरीफ ह्या प्रांतात असलेल्या ताजिक निर्वासितांची मदत घेऊन ताजिक मूलतत्ववाद्यांना हत्यारांचा पुरवठा करणे चालूच ठेवले. अफगाणिस्तानातील जमात-ए-इस्लामीच्या मदतीने ताजिक विरोधीपक्षांनी पुनर्गठन चालूच ठेवले. युनाइटेड ताजिक अपोसिशनच्या काही घटकांमुळेच पुढे इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान जन्माला आली.
 
 
ह्या गृहयुद्धात खिसे भरलेल्या अनेक लढाऊ सरदारांनी त्यांच्यामागे उभ्या असलेल्या राजकीय ताकदींना बाजूला सारून ताजिकिस्तानातील छोट्या छोट्या भागांवर आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरवात केली. संयुक्त संघाकडून पर्यवेक्षकांचा गट हिंसाचार घटवण्यासाठी पाठवण्यात आला. युद्धाच्या सुरवातीला ताजिकिस्तानाच्या उत्तर भागापर्यंतच हा हिंसाचार सीमित होता परंतु अफगाणिस्तानातील मूलतत्ववाद्यांच्या साह्यामुळे दक्षिण भागात देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली. संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपामुळे १९९७ रोजी ताजिकिस्तानात युद्धविराम लागला. ट्रॅक II डिप्लोमसीद्वारे अमेरिका आणि रशियाने गृहयुद्धातील मुख्य गटांमध्ये संवाद घडवून आणला.
 
 
ताजिकिस्तानचेअध्यक्ष रहमोनोव आणि यूटीओचे नेते सईद नुरी यांनी शांतता करारावर चर्चा करण्यासाठी मॉस्कोमधील क्रेमलिनयेथे रशियन अध्यक्ष बोरिस येल्स्टीन यांची भेट घेतली. मोस्कॉतील ह्या भेटी आधीच दोन्ही पक्षांकडून युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. सरकारी पदांमधील वाटाघाटींद्वारे राष्ट्रीय सलोखा वाढवणे आणि कैदयांच्या देवाणघेवाणींवरील समस्येवर तोडगा काढणे ह्यासाठी संयुक्त आयोगाने निर्णयसत्र जाहीर केले. रशियाचे परराष्ट्रमंत्री येवगेनी प्रिमकोव्ह यांनी इराण, कझाकस्तान आणि तुर्कमेनिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन प्रस्तावित शांतता करारावर चर्चा केली आणि ताजिकिस्तानात १९९७ रोजी युद्ध समाप्ती झाली.
 
 
खरंतर, अफगाण गृहयुद्ध सुरु असतानाच ताजिकिस्तानमध्ये देखील गृहयुद्ध सुरु होते. परंतु अगदी बोटावर मोजण्या इतपत लोकांना ह्याची कल्पना होती. त्याच मुख्य कारण म्हणजे पत्रकारांचे ह्या युद्धात अमानुष बळी घेतले गेले. अनेक ताजिक पत्रकारांची हत्या करण्यात आली. बरेचसे पत्रकार देश सोडून पळून गेले. जिवंत राहिलेल्या अनेक पत्रकारांनी ह्या विषयावर ना बोलणेच पसंत केले. त्यामुळे ५०,००० इतकी मोठी जीवहानी आणि १० लाखांपेक्षा अधिक लोक निर्वासित होऊन देखील ताजिकिस्तानातील गृहयुद्ध हे संपूर्ण जगासाठी दुर्लक्षितच राहिले.
- शांभवी प्रमोद थिटे
 
 
Powered By Sangraha 9.0