आमची परीक्षा पाहू नका - पेंटागॉनचा शत्रू राष्ट्रांना इशारा.
कोविद-१९ ची लागण झाल्यामुळे अमेरिकन विमानवाहू युद्धनौका आणि तेथील नौसैनिकांना बंदरात परत यावे लागले. ही विमानवाहू युद्धनौका आण्विक क्षेपणास्त्र वाहून नेणारी होती. आमच्या माघार घेण्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा नाही हे आमच्या प्रतिस्पर्ध्यांनी लक्षात घ्यावे असे मिले नी सांगितले.
या आठवड्यात वक्तव्यांमागून वक्तव्ये करत अखेर हा संदेश पेंटागॉनने दिला. आणि त्यांच्या या वक्तव्यांनंतर सद्य परिस्थितीत २०३१ सैनिकांना व्हायरसची लागण झाली असताना अमेरिका युद्धाची संपूर्ण तयारी करत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
"आम्ही अजूनही सक्षम आहोत आणि समोर कोणीही आले तरी त्याच्याशी दोन हात नक्कीच करू शकू. एकही चुकीचा संदेश बाहेर जायला मला नको आहे. ज्यामुळे शत्रू त्याचा गैरफायदा घेईल. जर त्यांनी तसे करायचा प्रयत्न केला तर ती त्यांची भयंकर मोठी चूक असेल हे लक्षात घ्यावे. आमची अशी परिस्थिती ही कोणासाठीही संधी असू शकत नाही." असे जॉईंट चीफ चेअरमन जनरल मार्क मिले यांनी गुरुवारी सांगितले.
आपले प्रतिस्पर्धी असलेल्या रशिया, चीन आणि इराण यांच्याप्रमाणे काही लपवून न ठेवता अमेरिकन संरक्षण विभाग या व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या सैनिक, नागरिक, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांची दररोजची संक्रमित आकडेवारी प्रसिद्ध करत आहे. या बाबतीत पारदर्शकता महत्त्वाची आहे असे त्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी, सैनिकांचे कुटुंबीय, कंत्राटदार आणि संपूर्ण संरक्षण दल यांच्यासह एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या ३,३६६ इतकी आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
संक्रमित ठिकाणे कोणती आहेत हे शत्रूला कळले तर त्यांना लगेच कळून चुकेल की अमेरिकन सैन्याची संख्या कोणत्या जागी कमी आहे. आणि त्याचा फायदा ते घेऊ शकतात म्हणून सुरुवातीला संक्रमित ठिकाणांची माहिती देण्याची चूक केलेले संरक्षण दल आता केवळ संक्रमितांची आकडेवारी तेवढी प्रसिद्ध करीत आहे.
१५० युद्धतळांवर कोविद-१९ ची लागण झाली असल्याचे न्यूजवीकने एका नकाशाद्वारे प्रसिद्ध केले. पेंटागॉनच्या गोपनीयतेला एक मोठे आव्हान देणारी ही घटना आहे. अमेरिकन फेडरेशनचा अण्वस्त्र वैज्ञानिक हंस क्रिस्टनसेन यांच्या नुसार अमेरिकेतील एकच आण्विक तळ वगळता सर्व तळांना या व्हायरसची लागण झाली आहे.
अमेरिकन लष्कर हेच जगातलं शक्तिमान लष्कर आहे हे दाखवण्याची एकही संधी अमेरिका सोडत नाही. जेणेकरून त्यांच्यावर हल्ला करताना प्रत्येक देश १० वेळा तरी विचार करेल. आणि म्हणूनच पश्चिम पॅसिफिकमधील अमेरिकेच्या रूझवेल्टच्या घटनेने पेंटागॉन अस्वस्थ झालं आहे. युद्धनौकेच्या कॅप्टनने जहाजावरील विषाणूच्या उद्रेकासंबंधी जेव्हा पत्र लिहिले तेव्हा सर्व अधिकाऱ्यांना याचा मनस्वी संताप आला. नौदलातील अतिशय संवेदनशील माहिती त्याने उघड केली म्हणून त्याला ताबडतोब बडतर्फ करण्यात आले.
अशाप्रकारच्या धोक्यांबद्दल पेंटागॉन आधीपासून तयारीत आहे. मार्चच्या सुरुवातीसच त्यांनी सबमरिन्स आणि न्युक्लियर मिसाईल्स या दोघांनाही एकमेकांपासून विभक्त करून दोघांसाठी स्वतंत्रपणे काम करणारी "बबल्स" नावाची यंत्रणा स्थापन केली. टीम मधील सदस्यांना १४ दिवस वेगळे ठेवण्यात आले. त्यामुळे एखाद्याला जरी संसर्ग झाला तरी बाकीची टीम सुरक्षित राहते.
कोरोनाव्हायरसाचा विळखा वाढतच चालला आहे. जपानमध्ये गोदीत असलेलेद रोनाल्ड रिगॅन, कार्ल विन्सन आणि निमिट्झ (जी सध्या वॉशिंग्टन मध्ये आहेत.) या तैनात नसलेल्या तीन युद्धनौकांच्यामध्येही तो दिसून येतोय. या नौकांमधील सैनिकांना व्हायरसची बाधा झाली होती पण आता त्यांच्या तब्बेतीत सुधारणा आहे असे नौदलाकडून समजते.
२.३ मिलियन सैनिकांमधील २००० सैनिकांना या रोगाची लागण झाली याचा अर्थ सगळ्या सैनिकांना झाली असा होत नाही. हा आकडा तुलनेने लहानच आहे. आमचे लष्कर अजूनही तितकेच मजबूत आहे. ते केव्हाही प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करू शकण्याच्या तयारीत आहे हे सर्वाना स्पष्टपणे समजून घ्यावे लगेल. येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही कायमच तत्पर आहोत असे मिले यांनी स्पष्टपणे ठणकावून सांगितले.
- प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source : https://news.yahoo.com/hit-virus-pentagon-warns-enemies-dont-test-us-165113632.html
Hit by virus, Pentagon warns enemies: don't test us.