पाकिस्तानी डॉक्टरांच्या पदव्या सौदीने केल्या अमान्य.
         Date: 08-Aug-2019
पाकिस्तानी डॉक्टरांच्या पदव्या सौदीने केल्या अमान्य. 

 

सौदी अरेबिया आणि इतर काही अरब देशांनी पाकिस्तानी डॉक्टरांच्या एमएस (मास्टर ऑफ सर्जरी) आणि एमडी (डॉक्टर ऑफ मेडिसिन) या पदव्यांना केले निष्कासित. या निर्णयामुळे शेकडो डॉक्टर्स बेरोजगार झाले आहेत. मोठी पदवी घेतल्यानंतर पाकिस्तान ऐवजी चांगल्या पगाराच्या लोभामुळे अनेकांनी सौदीमध्ये नोकऱ्या करणे पसंत केले होते. त्यांना सौदीने निघून जाण्यास सांगितले. जे स्वेच्छेने जाणार नाहीत त्यांना हद्दपार केले जाईल असे सौदीने सांगितले.

 

पाकिस्तानी डॉक्टरांना अनुभव नसल्याचे आणि त्यांच्याकडे प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे  कारण सौदीच्या आरोग्य मंत्रालयाने ह्या पदव्या रद्द करताना दिले. महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करताना त्या डॉक्टरला अनुभव असणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. कतार, संयुक्त अरब अमिराती आणि बहारीन यांनीही सौदीच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.

 

२०१६ मध्ये ऑनलाईन अर्ज मागवून नंतर कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये सौदीच्या आरोग्य मंत्रालयाच्या टीमने मुलाखती घेऊन या डॉक्टरांना नियुक्त केले होते.

 

भारत, इजिप्त, सुदान आणि बांगलादेश यांचा पदवी अभ्यासक्रम पाकिस्तान सारखाच असूनही हा निर्णय फक्त पाकिस्तानच्या डॉक्टरांच्या बाबतीतच का असा प्रश्न गोंधळात पडलेल्या आणि नोकरी गमावलेल्या एका पाकिस्तानी डॉक्टरने डॉन शी बोलताना विचारला. डॉन च्या प्रतिनिधीने सौदीच्या आरोग्य विषयक कमिशनने (एससीएफएचएस) जारी केलेल्या अनेक डॉक्टरांच्या सर्व्हिस टर्मिनेशन लेटरच्या प्रती मिळवल्या आहेत.  " तुमची व्यावसायिक पात्रता नाकारली गेली आहे. तुमची पाकिस्तानात मिळवलेली मास्टर डिग्री एससीएफएचएसच्या नियमांत बसत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे," असे त्या लेटर मध्ये लिहिले गेले आहे.

 

 

या निर्णयामुळे नोकरी गमावलेले डॉक्टर आणि काही वरिष्ठ आरोग्य अधिकारी कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जनस पाकिस्तान (सीपीएसपी) ला आपले करियर बरबाद करण्यासाठी जबाबदार धरत आहेत.

 

देशाच्या प्रतिमेला हा धक्का आहे असे मत असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी फिजिशियन अँड सर्जन पाकिस्तानचे प्रवक्ते डॉ असद नूर मिर्झा यांनी मांडले. पाकिस्तानच्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाविषयी विकृत किंवा चुकीची माहिती सीपीएसपी प्रतिनिधींनी नुकत्याच झालेल्या सौदी अरेबिया आणि काही आखाती देशांच्या भेटीदरम्यान दिली असल्याचा त्यांनी दावा केला. सीपीएसपी पुरस्कृत एफसीपीएस  ची मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी जाणूनबुजून असे केले असल्याचा त्यांनी आरोप केला. त्यांच्या या वक्तव्याला डॉक्टर उस्मान या अचानक बेरोजगार झालेल्या डॉक्टरांच्या प्रतिक्रियेमुळे दुजोरा मिळतोय.  डॉ. उस्मान यांनी सांगितले की जेव्हा त्यांनी सौदी अरेबियाच्या कोलॅबोरेशन डिपार्टमेंटचे महासंचालक सईदुल बरकी यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की सीपीएसपीच्या शिष्टमंडळाने आमच्या अधिकाऱ्यांना सांगितले की एफसीएसपी वगळता पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण-आधारित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी नाही. श्री. बरकी म्हणाले की, सीपीएसपी अध्यक्षांनी सौदी अरेबियातील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका घेतल्या आणि येथील नोकरीसाठी फक्त एफसीएसपी पात्र पाकिस्तानी डॉक्टर्सचा विचार करण्यास सांगितले.

 

ते म्हणाले की सीपीएसपीने एससीएफएचएसची दिशाभूल केली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. जावेद अक्रम यांनी एमएस / एमडी पदवी अभ्यासक्रम उत्तम असल्याचा निर्वाळा दिला. हा अभ्यासक्रम पाच वर्षाचा आहे आणि योग्य प्रकारे त्याचे नियोजन केलेले आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेडिकल एज्युकेशनने आखून दिलेल्या आंतरराष्ट्रीय मानदंडांना अनुसरून याची आखणी केली आहे. असेही त्यांनी सांगितले.

 

अधिकृत आकडेवारीनुसार, सध्या पाकिस्तानमधील विविध सरकारी आणि खासगी वैद्यकीय संस्थांमध्ये ४,४४० एमएस आणि एमडी डॉक्टर्स आपली सेवा पुरवत आहेत. त्यापैकी १०२ वरिष्ठ प्राध्यापक आहेत.

 

त्यांनी सांगितले की सौदी मधील त्यांचे अधिकारी अरब देशांशी लवकरच याविषयी बोलतील.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: DAWN

 

Pakistani doctors with MS, MD degrees sacked in Saudi Arabia.

 

Saudi Arabia, pakistan, SCFHS, CPSP, FCPS