@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ हॉन्गकॉन्ग निदर्शने आणि चीनी महासत्तेवरील संकट

हॉन्गकॉन्ग निदर्शने आणि चीनी महासत्तेवरील संकट

हॉन्गकॉन्ग निदर्शने आणि चीनी महासत्तेवरील संकट  
 
(ICRR South China Sea/ Senkaku Islnds) 
 

 
हॉन्गकॉन्गचे नागरिक, प्रस्तावित प्रत्यार्पण कायद्याच्या विरोधात रस्त्यांवर आले आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. इथल्या लोकांच्या मते हा कायदा प्रामुख्याने चीनी महासत्तेच्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी वापरला जाण्याची मोठी शक्यता आहे.
हॉंगकॉंग हे चीनचा भाग असले तरी 'विशेष प्रशासकीय क्षेत्र' असा विशेष दर्जा त्याला मिळालेला आहे. इथली कायदेव्यवस्था चिनी प्रशासनापेक्षा वेगळी आहे. 'स्पष्ट बोलण्याचे स्वातंत्र्य' जे चिनी राजवटीतील जनतेला दुष्प्राप्य आहे ते येथील समाजाने आजपर्यंत पुरेपूर उपभोगले आहे. जर हा एक्सट्रॅडीशन कायदा संमत झाला तर इथल्या राजकीय विरोधकांना चिनी प्रोव्हिन्सस मध्ये नेले जाईल आणि त्यांच्यावर विविध प्रकारची अन्यायकारक बंधने लादण्यात येतील अशी भीती इथे लोकांना वाटते आहे. कॅर्री लॅम या हॉंगकॉंगच्या प्रशासक बाईंनी हा कायदा इथल्या जनतेवर थोपण्याचा चंग बांधला आहे.
 
 
साऊथ ईस्ट आशियाचं आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं हे शहर वरील कारणांमुळेच गेल्या जवळजवळ ३ महिन्यांपासून प्रचंड वादाच्या भोवऱ्यात आणि अतिशय तीव्र अश्या निषेधलाटेत सापडलं आहे. हॉंगकॉंगच्या चीफ एक्सिक्युटिव्ह कॅरी लॅम यांनी निषेधकर्त्यांना कोणतीही सवलत किंवा विसावा मिळू दिलेला नाहीये. परंतु तरीही या लोकशाहीच्या शिलेदारांनी माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. गेल्या आठवड्यापासून तर निदर्शक आणि पोलिसकर्मी यांच्यातली रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. पाण्याचे फवारे, अश्रूधूर, सुरक्षा अडथळे  इत्यादींचा सर्रास वापर रस्त्यावर उतरलेल्या निषेधकर्त्यांना पळवून लावण्यासाठी केला जातो आहे.
 
 
उद्या शुक्रवारपासून 'स्टॅन्ड इन सायलेन्स' नावाने येथे मूकमोर्चा काढला जाणार आहे. पण याची परवानगीही लोकांच्या सुरक्षेचे कारण देऊन पोलीस प्रशासनाने नाकारली आहे. शनिवारी दुपारी २ वाजता विशाल रॅली चे आयोजन केले गेले आहे. पाच वर्षांपूर्वी याच दिवशी चीनी सरकारने सार्वत्रिक मताधिकाराला सशर्त मान्यता देण्याची तयारी दर्शवली. अश्या या अटी घालून केलेल्या ऑफरला स्पष्ट नकार दिला गेला होता. आणि म्हणूनच त्या दिवशी निदर्शनकर्त्यांचा विमानतळावर मोर्चा नेण्याचा मानस आहे. पण हा विरोध मोडून काढण्यासाठी यावेळी चिनी व्यवस्थापनाची चांगली व्यवस्था झाली असल्याचे दिसते. तसच १ सप्टेंबरला २ दिवसांचा बंद विविध शैक्षणिक संस्था, हॉंगकॉंग महाविद्यापीठ इथे पुकारण्यात येणार आहे.
 
 
या सगळ्याचा विचार करता बिजिंगने हजारोंच्या संख्येने नव्या पोलिसदलाची तैनात इथे केली आहे. चीनची लोकशाहीवादी मोर्चेकऱ्यांविरुद्ध वाढती अस्वस्थता आणि असहिष्णुता यांचच हे प्रमाण आहे. PLA ची वाहने, सैनिकसंख्या यात झालेली प्रचंड वाढ हॉंगकॉंग मधील जनतेच्या मनात दशहत बसवत आहे.
 
 
१ ऑक्टोबरला चीनचा ७०वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे येणारा महिना चीन हॉंगकॉंग, तैवान सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. शी जीनपिंग काहीही करून हॉंगकॉंग आपल्या ताब्यात घेऊ इच्छितात आणि तिथला विरोध, बंडाळी मोडून काढण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
 
----  अमिता आपटे