काश्मीरनंतरच्या सर्वव्यापी युद्धाबद्दल थोडं...
         Date: 10-Aug-2019
काश्मीरनंतरच्या सर्वव्यापी युद्धाबद्दल थोडं...
 
(ICRR- Insurgency/ Conuterinsurgency)
 

 
 
 
कलम ३७० आणि ३५-अ रद्द केल्यानंतर भारतात दिवाळी फिकी पडेल असा प्रचंड विजयोत्सव सुरू आहे. जे झालंय ते अविश्वसनीय आणि अकल्पनीय नक्कीच आहे. हे स्वप्न बघत राष्ट्रवाद्यांच्या जवळपास २ पिढ्या गेल्या. त्यातील जे वयोवृद्ध आता  ऐशी- नव्वदीच्या घरात आहेत त्यांना जीवनाचं सार्थक झाल्याची भावना आहे.
 
 
पण.....
 
याचा उत्तरार्ध अतिशय भयंकर असु शकतो आणि त्याच्या झळा अख्या भारतात सव्वाशे कोटी जनतेपैकी कुणालाही आणि कुठेही बसु शकतात. याचा विचार करून शांत आणि सावध राहणं आवश्यक आहे. त्या कशा याचा थोडक्यात विचार करु.
 
 
काश्मीरमध्ये बदल फक्त भारत पाकिस्तान संबंधात बदल आणणारे नाहीत, यामुळे चीन, मध्य आशियासह अरब आणि अफगाणिस्तान यांच्यावर दूरगामी परिणाम होतील. त्यामुळे त्याला हे बदल फायद्याचे नाहीत ते पाकिस्तानला उघड, छुपी मदत, फूस लावून भारताला त्याची किंमत मोजायला लावतील. पाकिस्तानमधून भारताविरुद्ध सैनिक कारवाई आणि काश्मीर जिहादसाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय असेल आता कळायला मार्ग नाही. पण ढोबळ मानाने खालील आघाड्यांवर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊ शकतं.
 
थेट युद्ध किंवा असिमेट्रिक वॉरफेयर
 
 
थेट युद्ध पाकिस्तानने लादल्यास भारताची पश्चिम सीमा थोडी किंवा संपूर्ण युद्ध अनुभवेल आणि यात फक्त सैन्याची भूमिका असेल. पण असिमेट्रिक वॉरफेयरची कक्षा खुप मोठी आहे.
 
 
असिमेट्रिक वॉरफेयर
 
 
या प्रकाराचं यथार्थ वर्णन करायचं झालं तर "जे हाती लागेल त्या वस्तुने मारामारी" असं होऊ शकतं. प्रामुख्याने काश्मीरच्या फुटीरतावादी तरुणांना, संघटनांना मदत पुरवुन जाळपोळ, दगडफेक, सरकारी इमारती, मालमत्ता यांचा नाश असे प्रकार यात होतील.
 
पण सध्या पाकिस्तानला ३७० जाण्याने झालेली खोल जखम बघता या 'असिमेट्रिक' युद्धाची व्याप्ती संपूर्ण भारतात पसरवण्याची पाकची मानसिकता दिसते. सैनिकी युद्धात जेवढा खर्च येतो त्याच्या लाखाव्या भागाएवढा अत्यल्प खर्च या युद्धात येतो. थोडक्यात प्रत्यक्ष युद्धात जो मानसिक परिणाम साधायला १,००,००० रुपये खर्च येईल तोच परिणाम 'असिमेट्रिक' युद्धात १ रुपयात साधता येतो.
 
 
पाकिस्तान कुणामार्फत लढेल हे युद्ध?
 
 
भारतात पसरलेले छुपे पाक हस्तक ( स्लीपर सेल्स), ड्रग माफिया, गुंड टोळ्या, माओवादी- नक्षलवादी, भौगोलिक स्वायत्तता, स्वातंत्र्य मागणारे गट, ज्यांना भारत पाकिस्तान संघर्ष अजिबात माहीत नाही असे स्वार्थी दबावगट यांच्यापैकी कुणीही या 'असिमेट्रिक वॉरफेयर" मध्ये पाकिस्तानचं प्यादं म्हणून वापरला जाऊ शकतो. लहान सहान शहरी भागातील अतिरेकी कारवाया, घातपात असे प्रकार, जिथे सैन्याची, पोलिसांची दैनंदिन पण मोठी मूव्हमेंट असते अशा ठिकाणी त्यांच्यावर हल्ले, गर्दीच्या ठिकाणी अतिरेकी कारवाया हे ह्याचं ढोबळ स्वरूप असेल.
 
याचा उद्देश काय?
 
** अशा घटना घडवून त्याचा ३७० जवळ संबंध जोडणारी विधाने छापुन आणणं,
** बघा काश्मीरजवळ खेळुन सरकारने लोकांना धोक्यात घातलं आणि निर्णय घेणारे सुरक्षित आहेत ही भावना सामन्य मनात घुसवणं,
** काश्मीरमध्ये दादागिरी करणारे उर्वरीत भारतात तुमचा जीव वाचवू शकत नाहीत हा संदेश पोचवणं,
** सरकार आमच्यापासुन तुम्हाला वाचवु शकत नाही ही भावना तयार करणं,
** काश्मीरला तुमचं सैन्य अत्याचार करतं त्याचा आम्ही भारतात कुठेही बदला घेणं योग्य आणि न्याय्य आहे हे ठसवणं,
** ३७० रद्द करेपर्यंत समस्या, अशांती फक्त काश्मीरमध्ये होती आता ती संपूर्ण भारतात पसरेल, याला जबाबदार तुमचं सरकार आहे आम्ही नाही, हे हिंसा करून लोकांना कळवणं,
 
 
सध्या याची पहिली पायरी सुरू झाली आहे, त्याअंतर्गत काश्मीर संबंधित तद्दन खोटी माहिती, बातम्या पसरवल्या जात आहेत. तिथला कर्फ्यु उठल्यावर कदाचित हिंसेचा भडका उडेल, त्यावेळी खोट्या बातम्या वेगाने पसरवल्या जातील.
 
 
त्यामुळे इथुन पुढे आलेली प्रत्येक बातमी खोटीच असेल असं गृहीत धरून आपण ती कुठेही पोस्ट नं करता फॉरवर्ड नं करता आपल्याजवळ ठेवणं आणि "फियर ऑफ मिसिंग ऑपोरच्युनीटी- FOMO" या इंटरनेटशी संबंधित मानसिक आजारापासून आपल्याला लांब ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
 
 
याशिवाय काश्मिरी जमिनी, मुलीबाळी यांचे बाजार लागलेत अशा थाटात केलेले फालतु जोक आणि मिम्स आल्या आल्या आपल्या फोनमधून डिलिट करून ते आपल्या हातुन पुढे जाणार नाहीत याची काळजी घेणे देशहिताच्या (आणि आपली "क्वालिटी" सिद्ध करण्याच्या) दृष्टीने अत्यावश्यक आहे.
 
 
(या लिखाणामागील उद्देश घबराट निर्माण करणं नसुन जागरुकता आणणं हा आहे. यात मांडलेले मुद्दे गुप्तचर सुचनेवर आधारीत नसुन पाकिस्तानी नेते, पाकिस्तानी सामान्य माणसाने सोशल मीडियावर व्यक्त केलेले विचार आणि राग तसेच निवृत्त भारतीय अनुभवी अधिकारी यांच्या लिखाणातून काढलेल्या निष्कर्षावर आधारीत आहेत. यातील एकही दुर्घटना नं घडो अशी प्रार्थना/अपेक्षा आहे!!!)
 
 
--- विनय जोशी