@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@
कोण आहे ही आसिया अंद्राबी?
दहशतवादी कृत्यांसाठी निधी पुरवल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) जम्मू - काश्मीर मधील फुटीरतावादी गटाची लीडर आसिया अंद्राबी हिला अटक केली आहे. तसेच तिचे राहते घर सील करण्यात आले आहे. तिच्या घरातून अनेक देशविघातक कृत्ये केली जात असल्याचे ठोस पुरावे एनआयए ला मिळाले असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत अंद्राबी ते घर विकू शकत नाही.
अंद्राबी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. एनआयएच्या चौकशी दरम्यान आपल्याला भारताविरुद्ध मुस्लिम स्त्रियांचे आंदोलन घडवून आणण्याकरिता बाहेरून निधी मिळवत असल्याची तिने कबुली दिली. तसेच एका पाकिस्तानी आर्मी ऑफिसरच्या मदतीने तिची लष्कर-ए-तोयबा चा प्रमुख हाफिज सईद याच्याशी ओळख झाली आणि नंतर त्याच्याशी तिचे जवळचे संबंध असल्याचे तिने चौकशीदरम्यान कबूल केले. २०११ पासून मलेशियामध्ये शिकत असणाऱ्या आपल्या मुलाचा सर्व शैक्षणिक खर्च काश्मिरी बिझिनेसमॅन झहूर वाटली हे करीत असल्याचे त्यांनी मान्य केले. हाच तो झहूर वाटली जो जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्ये करण्यासाठी पाकिस्तानकडून निधी घेतल्याप्रकरणी तुरुंगात आहे.
आसिया ही दुख्तरान-ए-मिल्लत (देशाच्या कन्या) या महिलांच्या संघटनेची संस्थापिका आहे. ही संघटना ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनेची महिला शाखा आहे. भारत सरकारने केव्हाच या संघटनेवर दहशतवादी संघटना म्हणून बंदी घातली आहे. काश्मीरला भारतापासून वेगळे करणे हेच या संघटनेचे उद्दिष्ट आहे.
भारताविरुद्ध काश्मीरमध्ये झालेल्या अनेक बंडांमध्ये आसियाच्या संघटनेचा खूप मोठा हात होता. जवानांवर दगडफेक करणाऱ्या महिला या हिच्याच संघटनेच्या. २०१० मध्ये संपूर्ण काश्मीरमध्ये जी स्टोन पेलटिंग रॅली काढण्यात आली त्यात आसियाचा मोठा वाटा होता. गोहत्या बंदी चा निषेध म्हणून २०१५ साली गायीची सार्वजनिक कत्तल करून त्याचा विडिओ तिने प्रसारित केला होता. एवढेच नाही तर काश्मीरमध्ये तिने पाकिस्तानचा झेंडा फडकावून पाकिस्तानचे राष्ट्रगीत सुद्धा गायले होते. देशद्रोही कारवाया केल्यामुळे तिला आतापर्यंत अनेक वेळा अटक झाली आहे. पाकिस्तानशी कॉन्फरन्स कॉलवर देशविघातक कृत्यांची चर्चा केल्यावरून तिला सप्टेंबर २०१५ मध्ये अटक करण्यात आली पण नंतर तिला जामीन मिळाला.
२००८ चा मुंबई दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतातील दहशतवाद नाहीसा होण्यासाठी एनआयए ची स्थापना केली गेली. आसिया अंद्राबी च्या विरुद्ध एनआयए कडे सबळ पुरावे आहेत. देशांतर्गत युद्ध पसरविणे आणि हिंसाचार करण्यास प्रवृत्त करणे असे गुन्हे तिच्या नावावर आहेत.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Content Generation)
Who is Dukhtaran-e-Millat founder Asiya Andrabi?