@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@
भारतीय गुप्तचर संघटनेने केले होते श्रीलंकेला सावध.
बॉम्बस्फोट व्हायच्या १७ दिवस आधी भारताने श्रीलंकेला धोक्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सुद्धा दोन वेळा त्यांना सावधगिरीची सूचना भारताने दिली.
श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी रविवारी झालेल्या बॉम्बहल्ल्यात ३२१ जण ठार झाले आणि ५०० जण जखमी झाले. या हल्ल्याची पूर्वसूचना भारताकडून श्रीलंकेला तीन वेळा देण्यात आली. बॉम्बहल्ल्याच्या दिवशी सुद्धा याची पूर्वसूचना श्रीलंकेला देण्यात आली होती असे नाव उघड न करण्याच्या अटीवर गुप्तचर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
डिसेंबर २०१८ मध्ये नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) ला नॅशनल तौहीद जमात (एनटीजे)चा लीडर मौलवी जहरान बिन हाशिम हा इस्लामिक स्टेट (आयएस) कोईमतूर मॉड्यूल विषयी चौकशी करतानाचा व्हिडिओ आढळला. हे पाहून भारतानेही या व्हिडीओसंदर्भात आपला तपास सुरु केला.
४ एप्रिलला भारताने पहिली धोक्याची सूचना श्रीलंकेला दिली. चर्च सोबतच कोलंबोमधील भारतीय उच्चायोगाला सुद्धा लक्ष्य केले जाऊ शकते असे भारतीय गुप्तचर एजन्सीने श्रीलंकेला सांगितले होते. दुसरी सूचना हल्ल्याच्या एक दिवस आधी देण्यात आली होती. ज्यामध्ये संभाव्य हल्ल्यांच्या ठिकाणाची तपशीलवार माहिती आणि नावे सुद्धा होती. असे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आत्मघाती बॉम्बर ज्या ३ चर्चवर आणि ४ हॉटेलवर हल्ला करणार होता त्याविषयीची शेवटची सूचना तर हल्ल्याच्या काही तास आधीच देण्यात आली होती.
" या हल्ल्यांबद्दलची माहिती तांत्रिक माहितीस्रोत आणि मानवी स्रोतांनी जमवलेल्या माहितीच्या तपशीलवार एकत्रीकरणाचे यश आहे," असे त्यांनी सांगितले. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमेसिंघे यांनी कबूल केले की भारताने अलर्ट पाठवले होते.
"भारताच्या गुप्तहेर खात्याने आम्हाला सावध केले होते. परंतु त्यावर ताबडतोब कारवाई करण्यास आम्ही असमर्थ ठरलो. प्रसंगाचे गांभीर्य ओळखण्यात आमची चूक झाली." विक्रमेसिंघे यांनी एका विशेष मुलाखतीत एनडीटीव्हीला सांगितले.
हाशिमच्या व्हिडीओचे विश्लेषण केलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या अनेक अधिकार्यांशी एचटी ने चर्चा केली. या व्हिडिओमध्ये हाशीमने श्रीलंका, तामिळनाडू आणि केरळमधील मुस्लिम युवकांना त्यांच्या देशात इस्लामिक कायदा स्थापन करण्यास उद्युक्त केले आहे. त्याच्या सर्व व्हिडिओचा अगदी बारकाईने तपास आणि अभ्यास भारताच्या बाह्य गुप्तचर संस्था आर अँड एडब्ल्यू (रिसर्च अँड अनालिसिस विंग) ने केला आहे.
१९ डिसेंबर २०१८ रोजी आयएसआयएस चे संशयित असलेले मोहम्मद आशिक ए, इस्माईल एस, शमसुद्दीन, मोहम्मद सलाउद्दीन एस, जाफर शादीक अली आणि शाहुल हमीद यांच्या राहत्या ठिकाणावर म्हणजेच चेन्नईतील उक्कडम, ओट्टेरी, विल्लुपुरम जवळील तिंडीवनम आणि कोईमतूर येथील व्हरायटी हॉल रोड वर एनआयए ने घातलेल्या छाप्यात पेन ड्राइव, मेमरी कार्ड्स, मोबाइल फोन आणि सीडी / डीव्हीडीमध्ये संग्रहित करून ठेवलेले अनेक व्हिडीओज जप्त करण्यात आले.
कोईमतूर येथील हिंदू पुढार्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याची योजना आखल्याचा आरोप या सहा आयएसच्या सदस्यांवर ठेऊन त्यांना १ सप्टेम्बर २०१८ रोजी अटक करण्यात आली. कोईमतूर मॉड्यूलचे सदस्य नियमितपणे हाशीमचे भाषण ऐकत होते असे गुप्तचर अधिकारी म्हणाले. या सहा जणांवर एनआयएने चार्जशीट दाखल केले आहे.
"हाशीमचे हे व्हिडीओ अलीकडीलच असून त्यात तो खूप आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. त्यात तो त्याच्या कार्यकर्त्यांना आश्वासन देताना दिसत आहे की लवकरच असे काही होईल की ज्यामुळे शरियाचे पालन न करणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी धडा शिकविण्यात येईल." असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
पुढील तपासणीत असे आढळून आले की कोईमतूर मॉड्यूलचे काही सदस्य हाशीमला फॉलो करणाऱ्या श्रीलंकेतील काही लोकांच्या संपर्कात होते. भारत आणि श्रीलंकेतील या तरुणांना जहालमतवादी बनविण्यामागे आणि इस्लामिक स्टेट मध्ये सहभागी करण्यामध्ये बिन हाशीमचा मोठा हात होता. पण कोईमतूर मॉड्यूलला श्रीलंकेमध्ये काय योजले जात आहे याची कल्पना नव्हती. अशी माहिती त्यांनी दिली.
त्यानंतर भारतीय एजन्सींनी हशिमचा मोबाइल नंबर देखील शोधला आणि त्यांना आढळून आले की हाशिम बांगलादेशातील काही आयएस कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की बांगलादेशने देखील सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
एनआयए, इंटेलिजन्स ब्युरो आणि आर अँड एडब्ल्यू यांनी जमा केलेल्या माहिती आणि तपासाचे विश्लेषण करून अभ्यासाअंती हल्ल्याविषयीचे सर्व तपशील श्रीलंकेला पाठविण्यात आले होते.
परंतु श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीला तेवढे महत्त्व दिले नाही आणि ११ एप्रिलला देशाला फक्त एक सावधानतेचा इशारा दिला.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: HT
India’s first alert sent to Lanka 17 days before deadly bombing, then 2 more