@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@
बालाकोट २ साठी काय तयारी करणे आवश्यक आहे?
एअर मार्शल रमेश राय यांच्या लेखाचे स्वैर भाषांतर
२६ फेब्रुवारीला केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकने भारताला दहशतवादाच्या लढाईत एका उंचीवर नेऊन ठेवलं. शत्रूच्या प्रदेशात सैन्य न उतरवता जलद गतीने आणि कमीत कमी वेळात शत्रूवर हल्ला करून परत येण्याचे कसब हवाई दलात असल्याने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अनेक देश हवाई दलाला महत्त्वाचा घटक मानतात. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारताने दहशतवादासंबंधी सगळ्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. म्हणजेच दहशतवादी व्यक्ती, गट, त्यांचे तळ, त्यांच्या सुरक्षित लपून बसण्याच्या जागा (सेफ हेवन्स ) आणि त्यांचे लाँच पॅड्स यांची इत्यंभूत माहिती काढून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या लोकांवर वचक ठेवला पाहिजे. सीमावर्ती भागातील दहशतवाद हा एका एअर स्ट्राईकने नष्ट होणार नाही.
बालाकोट येथील दहशतवाद प्रशिक्षण शिबिर हे कुन्हार नदीच्या काठावर नागरी वस्तीपासून दूर, हवाई कक्षेच्या सहज टप्यात येणार नाही अश्या ठिकाणी होते. प्रचंड पाळली गेलेली गुप्तता आणि अचानक केलेल्या धडक कारवाईमुळेच हे शक्य झालं. पाकिस्तानचे हवाईदल झोपेत असतानाची वेळ अचूक हेरून केलेल्या या स्ट्राईक ने त्यांची झोप उडवली आहे. त्यांनी त्यांची हवाई संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम केली असू शकते. भारताने ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. नजीकच्या काळात आपण जर पुन्हा अशी कारवाई केली तर त्यांचे हवाई संरक्षण दल आपल्याशी दोन हात सुद्धा करू शकेल. यासाठी वेगळी यंत्रणा आवश्यक आहे.
आता प्रत्येक हवाई कारवाई करताना वेगवेगळ्या युक्त्या आणि रणनीती चतुरपणे वापरण्याची गरज आहे. काही पर्याय खाली देत आहे.
ए ) एअर डिफेन्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, एडब्ल्यूएसीएस कव्हर अंतर्गत स्टॅन्डऑफ जॅमर्स यांनी युक्त मिराज आणि SU-30 यांची घुसखोरी क्षेत्रातील मोक्याच्या ठिकाणी तैनात करणे.
बी ) ३०० किलो वॉरहेड आणि एक मीटर सीईपी ची क्षमता असलेले मिडीयम रेंज (४०० किमी ) सुपरसॉनिक मिसाईल ब्राह्मोस. अचूक आणि सुपरसॉनिक स्पीड यामुळे लक्ष्यावर अचूक नेम साधण्यास महत्त्वाचे हत्यार. ४०० किमी एवढी मोठी रेंज असल्यामुळे याच्या कक्षेत बरीचशी लक्ष्य येऊ शकतात.
सी ) ब्राह्मोसचीच आवृत्ती असलेले मानवरहित कॉम्बॅट एअर व्हेकल ( यूसीएव्ही) रुस्तम II युएव्ही वर बसविले जाऊ शकते. डीआरडीओ AURA नावाचा स्टिल्ट यूसीएव्ही विकसित करीत आहे जो क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि प्रिसिजन गाईडेड म्युनीशन्स प्रक्षेपित करण्यास सक्षम असेल. त्यांच्या या प्रयत्नांना वेग येऊ शकेल. पाकिस्तानी रडार स्टील्ट युसीएव्ही शोधण्यास सक्षम नसतात. त्यामुळे ते आपले इच्छित लक्ष्य सहज गाठू शकतील.
डी ) १००० किमी चा पल्ला गाठू शकणारी आणि २०० ते ३०० किलो वजन वाहू शकणाऱ्या २४ वेगवेगळ्या प्रकारच्या वॉरहेड्स वितरित करू शकणाऱ्या निर्भय सारखी लँड बेस्ड क्रूझ मिसाईलची तैनात करणे. ४ मीटर सीईपी असल्यामुळे हे लक्ष्यावर जोरदार मारा करू शकते. परंतु लँड बेस्ड किंवा शिप बोर्न क्रूझ मिसाईल वापरले तर पाकिस्तानकडून अश्याच प्रकारचा धोका संभवतो.
वरील सर्व शक्यता तेव्हाच शक्य होऊ शकतात जेव्हा त्या सायबर टूल्सचा योग्यप्रकारे वापर करून हाताळल्या जातील. ६ सप्टेंबर २००७ ला सीरियाच्या देईर इझ-झोर प्रदेशातील अल किबर येथील संशयित अणुऊर्जा केंद्रावरील हवाई हल्ल्यादरम्यान केलेल्या ऑपेरेशन ' आउटसाइड द बॉक्स ' च्या वेळी इस्राईलने यूएस एअर फोर्सच्या " सटर नेटवर्क अटॅक सिस्टम” सारख्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर टेक्नॉलॉजी सोबत सायबर टेक्निक्स चा वापर केला होता. ज्याने सीरियन रडार्स ला चकमा दिला होता. सायबर टूल्स वापरून सीरियन रडार्सच्या सेंसर्सना गोंधळात टाकून चुकीचे लक्ष्य दाखविले. पाकिस्तानपासून बचाव करण्यासाठी अश्या प्रकारच्या यंत्रणा विकसित करणे आणि अमलात आणणे गरजेचे आहे.
दहशतवाद संपवण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे व्यक्ती, गट किंवा त्यांचे तळ यांच्यावर गुप्तहेरांकडून नीट पाळत ठेवणे, टेहळणी करणे आणि त्याप्रमाणे योजना आखणे. दहशतवादी ही जमात निसटून जाण्यात पटाईत आहे. त्यांच्या हालचाली या मर्यादित स्वरूपाच्या असतात. ते सापडण्याची काही ठराविक ठिकाणे आहेत ती पाळत ठेऊन नष्ट केली जाऊ शकतात. या सगळ्या प्रक्रियेला " साखळी तोडणे (किल चेन) " म्हटले जाते. या प्रक्रियेमध्ये वेळेला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुप्तचर यंत्रणा, पाळत ठेवणे, माग काढणे, संपर्क ठेवणे, हवाई संरक्षण निर्णय घेणे आणि ते अमलात आणणे अश्या अनेक बाबींची या कामी एकत्र मोट बांधून ठराविक वेळेत काम साध्य करणे आवश्यक असते. यामध्ये गुप्तचर यंत्रणा आणि प्रत्यक्षात केली जाणारी ऑपरेशन्स यांच्यात असलेला समन्वय हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी कारवाईत त्यांची गुप्तचर संस्था सीआयए चा मोठा हात आहे.
आमची हवाई ऑपरेशन्स आम्हाला गुप्तचर यंत्रणेशी जोडून कृती करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने एक यंत्रणा तयार करावी लागेल. पाकिस्तानात असलेल्या लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करण्याकरिता गुप्तचर संघटना आणि हवाई ऑपरेशन्स यांनी काही काळापुरते ठराविक पद्धतीने आणि एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि वेळेचं भान ठेऊन भारतीय गुप्तचर संस्था आणि हवाई ऑपरेशन यांनी विलीनीकरण करावे आणि आपली योजना आखावी.
दहशतवाद विरोधी हवाई कारवाई मुळे भारताने आपली लष्करी प्रहार क्षमता सिद्ध केली आहे. जिथे जिथे दहशतवादी दिसतील तिथे तिथे त्यांना लक्ष्य केले जाईल. या आक्रमकतेमुळे दहशतवाद्यांपर्यंत आपली हयगय केली जाणार नाही हा संदेश पोचला आहे. हवाई साधनांचा त्यांच्या संपूर्ण क्षमतेसह वापर केला गेला पाहिजे. हवाई शक्तीचा पुरेपूर वापर केला गेला पाहिजे. त्यांची क्षमता विकसित केली गेली पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार आणि मदत घेतली पाहिजे.
दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी हवाई शक्ती हाच एकमेव उपाय आहे असे मुळीच नाही. पण हा सर्वोत्तम पर्याय नक्कीच आहे. दहशतवादाविरुद्ध युद्ध जिंकायचे असेल तर आपल्या सगळ्या क्षमतांचा आणि स्रोतांचा वापर करणे आवश्यक आहे.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source : tribuneindia
Preparing for the next Balakot-type strike.