ट्रेड टाॅक होऊ घातले असतानाच युएसची एक आरमारी युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात येऊन थडकली.
एकीकडे यूएसचे अधिकारी ट्रेड वॉर संदर्भात बीजिंगशी बोलणी करायला बीजिंगमध्ये दाखल झाले असतानाच दुसरीकडे विवादित दक्षिण चीन समुद्रामध्ये युएसची मिसाईल आरमारी युद्धनौका येऊन थडकते याचा अर्थ युएसने जाणूनबुजून काढलेली ही खोडी आहे असे चीनने म्हटले आहे.
यूएसएस मॅककॅम्पबेलने "फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन" च्या मोहिमेअंतर्गत पॅरासेल आयलंड च्या आतील भागात १२ मैल प्रवास करून " समुद्रावर अधिकचा हक्क दाखवणाऱ्या" चीनला जणू चेतावणीच दिली आहे असे पॅसिफिक फ्लीट प्रवक्त्या रॅचेल मॅकमार यांनी ईमेलद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
एखाद्या विशिष्ट देशाच्या विरोधात अथवा कोणतेही राजकारण या मोहिमेत नसल्याचे मॅकमार यांनी नमूद केले.
त्यांचे हे वक्तव्य बीजिंग मध्ये यूएस आणि चीन यांच्यात होणाऱ्या व्यापार चर्चेविषयी होते. आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम घडत असल्यामुळे यूएस आणि चीन ने ९० दिवस त्यांच्यामधील ट्रेड वॉर ला स्थगिती दिली असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रथमच दोन्ही देश समोरासमोर येऊन चर्चा करणार आहेत.
युएसने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका घुसविल्यामुळे चीनचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत आहे आणि चीनने कठोर शब्दात याचा निषेध नोंदविला आहे. असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी सांगितले. अश्या प्रकारची चिथावणी त्यांनी ताबडतोब थांबवावी अशी विनंती मी यूएस सरकारला करीत आहे. चीनने लष्करी जहाजे आणि विमाने पाठवून युएसच्या या युद्धनौकेची खात्री करून घेतली असल्याचेही त्यांनी निमूद केले.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की या युद्धनौकेने " चीनच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण केले आहे."
आम्ही अतिशय सतर्क आहोत. हवाई आणि समुद्री परिस्थितीवर अगदी बारीक नजर ठेऊन आहोत. आमच्या सार्वभौमत्वावर आणि सुरक्षिततेसंदर्भात आम्ही कसलीही हयगय करणार नाही. निकराने लढा देऊ असे चीनमधील सर्व माध्यमांनी सांगितले आहे.
ट्रेड टाॅकविषयी विचारले असता लू म्हणाले की जर समस्या सोडविल्या गेल्या तर दोन्ही देश आणि संपूर्ण जगाच्या दृष्टीने ते फायद्याचे ठरेल. परंतु यासाठी दोन्ही देशांनी जबाबदारीने आणि सकारात्मकतेने हा विषय हाताळणे गरजेचे आहे.
चीन जवळपास संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपले अधिपत्य दाखवीत आहे. आणि चीनने दावा केलेल्या बेटांवर अथवा बेटांच्या जवळून दळणवळण करण्याबद्दल चीनने अनेक वेळा अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांना चेतावणी देखील दिली आहे. व्हिएतनाम, फिलिपाइन्स, ब्रुनेई, मलेशिया, इंडोनेशिया आणि तैवान हे देखील या प्रदेशावर हक्क दाखवीत आहेत.
एकमेकांच्या करोडोंच्या आयात-निर्यातीवर जी अवाजवी जकात ट्रम्प आणि शी जिनपिंग यांनी सुरु केली होती आणि जशास तसे म्हणून जे एकमेकांवर निर्बंध घातले होते त्यांना थोडीशी स्थगिती देण्याचे ट्रम्प आणि शी जिनपिंग यांनी डिसेंबर मध्ये ठरविले.
बीजिंगच्या मानवी अधिकांविषयीच्या गैरवर्तणुकीविषयी आणि यूएस मधील चीनच्या ढवळाढवळीसंबंधी वरिष्ठ अधिकार्यांनीही तीव्र टीका केली. तसेच स्वतंत्र तैवानवर असलेला वॉशिंग्टनचा प्रभाव ज्यावर चीन आपला दावा करीत आहे. हे ही यूएस आणि चीनमधील भांडणाचे कारण आहेच.
चीनने दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेटांवर उभारलेल्या लष्करी तळांविषयी यूएस ने वेळोवेळी विरोध केला होता. याचे समर्थन देताना चीन ने म्हटले आहे की त्यांचे हे तळ स्वसंरक्षणासाठी बांधले गेले आहेत आणि याला यूएस जबाबदार आहे. चीनच्या अधिपत्याखालील बेटांच्याजवळ अमेरिका युद्धनौका पाठवीत असल्यामुळेच चीनने स्वसंरक्षणासाठी हे केले आहे.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: Reuters
U.S. destroyer sails in disputed South China Sea amid trade talks.