चीनच्या सीमावर्ती भागातील लष्कराला शह देण्यासाठी भारताने लेह मध्ये आपली आयटीबीपी कमांड तैनात करण्याचा घेतला निर्णय.
भारताच्या पूर्वेस चीनच्या वाढत्या लष्कर उभारणीमुळे असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन चंदिगढ येथे असलेल्या भारताच्या आयटीबीपी कमांडला शासनाने लेह मध्ये हलविण्याचा आदेश दिला आहे.
३,४८८ किलोमीटर लांबीच्या सिनो-इंडिया सीमेचे शांततेच्या काळात याच इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) रक्षण केले होते. ज्याचे नेतृत्व लष्कराच्या मेजर जनरल पदाच्या बरोबरीचे पद असलेल्या इन्स्पेक्टर जनरल (आयजी) यांनी केले होते.
पीटीआयद्वारे मिळालेल्या आदेशानुसार आयटीबीपी कमांड ला ताबडतोब तिकडे जायचे आहे. मार्च संपेपर्यंत सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्या की एक एप्रिल पासून नवीन ठिकाणी कार्यरत व्हावयाचे आहे.
१९९९ मधील कारगिलच्या घटनेनंतर जम्मू आणि काश्मीरमधील लेह येथे सीमेच्या सुरक्षेसाठी लष्कराची स्वतंत्र सेना पाठविली गेली. ही सेना आता पाठविण्यात येणाऱ्या आयटीबीपीवर त्यांचे नियंत्रण असावे अशी मागणी करीत आहे. त्यांचा हा प्रस्ताव सरकारने वेळोवेळी नाकारला आहे. आयटीबीपी आणि लष्कर एकत्रित येऊन एकाच ठिकाणी राहून नक्कीच यातून मार्ग काढतील असे सूत्रांचे म्हणणे आहे.
आयटीबीपीचे डायरेक्टर जनरल (डीजी) एस. एस. देसवाल यांनी या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले आहे की आम्ही लवकरच चंदिगढ वरून लेहला रवाना होऊ आणि एप्रिल पासून तेथे कार्यरत होऊ.
केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रथम २०१५ मध्ये याचा विचार केला होता. परंतु काही "प्रशासकीय कारणास्तव" तो अमलात आणला गेला नाही. आयटीबीपीला तेथे तैनात करण्याचा मंजुरी आदेश आल्यानंतर असे ठरले आहे की सीमेचे रक्षण करण्यासाठी जे सुरक्षा दल आहे त्याचे ३ भाग असतील. एक लेह मध्ये, दुसरा श्रीनगर आणि तिसरा चंदिगढ मध्ये. प्रत्येक दलाची जबाबदारी डेप्युटी आयजी यांच्याकडे असेल.
जम्मू-काश्मीरच्या चीनकडील सीमेवर सध्या आयटीबीपीच्या जवळपास अर्धा डझन बटालियन तैनात आहेत. एकदा का या बटालियननी लेह मध्ये कामास सुरुवात केली की त्यांच्या संख्येमध्ये वाढ होईल. आयटीबीपीने नुकतीच अनेक प्रकारची वाहने, संदेश वाहके, सर्व प्रकारची शस्त्रे, तोफा आणि लढाऊ उपकरणे यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ती सर्व हवाई मार्गे अथवा रस्त्याने लेहमध्ये पोचविली जातील.
तसेच लडाखच्या खूप उंचावरील बर्फाच्छादित भागात ४० बॉर्डर आऊट पोस्ट्स (बीओपी) तयार करण्यासाठी आणि असलेल्या काही पोस्ट्स चे नूतनीकरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. जेणेकरून ८,००० ते १४,००० फूट उंचीवरील प्रतिकूल हवामानाचा (जेथे उणे ४० अंश सेल्सियस एवढे तापमान असते) सामना करण्यात आपल्या सैनिकांना त्रास होणार नाही. नूतनीकरण केलेल्या पोस्ट्स मध्ये तापमान नियंत्रक असेल. तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, पुरेशी विश्रांती आणि आरोग्यविषयक सर्व सुविधा असतील.
आतापर्यंत डीआयजी ऑफिसर्सच्या नेतृत्वाखाली लेह मधील आयटीबीपीचे सेक्टर होते. फक्त पँगॉन्ग लेकच नाही तर चीन सीमेजवळील हिमालयाच्या सर्व पर्वतरांगाचे रक्षण ९०,००० भारतीय सैनिक करीत आहेत.
चीन सीमेजवळ कडक सुरक्षा व्यवस्था असण्याच्या हेतूने आपल्या सरकारने २०१६ मध्ये मेघालयातील आयटीबीपी फोर्सला अरुणाचल येथील इटानगर मध्ये हलविले होते. गेल्या काही वर्षात अरुणाचल प्रदेश आणि लेह मध्ये खूपवेळा चिनी सैनिकांकडून घुसखोरी, अचानक हल्ले तसेच धक्काबुक्की सारख्या घटना घडल्या आहेत. २०१७ मध्ये चिनी सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यामध्ये डोकलाम येथील सीमेवर ७३ दिवस चाललेले शक्ती प्रदर्शन हे त्याचे उदाहरण आहे.
तथापि, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या चीनला जोडणाऱ्या सीमेवरील चीनच्या कुरापतीमध्ये २०१८ पासून ६० टक्के घट झाली आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: TOI
To counter China's military buildup, India orders moving of strategic ITBP command to Leh.