"यही हमारा रोजीरोटी हैं भाय " ... काश्मिरात लष्कर आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांची कबुली.

"यही हमारा रोजीरोटी हैं भाय " ... काश्मिरात लष्कर आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांची कबुली.

 

आपण अनेक वेळा बातम्यांमध्ये किंवा इंटरनेटवर व्हिडिओज मध्ये काश्मिरात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना पाहिले आहे. ते कायम तोंडाला रुमाल बांधूनच हे काम करीत असतात. सरतेशेवटी इंडिया टीव्ही च्या एका अंडरकव्हर रिपोर्टर ला यांच्या तोंडावरील हा रुमाल खाली करवून त्यांच्याकडून सत्य वादविण्यात यश आलंय. आणि त्याच बरोबर मागील वर्षी हिजबुल मुजाहिदीनचा नेता बुरहान वानी याला लष्कराने ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पसरलेल्या अशांततेमागील भेदक सत्यदेखील समोर आलंय.

 

 

झाकीर अहमद भट, फारूक अहमद लोन, वासिम अहमद खान, मुश्ताक विरी आणि इब्राहिम खान अशी या तरुणांची नावे आहेत ज्यांनी ही कबुली दिली आहे की काश्मीर खोऱ्यात पोलीस, लष्कराचे जवान व सरकारी अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यासाठी त्यांना त्यांच्या भूमिगत असलेल्या नेत्यांकडून महिन्याकाठी एक ठराविक रक्कम मिळते आणि तेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.

 

 
 

"आम्हाला या कामासाठी दर महिन्याला ५००० ते ७००० आणि कपडे दिले जातात तर कधीकधी शूजदेखील मिळतात", झाकीर भट सांगतो.

 

२००८ आणि २०१० साली काश्मीर खोऱ्यात काही हिंसक घटनांमध्ये जमावातील तरुणांकडून पोलीस आणि लष्कराच्या जवानांवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर अश्याप्रकारे दगडफेक करणे ही नित्याचीच बाब बनली आहे. काश्मीरमधील सरकारी अधिकाऱ्यांकडून अश्या प्रकारच्या हिंसाचारावर अंकुश बसविण्यासाठी सातत्याने उपाययोजना केली जात असते.

 

मोलोटोव्ह कॉकटेल्स आणि पेट्रोल बॉम्ब मध्ये आपले कौशल्य असल्याचेही भट कौतुकाने सांगत होता. मागील वर्षी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मिरात जमावाकडून फार मोठ्या प्रमाणात हिंसक निषेधाच्या घटनांना सुरुवात झाली. या घटनांमधील दगडफेकीसाठी पोलीस या झाकीर भटच्या शोधात आहेत. लष्कराकडून ठार मारण्यात आलेल्या दहशतवादी बुरहान वानीला सोशल मीडिया वर फार मोठ्या संख्येने फॉलोअर्स होते आणि काश्मिरात मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करण्यासाठी तोच कारणीभूत ठरला होता.

 

हे सगळं सांगत असताना आपल्या शत्रूंशी संगनमत करून आपल्याच पोलीस आणि लष्करावर दगडफेक करण्याबद्दल या भटच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा किंवा दुःखाचा मागमूसही नव्हता.

 

"आम्ही पोलीस, लष्कराचे जवान, खासदार तसेच सरकारी गाड्यांवर दगडांनी हल्ले करतो", ही कबुली देताना या भाड्याच्या तट्टूने त्यांना पैसे पुरविणाऱ्या व्यक्तींची नावे घेणे मात्र टाळले. "आम्ही आतापर्यंत बारामुल्ला, सोपोर आणि पत्तन या भागात दगडफेक केलेली आहे. यापुढे बारामुल्लाच्या आतील प्रदेशात जिथे दर शुक्रवारी सामूहिक नामजपठण केले जाते,तेथे अश्याच प्रकारची दगडफेक करणे ही आमची पुढील कामगिरी असेल."

 

पेट्रोल बॉम्ब बनविण्यासाठी वेगळे पैसे मिळत असल्याची कबुली देतानाच आपण एक मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनविण्यासाठी ७०० रुपये घेत असल्याचेही सांगितले. "मी आतापर्यंत सुमारे ५० ते ६० पेट्रोल बॉम्ब बनविले आहेत. सरकारी गाड्या किंवा आमच्या समोर येणाऱ्या कोणावरही आम्ही ते टाकतो " भट बोलत होता.

 

मागील वर्षी जुलै ते ऑक्टोबर महिन्यांच्या काळात काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या हिंसक घटनांमध्ये सुमारे १९,००० लोक जखमी झाले असून ९२ लोकांचा त्यात मृत्यू झाले असल्याचे वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे. या जखमी लोकांमध्ये आपल्या ४,००० लष्करी जवानांचा समावेश आहे तर २ मृत्युमुखीही पडले आहेत. परंतु फारूक अहमद लोन सारख्या तरुणांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. त्यांच्यासाठी अश्याप्रकारे हिंसा करणे हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे.

 

लोन म्हणतो,"खोऱ्यात बंद करून आणि जमावातर्फे दगडफेकीचे प्रदर्शन करून मी कधी १०००,२०००,३००० तर कधी कधी दिवसाला ५००० रुपयेदेखील कमवतो."

 

"आम्ही २००८ पासून हेच काम करीत आहोत. जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा महिनाकाठी ५००० ते ६००० कमवीत होतो", वासिम अहमद खान म्हणाला.तर "आठवड्याच्या इतर दिवशी ७०० तर पवित्र अश्या शुक्रवारी दगडफेक करण्यासाठी १००० मिळत असल्याचे त्याचा साथीदार विरीने ने सांगितले.

 

'तुम्हाला पैसे देणारी व्यक्ती तुमच्या गावातलीच आहे का? तुम्ही त्याला ओळखता का?' या प्रश्नाचे उत्तर देताना या विरीने सांगितले,"तो माझ्या एका मित्राच्या ओळखीचा आहे. गावातील नसून कधीकधीच तो येतो."

त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती या तरुणांनी दिली नसली तरीही त्यांना कश्याप्रकारे कामाची आखणी करून दिली जाते आणि कश्याप्रकारे खूप आधीच लक्ष्ये निश्चित केली जातात हे मात्र नक्कीच सांगितले.

 

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व कामांमागील गुप्त सूत्रधार ही कामे तडीस नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करीत असल्याचे समजते.

 

"कुठे दगडफेक करावयाची आहे, कोणाला लक्ष्य बनवावयाचे आहे तसेच वेळ इत्यादी सर्वांची माहिती व्हाट्सअप ग्रुप सारख्या माध्यमांतून खूप आधीच दिली जाते. पोलीस, लष्करी जवान, सरकारी अधिकारी जो कोणी समोर येईल त्याच्या बाबतीत नक्की कोणती भूमिका घायची या सर्वांची माहिती या सूचनांमध्ये दिलेली असते", विरी सांगत होता.

 

"लहान मुलांना देखील यात पैसे मिळतात. परंतु त्यांची शरीरयष्टी पाहून मग त्यांचा मोबदला ठरविण्यात येतो. एखादा जर हट्टाकट्टा असेल तर त्याला ७००० ते ७५०० रुपये मिळतात पण जर तो कृश असेल तर मात्र केवळ ५५०० ते ६००० च मिळतात. १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना मात्र महिन्याकाठी केवळ ४००० हीच पूर्वनियोजित रक्कम दिली जाते", खान बोलत होता.

 

यानंतर भट, विरी आणि वासिम अहमद खान या तिघांनी तर त्यांच्या कर्तृत्वाचा आलेखच मांडला. "आम्ही एकदा एका पुलावर उभ्या असलेल्या गाडीवर पेट्रोल बॉम्ब्स टाकले होते. २ जण त्यात भाजून मेले होते" भट म्हणाला. ही २०१४ साली दोन दुर्दैवी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची घटना होती. तर आतापर्यंत सुमारे ४० लोकांना जखमी केल्याचे विरी मोठ्या अभिमानाने संगीत होता. "मला तर एकदा PSA (पब्लिक सेफ्टी ऍक्ट) खाली अटकही करण्यात अली होती. मी ६ महिने तुरुंगात काढले आहेत" विरी म्हणाला.

 

वासिम अहमद खान काही या दोघांपेक्षा निराळा नव्हे त्याला २००९ मध्ये एक वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. त्याने देखील बऱ्याच प्रसंगी पोलीस, लष्करी जवान आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले केल्याचे मोठ्या गौरवाने सांगितले.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: dailymail

'This is our bread and butter'