शोपीयन : एकेकाळी दहशतवाद्यांसाठी शक्तिस्थळ आणि आज मात्र दफनभूमी

शोपीयन : एकेकाळी दहशतवाद्यांसाठी शक्तिस्थळ आणि आज मात्र दफनभूमी 
 
(ICRR Media MOnitoring Desk)
दक्षिण काश्मीरच्या शोपीयन जिल्ह्यातील नाडीगम भागात मंगळवारी पहाटे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री होऊन चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेले आहे. ठार झालेले चारही जण हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे स्थानिक सदस्य होते. याच संघटनेने काही दिवसांपूर्वी लष्कराचा खबरी असल्याच्या संशयावरून एकाची हत्या केली होती आणि हत्या करताना त्याचे चित्रीकरणही केले होते. नंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 
अश्याप्रकारे हत्येचा व्हिडीओ चित्रित करून तो प्रसारित करण्यामागचा उद्देश केवळ लष्करास बातमी पुरविणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करणे आणि स्लीपर सेल च्या लोकांना भारताच्या संरक्षण विभागास कोणतीही माहिती पुरविण्यापासून रोखणे हाच होता. परंतु लष्कराच्या धडक मोहिमेनंतर त्यांचा हा उद्देश साफ धुळीस मिळाल्याचेच दिसून येत आहे.
या चकमकीत दुर्दैवाने आपण विशेष पॅरा कमांडो पथकातील आपला एक वीर सैनिक गमावला आहे तर आणखी एक गंभीर जखमी झाला आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी या पथकाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अतिशय दुर्गम असा डोंगराळ प्रदेश व त्यात दाटीवाटीने असलेली घरे यामुळे आपल्या सैनिकांना दहशतवाद्यांशी लढा देताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मंगळवारी सकाळी लष्करातर्फे शोधमोहीम सुरु असता अचानक आपल्या सैनिकांवर लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला. सुरुवातीच्या या गोळीबारात २३ पॅरा पथकातील एचसी विजय हा जवान गंभीर जखमी झाला व त्यास उपचारांसाठी तातडीने इस्पितळात नेण्यात आले परंतु उपचार सुरु असतानाच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
चकमकीत ४ दहशतवादी ठार झाल्यानंतर लष्करास निदर्शनाचा सामना करण्याची देखील वेळ आली. नाडीगम गावाजवळील तरुण रस्त्यावर उतरून निदर्शने करू लागले. पोलीस आणि निमलष्करी दलातील जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, पॅलेट गन्स आणि खऱ्याखुऱ्या दारूगोळ्याचा वापर करून जमावास पांगविले ज्यात ८ जण जखमी झाले.
"येथील लोक झालेल्या हत्यांचा निषेध करीत होते. अचानक लष्कराने त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. मीना शाह आणि रफिया भट नावाच्या दोन महिला यात लागलेल्या गोळ्यांनी जखमी झाल्या", असे या गावातील गुलजार अहमद नावाच्या एका स्थानिकाने सांगितले.
एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की मागील एक वर्षात शोपीयन जिल्ह्यात लष्करातर्फे एकूण ४० दहशतवाद्यांचा निःपात करण्यात आलेला आहे. तुलना करायची म्हटल्यास मागील १५ वर्षात काश्मीरमधील कुठल्याही जिल्ह्यात एका वर्षात ठार मारण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या संख्येच्या तुलनेत हा एक उच्चांकच आहे. विशेष म्हणजे मारले गेलेले हे चाळीसच्या चाळीस जण स्थानिक रहिवासी होते.
"पूर्वी हे दहशतवादी तीन गोष्टींच्या आधारावर टिकून रहात होते. अंत्ययात्रेच्या वेळी निषेध व्यक्त करून लोकांच्या (खास करून तरुणांच्या) भावनेस हात घालणे, मग प्रभावित तरुणाची आपल्या संघटनेत भरती करून घेणे (त्यासाठी त्यांना धार्मिक आवाहनाबरोबरच विविध पदांचे देखील आकर्षण दाखविण्यात येते) आणि यांच्या जोडीला स्थानिक लोकांना हाताशी धरून आपले माहिती जाळे निर्माण करणे. परंतु लष्कराच्या कठोर पवित्र्यामुळे आता मात्र त्यांची जागा कमी होत चालली आहे", जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाचे इन्स्पेक्टर जनरल स्वयम् प्रकाश पानी यांनी ही माहिती दिली.
पानी यांनी असेही सांगितले की ८ जुलै २०१६ रोजी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याला जम्मू अँड काश्मीर पोलीस व लष्कराने संयुक्त कामगिरीत ठार मारल्यानंतर आपले खबऱ्यांचे जाळे दक्षिण काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. वाणीच्या हत्येनंतर प्रदेशात मोठ्या प्रमाणात हत्या घडवून आणण्यात आल्या, सुमारे एक महिनाभर येथील सर्व कारभार ठप्प झाला होता तसेच कायद्याची उघड उघड पायमल्लीही झाली. या कारणांमुळे तेथील गुप्तहेरांचे आपले जाळे क्षीण झाले होते. "आम्ही अक्षरशः शून्यातून पुन्हा नवी सुरुवात केली. शोपीयन जिल्हा सोडल्यास इतर भागात हे करणे फारसे कठीण नव्हते.
गेल्या वर्षभरात या जिल्ह्यात सर्वाधिक दहशतवादी ठार करण्यात आलेले आहेत. पोलिसांच्या मते यातील बहुतांश हे स्थानिक होते परंतु ते सर्व आता मारले गेले आहेत. स्थानिक असल्यामुळे त्यांना या प्रदेशाची चांगली जाण असते ज्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो. येथील फळबागा इतक्या दाट आहेत की काही अंतरावर असलेली व्यक्तीसुद्धा कधी कधी दिसत नाही.
परंतु लष्कराने आपले खबरी वाढविण्याचे काम मात्र न कंटाळता चालूच ठेवले ज्याचा त्यांना आता फायदा होताना दिसत आहे. या खबऱ्यांनी अनेक वेळा अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच अचूक माहिती पुरविली आहे. काही काही वेळा तर ही माहिती अत्यंत धोकादायक सुद्धा असते परंतु तिचा योग्य वापर केल्याने फायदाच झालेला आहे.
त्यामुळे ही आपल्या लष्कराची कामगिरी म्हणावी लागेल की एकेकाळी दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असलेला हा जिल्हा आज खरोखरीचा स्वर्गात धाडणारा जिल्हा झालेला आहे.
"ज्या तीन गोष्टींच्या आधारावर हे दहशतवादी त्यांची ताकद वाढवीत होते त्या तिन्ही गोष्टी आज त्यांच्या विरोधात आहेत. एक; इंटेलिजन्सची गोष्ट कराल तर आज आपले जाळे त्यांच्यापेक्षा जास्त मजबूत आहे आणि त्यांच्यामुळे ते मारले जात आहेत, दोन; निषेध मोर्चाचे प्रमाण घटलेले आहे आणि तीन; आधीच्या दोन गोष्टींचा निकाल लागल्यामुळे अर्थातच नवीन भरतीचे प्रमाण रोडावले आहे", पानी यांनी सांगितले.
 
-प्राची चितळे जोशी.
Source: FIRSTPOST
Shopian, once a bastion, now slaughterhouse for militants.