याह्या अय्याश- इस्रायली मोबाईल बॉम्बचा पहिला बळी, शिन बेत आणि युनिट ८२००!
(ICRR Intelligence/ Counter Intelligence)
पॅलेस्टिनियन आणि इस्रायली संघर्षात आत्मघाती बॉम्ब हल्ल्यांचा जनक आणि आत्मघाती बॉम्ब तयार करून देण्यातला तज्ज्ञ होता याह्या अय्याश! याने मिळेल त्या सामग्रीतून खात्रीने फुटू शकतील असे आत्मघाती बॉम्बचे पट्टे आणि वाहनांमध्ये बसवण्याचे आत्मघाती बॉम्ब बनवण्याची कला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवली होती. यामुळे याह्या समस्त पॅलेस्टिनी जनतेच्या गळ्यातला ताईत झाला होता आणि या कलेमुळे त्याला "इंजिनियर" हे टोपणनाव मिळालेलं होतं! पॅलेस्टाईन मध्ये उच्च दर्जाची सैनिकी स्फोटके आणणे शक्य नसल्याने तो ऍसिटोन आणि कपड्याचा साबण यांच्या मिश्रणातून घातक स्फोटके तयार करत असे.
याह्याने १९९२ ते १९९६ या काळात तयार केलेल्या आणि घडवलेल्या बॉम्ब्सने १५० पेक्षा जास्त इस्रायली नागरिक मारले गेले होते. एका फसलेल्या आत्मघाती हल्ल्यात पकडलेल्या तीन अतिरेक्यांनी इस्रायली अंतर्गत सुरक्षा एजन्सी "शिन बेत" ला पहिल्यांदा याह्या अय्याश बद्दल माहिती कळली आणि त्यावरून शिन बेतने त्याचा माग काढायची सुरुवात केली.
याह्याचा शोध . ..
याह्या ज्या माणसाच्या घरी बरेच वेळा येत असे अशा ओसामा हमद याच्यावर शिन बेतने आपलं लक्ष केंद्रित करून त्याच्या बापाला आपल्या बाजूला वळवला. त्यांनतर त्याच्या व्यक्तिगत आर्थिक गरजा पूर्ण करून शिन बेतने त्याचे इस्रायली संपर्क हमासला सांगायची धमकी देऊन त्याला आपला शब्दशः गुलाम बनवला. मग त्याला एक मोबाईल हँडसेट देऊन तो मुलगा ओसामा हमद याला द्यायला सांगितला कारण याह्या नेहमी ओसामाच्या फोनवरून जगासोबत संपर्क ठेवत असे. या फोनमध्ये ट्रॅकिंग बग आहे आणि यामुळे आम्हाला याह्यावर नजर ठेवता येईल इतकीच माफक माहिती शिन बेतने ओसामा हमदच्या बापाला दिली होती. प्रत्यक्षात त्या हॅण्डसेटमध्ये १० ग्रॅम आरडीएक्स ठेवलेलं होतं. त्या काळात हँडसेट अवाढव्य मोठे आणि वजनदार असल्याने आतल्या १० ग्रॅम स्फोटकांचा अंदाज किंवा संशय येण्याची काहीच शक्यता नव्हती.
हत्या !
एकदा हि स्फोटके पेरलेला मोबाईल ओसामाच्या हातात गेल्यावर आणि त्यातला प्रत्येक कॉल आकाशातून सिग्नल टिपणाऱ्या इस्रायली विमानांनी ऐकायला सुरुवात केल्यावर याह्याच्या आयुष्याला घरघर लागली. ५ जानेवारी १९९६ ला याह्याच्या बापाने त्याला ओसामाच्या फोनवर फोन केला आणि आकाशातून उडणाऱ्या सर्व्हिलन्स विमानाने याह्याचा आवाज ओळखून शिन बेतच्या कमांड सेंटरला याबाबत माहिती दिली. शिन बेतने रिमोटने मोबाईल बॉम्बचा स्फोट घडवून आणला आणि याह्या अय्याशच्या "इंजिनियर" कारकिर्दीवर कायमचा पडदा पडला. पॅलेस्टिनियन प्रजेमध्ये आख्यायिका बनलेल्या याह्याच्या मृत्यूच्या बातमीने पॅलेस्टिनमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्याच्या हत्येचा बदला म्हणून इस्रायलमध्ये आत्मघाती बॉम्बची मालिका लागली. पण एकदा नाव समोर आल्यास "शिन बेत" कोणत्याही थराला जाऊन आपल्या विरोधकांचा सफाया करते हि भीती मात्र नक्की बसली !
इस्रायली सैन्याचं सायबर वॉरफेयर युनिट ८२००!
नुकत्याच लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटांच्या मागे इस्रायली सैन्याच्या "मिलिटरी इंटेलिजन्स डायरेक्टोरेट" चा भाग असलेल्या युनिट ८२०० चा सक्रिय सहभाग असल्याची चर्चा आहे. मिलिटरी इंटेलिजन्स डायरेक्टोरेट "अमान" या नावाने परिचित आहे. १९७३ मध्ये इजिप्तच्या नेतृत्वाखालील अरब आघाडीने यौम किप्पूर सणाच्या वेळी सुवेज ओलांडून अचानक केलेल्या हल्ल्याच्या वेळी "अमान" ने अचूक गुप्तचर माहिती मिळवून वारंवार दिलेल्या धोक्याच्या सूचनांकडे "मोसादने" भयंकर दुर्लक्ष केल्याने इस्रायलची भीषण वाताहत आणि भयंकर नाचक्की झालेली होती. त्यावेळी "अमान" चा कमांडर झहीरा वारंवार इजिप्तच्या सैनिकी तयारीची माहिती इस्रायली नेतृत्वाला देत होता तरीही मोसादने आपल्या मस्तीत राहून त्याकडे प्रत्यक्ष हल्ल्याच्या दिवसापर्यंत दुर्लक्ष करत राहणं पसंद केलं होतं आणि पहिल्या चार दिवसात इस्रायल आपलं अस्तित्व गमावणार का काय अशी शक्यता निर्माण झाली होती पण इस्रायली सैन्याचा भीम पराक्रम, अमानची प्रयत्नांची पराकाष्ठा आणि वेळीच मिळालेल्या अमेरिकन सैनिकी मदतीने इस्रायलने अरब आघाडीला धूळ चारली! मागच्या वर्षी ७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यातही मोसादच्या प्रतिष्ठेची ऐशीतैशी झालीच पण एक समाज म्हणून असलेली लढाई वृत्ती यावेळीही देशाला तारून नेत आहे. यावेळी अमानच्या सायबर वॉरफेयर युनिट ८२०० ने हा चमत्कार घडवून आणलेला आहे.
लेबनॉन मध्ये हल्ले का ?
एका बाजूला हमास आणि दुसऱ्या बाजूला शिया इराण समर्थित शिया अतिरेकी गट हिजबुल्ला हा इस्रायलवर सतत मिसाईल हल्ले करत आहे. लेबनॉन हा हिजबुल्लाचा गड आहे त्यामुळे यावेळी हमासचा चुराडा केल्यांनतर आता इस्रायल लेबनॉनच्या हिजबुल्लाची थाटात खबर घेत आहे.
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या केडर्स साठी पुरवठा केलेले पेजर हे एका सिंगापूरच्या कंपनीने दुसऱ्या युरोपियन कंपनीकडून आउटसोर्स करून तयार करून घेतलेले होते अशी एक वदंता आहे. प्रत्यक्षात ते इस्राईली कंपनीने तयार केलेले असण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे इथून पुढे हमास काय किंवा हिजबुल्ला काय कोणतेही डिजिटल इन्स्ट्रुमेंट वापरताना हजारवेळा विचार करतील. त्या पेजर्स मध्ये नेमकी कोणती स्फोटके होती किंवा काही एलेट्रोमॅग्नेटीक सर्किटच्या माध्यमातून हे स्फोट घडवले वगैरे तपशील फॉरेन्सिक ऑडिट मधून बाहेर येतील, पण एकूण या प्रकाराची व्याप्ती आणि पद्धत हि सर्व जगातल्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट वापरणाऱ्या आपल्यासारख्या लोकांसाठी धोक्याची घंटा आहे.
गेल्या वर्षी सीरियन आकाशात सीरियन टार्गेटवर बॉम्बफेक करायला गेलेल्या इस्रायली लढाऊ विमानांनी जमिनीवर तैनात असलेल्या रशियन एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम एस-३०० ना युनिट ८२०० ने मूर्ख बनवून शांत केलं होतं. कोणतीही एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम हि स्वतःच्या देशाची लढाऊ विमाने आणि शत्रूची लढाऊ विमाने यांची वेगवेगेळी ओळख पटविण्यासाठी (फ्रेंड ऑर फो आयडेंटिफिकेशन) एका डिजिटल सिग्नेचरचा वापर करते.
युनिट ८२०० च्या हॅकर्सची सीरियन एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम मध्ये नोंदलेल्या सीरियन आणि सीरियाचा मित्र रशिया यांच्या सीरियन आकाशात सक्रिय असणाऱ्या लढाऊ विमानांच्या डिजिटल सिग्नेचर कॉपी करून त्या इस्रायली लढाऊ विमानांना लावल्या, त्यामुळे इस्रायली विमाने सीरियन आकाशात फिरून बॉम्बफेक करत असतानाही एकही सीरियन एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम आपोआप सक्रिय झाली नाही. जेव्हा त्याचा ताबा सीरियन सैनिकांनी घेऊन "मॅन्युअल" फायर केलं तेव्हा इस्रायली लढाऊ विमाने त्यांच्या डोक्यावरून उडणाऱ्या रशियन मिलिटरी कार्गो विमानांच्या वर जाऊन उडू लागली यामुळे सीरियन एअर डिफेन्स मिसाईल सिस्टमने आकाशातून बिनधास्तपणे उडणाऱ्या आपल्या रशियन मित्र राष्ट्राची कार्गो विमाने पाडली. यामुळे इस्रायल- रशिया तणाव वाढून नेतान्याहूला रशियात जाऊन "कॉम्पेन्सेटरी मिलिटरी परचेस" करावा लागला होता!
थोडक्यात काय बॉम्ब, गोळ्या, विमाने, रणगाडे याच्यापलीकडे यापुढील युद्धे लढली जातील! युनिट ८२०० ने यापूर्वी इराणी आण्विक कार्यक्रमाच्या कॉम्प्युटर्स वर स्टक्सनेट व्हायरस ऍटॅक करून युरेनियम एनरिचमेण्ट करणारे सेंट्रिफ्यूज बंद पाडले होते आणि लेबनॉनच्या ओगेरो टेलिकॉम कंपनीच्या सर्व्हरवर सायबर हल्ले करून अख्खा लेबनॉन संपर्कहीन करून टाकला होता.
युनिट ८२०० चे पेजर हल्ले हि फक्त एक चुणूक आहे! पावलोपावली डिजिटल उपकरणे घेऊन स्मार्टफोन , स्मार्टवॉच, हेल्थबँड वगैरे हजारो रुपयांची उपकरणे अंगावर लादून आपण काय प्रकारची गुलामगिरी स्वतःवर लादून घेतली आहे याची कठोर जाणीव युनिट ८२०० ने आपल्याला करून दिलेली आहे. येणाऱ्या काळात अख्खा देश अज्ञात ठिकाणी असलेल्या कुणाच्या तरी कॉम्पुटर वरून सोडलेल्या एखाद्या बगमुळे क्षणार्धात गुडघ्यावर आलेला आपल्याला बघायला मिळेल! आणि तेव्हा आपण त्यात "पीडित" असल्यास आपल्याला १०० वर्षांपूर्वी आपलं आयुष्य कसं असेल याची चुणूक बघायला मिळेल!
येणाऱ्या काळात नागरी, राजकीय, शासकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक,आर्थिक, धार्मिक, पारमार्थिक, अयोग्यविषयक, व्यापारी आणि सैनिकी संस्था आणि व्यवस्था हातातील एका डिजिटल उपकरणात घेऊन फिरण्याची वास्तविक किंमत काय आहे याची युनिट ८२०० ने आपल्याला लेबनॉन च्या निमित्ताने जाणीव करून दिलेली आहे, योग्य धडा घेण्याचे हे बहुमूल्य दिवस आहेत !
--- विनय जोशी