निखिल गुप्ता, सीसी-१ आणि स्पेशल ऑपरेशन्स...
         Date: 19-Jun-2024
निखिल गुप्ता, सीसी-१ आणि स्पेशल ऑपरेशन्स...
 
 
गेली दोन, तीन वर्षं विदेशात लपून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांच्या गूढ मृत्यूच्या बातम्या भारतीय सोशल मीडियावर साजऱ्या केल्या जात आहेत. यात खरं काय आणि खोटं काय याची शहानिशा करायला कोणताही मार्ग उपलब्ध नाही. आपल्या देशाविरोधात विघातक कारवाया करणाऱ्या लोकांना परस्पर संपवण्याचे विविध मार्ग सर्वच देश नेहमी वापरत आले आहेत आणि यातल्या एकाही घटनेची जबाबदारी स्वीकारायची नाही असा अलिखित नियम आहे. पण ज्या उत्साहाने सोशल मीडियावर याबद्दल लिहिलं जातं तितकं हे काम सोपं नाही आणि कित्येक वेळा कुणालातरी सुरक्षित ठेवण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात, ज्याला आपण बळी पडून "त्यांना" जे हवं असतं तेच करतो, म्हणून अशा घटना, अफवा आणि बातम्या याबद्दल पुरेशी साक्षरता निर्माण होण्याच्या दृष्टीने "निखिल गुप्ता" केसची निदान तोंडओळख आपल्याला करून घेणं आवश्यक आहे.
 
 
Nijjar and Pannun Khalistani
 
निखिल गुप्ता ऊर्फ "निक"!
 
 
१८ जून २०२३ ला ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा इथे खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यांनतर भारतीय नागरिक असलेल्या निकने झेक रिपब्लिक मधून त्याच्या अमेरिकन "सोर्स" ला सांगितलं कि गुरपतवंत सिंग पन्नूला आता तात्काळ मारायला हरकत नाही. निज्जर आणि पन्नू खलिस्तान चळवळीतील मोठी नावे आहेत. निकने अमेरिकन सोर्सला पन्नूच्या न्यूयॉर्क मधील घराचा पत्ता, मोबाईल नंबर, त्याचे ताजे फोटो, पन्नूच्या दैनंदिन हालचालींची बारीक सारीक माहिती आणि अन्य सर्व प्रकारच्या ऑपरेशनल बाबींचे तपशील पुरवले होते.
 
 
 
हि सर्व माहिती निकला या केसमधील सीसी-१ म्हणजे को कॉन्स्पायरेटर- १ या तथाकथित अधिकाऱ्याने दिली होती आणि सीसी-१ निकला पैसे, लॉजिस्टिक्स आणि आदेश देत होता. हा सीसी-१ भारतीय केंद्रीय रिझर्व्ह पोलिसमधून भारतीय गुप्तचर एजन्सीमध्ये गेलेला "सिनियर फिल्ड ऑफिसर" आहे असं निकने झेक रिपब्लिकच्या तपास अधिकाऱ्यांना सांगितलं आहे अशी माहिती अमेरिकन जस्टीस डिपार्टमेंटच्या पब्लिक रेलेशन्स विभागाच्या साईटवर दिलेली आहे. सीसी-१ च्या नावाचा उल्लेख झेक किंवा अमेरिकन कागदपत्रात कुठेही नाही. कारण सीसी-१ ची खरी ओळख निकला असण्याचीही शक्यता अजिबात नाही.
 
 
 
निखिल गुप्ता "निक" हा आंतरराष्ट्रीय नारकॉटिक आणि शस्त्र तस्करीमधील माहीर खिलाडी आहे, त्याने अमेरिकेत त्याच्यासोबत ह्या काळ्या धंद्यात सामील असलेल्या एका स्थानिक ड्रग तस्कराला पन्नूच्या हत्त्येच्या कटात सामील करून घेतलं होतं आणि तो अमेरिकन तस्कर "ड्रग एन्फोर्समेंट एजन्सी" डीईए चा "कॉन्फिडेंशियल सोर्स" अधिक "अंडर कव्हर ऑफिसर" होता. याचा अर्थ निखिल गुप्ता ज्याला आपला ड्रग तस्करीमधील पार्टनर समजत होता तो [प्रत्यक्षात अमेरिकन डबल एजन्ट होता. त्यामुळे निकने पन्नूला मारण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये स्थानिक "हिटमॅन" म्हणजे सुपारीबाज गुंड शोधायची सुरुवात केल्या पासून अमेरिकन एजन्सीजना या कटाची माहिती मिळत होती. त्यामुळेच अमेरिकेने अत्यंत तत्परतेने झेक प्रजासत्ताकमधून मागच्या वर्षी ३० जून २०२३ ला निखिल गुप्ता याला अटक करविली. अमेरिकेला कदाचित हि भीती सतावत असेल कि निखिल गुप्ता जसा त्या अमेरिकन एजंटच्या संपर्कात आहे तसाच अन्य कुणी भारतीय एजंट अन्य कोण्या हिटमॅनच्या संपर्कात असेल आणि पन्नू यापुढे फार काळ जिवंत राहणं शक्य नाही.
 
 
 
पन्नूचे अमेरिकन कनेक्शन!
 
 
 
भारतीय गुप्तचर संघटना "रॉ" चे संस्थापक काओ यांचे अत्यंत जवळचे सहकारी बी रमण यांनी आपल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे खलिस्तानी विभाजनवादी चळवळ हि अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने जनरल याह्या खानच्या मदतीने सुरु केल्याचा थेट आरोप केला होता. त्यामुळे न्यूयॉर्क मध्ये राहून सतत भारतविरोधी व्हिडीओ प्रसारित करणारा खलिस्तानी पन्नू हा थेट सीआयए चा "असेट" आहे हि वास्तविकता आहे. साहजिकच त्याच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेची आहे. त्यामुळे निकने पन्नूला मारायची तयारी सुरु केल्यावर अमेरिकेने त्याच्याभोवती आपलं जाळं पसरून त्याला झेक प्रजासत्ताकमधून अटक करविली आणि काल, अटकेनंतर १ वर्षाने निखिल गुप्ताला न्यूयॉर्क पोलीस अमेरिकेत घेऊन गेले.
 
 
सीसी-१ कोण असेल?
 
 
 
निखिल गुप्ताला अटक केल्यावर सतत समोर येणारं पात्र म्हणजे सीसी-१. पण आजपर्यंत त्याची खरी ओळख निदान आपल्यासमोर आलेली नाही आणि येण्याची शक्यताही नाही. कारण गुप्तचर संस्था आणि स्पेशल ऑपरेशन्स एजन्सीज यांची कार्यपद्धती इतकी वेगळी असते कि त्यात विदेशात काम करणारा गुप्ता सारखा कुणीही पकडला गेला आणि जगासमोर उघडा पडला तरी त्याच्या वर आणि सोबत कोण होते हे कुणालाही कळण्याचा काही मार्ग नाही.
 
 
 
मुळात घटकाभर गृहीत धरू कि निखिल गुप्ताला भारतीय स्पेशल ऑप्स वाल्यानी पन्नूला मारण्यासाठी नेमला आहे, तर त्यांना हे हि माहित असणार कि हा मनुष्य नार्को कारभारात सामील आहे, किंबहुना तो त्यात सामील आहे म्हणूनच त्यांनी त्याला या "प्रोजेक्ट" मध्ये घेतला असणार कारण नार्को आणि वेपन्स तस्करी मध्ये सामील लोकांचे जगभरात प्रत्येक देशात चांगले संबंध आणि नेटवर्क असतात. अशा स्थितीत कोणताही गुप्तचर अधिकारी त्याला कधी समोरासमोर भेटणं दूरच, आपल्या खऱ्या नावाने त्याच्याशी बोलला किंवा खऱ्या फोनवरून संपर्कात राहिला असण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.
 
 
 
गुप्तचर संस्था आणि स्पेशल ऑपरेशन्स...
 
 
 
वेब सिरीज आणि स्पाय मुव्हीज मध्ये गुप्तचर म्हणून काम करणारे आणि स्पेशल ऑप्स प्रत्यक्षात आणणारे खुनशी शार्प शूटर्स एकंच व्यक्ती असते पण प्रत्यक्षात ह्या दोन स्वतंत्र यंत्रणा असतात आणि यांच्या "वर्क प्रोफाइल" कमालीच्या भिन्न आणि आमूलाग्र वेगळ्या असतात.
 
 
 
साधारणपणे गुप्तचर संस्थांकडे गुप्त माहिती जमा करून तिचं विश्लेषण करणारे अधिकारी असतात आणि ते कायमस्वरूपी सरकारी सेवेत असलेले सरकारी कर्मचारी असतात. त्यांनी नोकरीत लागल्यापासून निवृत्त होईपर्यंत फक्त हेच काम केलेलं असतं. स्पेशल ऑप्समध्ये सामील कायमस्वरूपी अधिकारी हे मूळ गुप्तचर अधिकारी असले तरी त्यांची भूमिका एजन्सीज कडून आलेल्या माहितीच्या आधारे एखाद्याला "ठिकाण्यावर" लावण्यासाठी योग्य व्यक्ती निवडून त्या व्यक्तीला आवश्यक लॉजिस्टिक्स पुरवणं आणि काम करून घेणं हि असते. "ठिकाण्यावर" लावणं याचा अर्थ फक्त ठार मारणं हा नसून विदेशात राहणाऱ्या कित्येक विरोधकांना पैसे, "हनी बॉटल", किमती वस्तू, सरकारी सुविधा, नोकरी किंवा जे जे देऊन त्याचं तोंड बंद करता येईल ते ते करणं!
 
 
आपल्या देशातल्या राज्यकर्त्याच्या विदेशात राहणाऱ्या विरोधकाला ठार मारणं हा शेवटचा उपाय असतो त्याआधी वरील उपाय वापरून त्याचा आवाज बंद करणं हे तुलनेने सोपे उपाय असतात. पुतीनचा विरोधक अलेक्झांडर लातविनेन्को ब्रिटनमध्ये राहून पुतीन विरोधात आघाडी उघडून बसला होता, त्याला रशियन एजंट्स नी पोलोनियम- ११० हे किरणोत्सारी रसायन चहातून पाजून ठार मारलं, पण याशिवाय विदेशात पळालेले कित्येक विरोधक पुतीनने पैसे चारून गप्प केले. थोडक्यात काय कि ठार मारणं हा सगळ्यात शेवटचा मार्ग म्हणून वापरला जातो!
 
 
 
स्पेशल ऑप्स विभागात अत्यंत गुप्त पद्धतीने मारधाड कामे करणारे फार कमी ऑफिसर असतात कारण विदेशी जमिनीवर "निखिल गुप्ता" सारखी अटक झाल्यास त्याची ओळख आणि सरकारी अधिकारी म्हणून झालेली अटक समोर आल्यास तो अख्खा देश जगभरात कायमचा बदनाम होऊ शकतो. यात निखिल गुप्ता नावाच्या एका "नार्को, वेपन्स स्मगलर" ला अटक झाल्यामुळे भारत सरकार यापासून नामानिराळं राहिलं आणि सीसी-१ म्हणजे आमचा कोणता अधिकारी हे तुम्हीच आम्हाला सांगा मग आम्ही त्याची चौकशी करू हा जप भारत सरकार अमेरिकन आणि झेक पोलिसांसमोर सतत करत राहील.
 
 
 
स्पेशल ऑप्सच्या निमित्ताने आपले अत्यंत प्रशिक्षित अधिकारी खर्ची घालायचे, शिवाय विदेशी भूमीवर त्यांना अटक झाल्यास ती बदनामी झेलायची यापेक्षा जागतिक गुन्हेगारी, तस्करी साम्राज्याचे अविभाज्य भाग असलेले लोक पैसे देऊन नेमणं हि तुलनेने कमी खर्चिक गोष्ट आहे. पन्नूच्या केसमध्येही सीसी-१ ने निकला नेमला, निकने अमेरिकन स्मगलरला (जो अमेरिकन अंडरकव्हर ऑफिसर निघाला!) नेमून त्याला १५,००० अमेरिकन डॉलर दोन वेळा देऊन स्थानिक शूटर नेमायला सांगितला. एकूण सुपारी १ लाख अमेरिकन डॉलर्सची होती. पण या क्षेत्रातले जाणकार अधिकारी आणि पत्रकार म्हणतात त्याप्रमाणे पन्नू सारख्या हाय प्रोफाइल माणसाला अमेरिकन भूमीवर मारायची सुपारी इतक्या कमी पैशात दिली जाऊ शकत नाही, त्यामुळे निखिल गुप्ता आणि सीसी-१ हे मूळ कथानकच बोगस आहे!
 
 
 
खऱ्या हत्त्या किती?
 
 
 
गेल्या काही वर्षात खलिस्तानी चळवळ आणि पाकिस्तानातील काश्मीरी आतंकवादी इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या संबंधातील कित्येक प्रमुख पात्रांच्या हत्येच्या बातम्या भारतीय सोशल मिडियावर आल्या. यापैकी खलिस्तानी लोकांच्या हत्त्या कॅनडा किंवा युरोपमध्ये झाल्या आणि त्याच्या बातम्या, फोटो छापून आले, त्यावर भरवसा ठेवता येतो.
 
 
 
२०१६ च्या पठाणकोट वायू सेना बेसवर झालेल्या हल्ल्याचा आरोपी जैश अतिरेकी शाहिद लतीफ याची पाकिस्तानात सियालकोटच्या मशिदीत झालेली हत्या आणि लष्कर कमांडर रियाझ अहमद याची पाकव्याप्त काश्मीर मध्ये रावलकोट मध्ये झालेली हत्त्या आणि काल सुंजावान आर्मी कॅम्प वरच्या हल्ल्याचा सूत्रधार ब्रिगेडियर (निवृत्त) अमीर हमझा याची झेलम जिल्ह्यात झालेली हत्त्या वगळता अन्य हत्त्यांच्या बातम्या ह्या निव्वळ अफवा होत्या. या बातम्या त्या त्या अतिरेक्यांच्या मागावर कुणीतरी आहे आणि त्यातून ते वाचवले पाहिजेत म्हणून उठवलेल्या अफवा होत्या. कारण एखाद्या टार्गेटच्या मागावर जर कुणी असेल आणि त्याच्या हत्येची बातमी पसरली तर ते लोक त्याचा माग सोडून देतात आणि आपण पकडले जाऊ या भीतीने ते तात्पुरते निष्क्रिय होतात.
 
 
 
दुर्दैवाने अशा निव्वळ अफवा आल्या कि भारतीय सोशल मीडिया "याला ठोकला" "त्याला उडवला" "अज्ञात बंदूकधाऱ्यांचे अभिनंदन" वगैरे लिहून अफवांचा आनंद साजरा करतो. टीव्ही चॅनल्स याला अजून हवा भरतात, कित्येक वेळेस पाच, दहा वर्षांपूर्वी मेलेले अतिरेकी अज्ञातांनी ठोकले म्हणून आनंद साजरा केला जातो. यामुळे एकतर विदेशात निज्जर सारख्या हत्या झाल्या किंवा निखिल गुप्ता प्रकारच्या केस झाल्या कि भारतानेच त्या घडवल्या, बघा भारतीय मीडिया, सोशल मीडिया त्या कशा साजऱ्या करतो वगैरे दाखले दिले जातात आणि दुसरीकडे खरी घटना घडण्यापूर्वी सावजाला सावध करून सुरक्षित ठेवायला या अफवांनी मदत होते.
 
 
 
स्पेशल ऑपरेशन्स किंवा अन्य गुप्तचरांची भीषण दुनिया!
 
 
 
अमेरिका- सोव्हिएत युनियन दरम्यानच्या शीतयुद्धाच्या काळात एकमेकांचे एजंट पकडून त्यांचे हाल करणं, एजंट आहेत म्हणून पत्रकार पकडून त्यांचा छळ करणं आणि ते सोडवण्यासाठी भलताच निरपराधपकडून त्याच्या बदल्यात हा द्या वगैरे सौदे करणं हा खेळ अखंडपणे चालू होता. आत्ताही इराण, रशिया, अमेरिका, इस्राएल एकमेकांच्या लोकांना पकडत असतात.
 
 
 
काही महिन्यांपूर्वी भारतीय नौसेनेचे ८ निवृत्त अधिकारी कतरने हेरगिरीच्या आरोपाखाली पकडून त्यांच्यावर खटला दाखल केला. ते कतरच्या पाणबुडी प्रकल्पावर काम करत होते आणि इस्राएल साठी हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना पकडण्यात आलं. पुढे भारत सरकारने कतर सरकारसोबत २० वर्षं गॅस खरेदीचा करार केल्याच्या बातमीनंतर लगेचच या अधिकाऱ्यांना सोडून दिल्याची आणि ते भारतात परतल्याची बातमी आली. या दोन घटनांचा संबंध असल्याचीही चर्चा झाली! या बाबतीत ते अधिकारी सुदैवी निघाले म्हणायचे!
 
 
 
पण प्रत्येक वेळी पकडलेल्या गुप्तहेरांना, स्पेशल ऑपरेशन्स एजंटना नशीब साथ देत नाही. कित्येक वेळा ज्या देशांसाठी हे लोक काम करतात ते देश अटकेनंतर हात वर करून मोकळे होतात. राजनैतिक चॅनल्स वापरून सौदेबाजी करून आपली माणसं सोडवायचा प्रयत्न होतो पण जसा सैनिक किंवा सरकारी अधिकारी कामावर तैनात असताना त्याचा मृत्यू झाल्यास त्याला राजकीय सन्मान मिळतो तसा कोणताही सन्मान या गुप्तचरांच्या नशिबात नसतो. पकडले गेल्यावर शारीरिक, मानसिक छळ, अत्याचार आपल्या स्वतःच्या देशात अनुल्लेखाची नामुष्की हि यांच्या नशिबात कायमची गोष्ट आहे. ही दुनिया बाहेर कितीही "ग्लॅमरस" वाटुदे प्रत्यक्षात गु[गुप्तहेरांची दुनिया आणि आयुष्य अत्यंत निष्ठुर आणि भावनाशून्य असते!
 
 
 
सध्या बदललेल्या स्थितीत कमांडर कुलभूषण जाधव आणि कतरने पकडलेले नौसैनिक अधिकारी यांना भारताने खुलेआम कायदेशीर मदत आणि स्थानिक राजनैतिक मिशनच्या माध्यमातून मोठी मदत दिली आंतराष्ट्रीय न्यायालयात जाऊन केस लढवली आणि एक प्रकरण योग्य मार्गाने संपून दुसरंही लवकर संपायच्या मार्गावर आहे. पण निखिल गुप्ता प्रकरणात उघडपणे काही व्हायची शक्यता वाटत नाही कारण तो बोलून चालून एक नार्को स्मगलर आहे आणि त्यात भारतीय एजन्सीचा सहभाग असल्याची कोणतीही बाजू उघड झालेली नाही. शिवाय कॅनडा, पाकिस्तान, ब्रिटनमध्ये मारल्या गेलेल्या भारतविरोधी लोकांच्या मृत्यूच्या बाबतीत भारताने सतत, आक्रमकपणे स्वतःवर झालेले आरोप फेटाळून लावलेले आहेत त्यामुळे निखिल गुप्ता "निक" च्या अटकेत भारत थेट समोर येण्याची शक्यता फारच कमी आहे.
 
 
 
यानिमित्ताने आपण सतत नवनवीन माहिती मिळवत राहून आपली या विषयातली साक्षरता वाढवत राहिली पाहिजे जेणेकरून आपल्याकडून आपल्याच देशाविरोधात भविष्यात वापरला जाईल असा "माल" सोशल मीडियावर ओतला जाणार नाही. मध्यंतरी भारतातून मलेशियात पळून गेलेला जिहादी मौलवी डॉ झाकीर नाईक याला विष घालून ठार मारल्याची अफवा आली आणि ती भारतीय सोशल मीडियाने बघता बघता पसरवली! याचं स्पष्टीकरण देताना भारतीय विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याची पूर्ती दमछाक झाली होती.
 
 
 
त्यामुळे यापुढे अशा बातम्या चघळताना आपण अशा कामात असलेल्या सततच्या धोक्याची आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अशा बातम्या हाताळताना काय कसरत करावी लागते याचं थोडं भान ठेऊ!
 
 
---- विनय जोशी