अमेरिकेतून १५७ प्राचीन भारतीय मूर्ती आणि कलाकृती भारतात परत!
भारत सरकार, भारतीय विदेश मंत्रालय, पुरातत्व विभाग यांच्या पाठपुराव्याला यश...
आजवर भारतावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येक आक्रमणकर्त्याने अपरंपार संपत्ती आणि वस्तू लुटून नेल्या. भारतीय शिल्पशास्त्र,धातुशास्त्र मूर्तीशास्त्राच्या समृद्ध आणि प्रगत परंपरेचा पुरावा ठरू शकतील अशा कित्येक वास्तू ध्वस्त केल्या गेल्या . कित्येक पुरातन वस्तू, मूर्ती इथून दुसऱ्या देशांत नेल्या गेल्या. तर अशा कित्येक पुरातन वस्तू केवळ पैशाच्या हव्यासापायी काही समाजकंटकांनी, देशविघातकांनी चोरून देशाबाहेर नेऊन विकल्या किंवा तसे प्रयत्न केले. अशाच काही पुरातन भारतीय वस्तू चोरून अमेरिकेमध्ये नेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्या वस्तूंची कोणतीही अधिकृत कागदपत्रे दाखवता न आल्याने त्या तत्कालीन अमेरिका सरकारने जप्त करून आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. अशा वस्तूंपैकी एकूण 157 पुरातन वस्तू पुन्हा भारतात आणण्यात भारत सरकार यशस्वी झाले आहे.
या वस्तू पुन्हा स्वदेशी आणण्याची प्रक्रिया अतिशय जोखमीची आणि गुंतागुंतीची असते. Archeological
Survey of India (ASI)ची एक तुकडी 2019 मध्ये, भारतीय दूतावासाच्या बोलावण्यावरून या कामासाठी न्यूयॉर्क येथे गेली होती. तेथे राहून त्यांनी तामिळनाडू आणि मध्यप्रदेशांतील मंदिरांमधून चोरून तस्करी केलेल्या आशा जवळजवळ 100 वस्तूंची ओळख पटवली. या वस्तूंमध्ये 12 व्या शतकातील नटराजाची मूर्ती, तसेच लक्ष्मी-नारायण, विष्णु , शिव-पार्वती , बुद्ध जैनांचे तीर्थंकर यांबरोबरच दुर्मिळ अशा कंकाल मूर्ती , ब्राह्मी , नंदिकेश अशा मूर्तीदेखील समाविष्ट आहेत. याशिवाय दुसऱ्या शतकातील हडप्पा संस्कृती मधील मातीचे एक भांडे, हरणांची जोडी अशा काही मातीच्या देखील वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय पर्शियनमध्ये गुरुगोविंद सिंग’ असे लिहिलेली 18 व्या शतकातील तलवार तिच्या म्यानासह परत आणली गेली आहे.
सध्या या सर्व वस्तू पंतप्रधान कार्यालयाच्या ताब्यात असून त्या लवकरच ASI कडे सोपवल्या जातील. त्यानंतर आत्यावश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून या सर्व गोष्टी ज्या ठिकाणांहून चोरल्या गेल्या होत्या त्या ठिकाणी परत पाठवल्या जातील.