काबुल स्फोट- तालिबान आणि इस्लामिक स्टेटमधील भावी युद्धाची नांदी
काल काबुल विमानतळावर इस्लामिक स्टेट- खोरासान प्रोव्हीन्सने आत्मघाती हल्ला करून १३ अमेरिकन नौसैनिक आणि १२० अफघाण नागरिक मारले. हल्ल्यानंतर लगेच इसिस खोरासान ने एक व्हिडीओ जरी करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. इसिस चा जिहादी अब्दुल रहमान अल लोघरी ह्याने हा हल्ला केल्याची घोषणा करण्यात आली.
दोहा मधील अमेरिका- तालिबान बातचितीच्या दरम्यान अमेरिकेने तालिबानला घातलेली एक प्रमुख अट होती ती ही कि तालिबानने अफघाण जमिनीवर एकही जागतिक जिहादी गटाला थारा देऊ नये. याची खात्री पटवण्यासाठी तालिबानने इस्लामिक स्टेट खोरासानच्या प्रमुखाला ठारही मारले होते.
जागतिक जिहादी गटांमध्ये जो कोणी पश्चिमी राष्ट्रांसोबत हातमिळवणी अथवा करार करतो तो इस्लामविरोधी घोषित केला जातो. आधीची अफघाण राजवट अमेरिकन पाठिंब्यावर अफघाण जनतेमधून निवडून आलेली होती तिला तालिबानने इस्लमविरोधी घोषित केले आणि आता अमेरिकेशी छुपी हातमिळवणी करून सत्तेत आलेला तालिबान हा अन्य जिहादी गटांकडून इस्लामविरोधी ठरवला जाईल.
येणाऱ्या काळात अफगाणिस्तान मध्ये भीषण जिहादी रक्तपात होण्याची ही सुरुवात वाटते आणि हा वणवा वेगाने पाकिस्तान, इराणच्या दिशेने पसरत जाईल अशी चिन्हे आहेत.
तसाही तालिबान हा अफगाणिस्तानच्या लोकांचं प्रतिनिधित्व कधीही करत नव्हता त्यामुळे इस्लामिक स्टेट खोरासान आता अनेक भागात स्वतःची वेगळी शासन व्यवस्था लागू करेल.