इराणमध्ये स्फोटांची मालिका कायम.
         Date: 07-Jun-2021

 इराणमध्ये स्फोटांची मालिका कायम. 

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Other conflicts)

 

शनिवारी रात्री पूर्व इराणमधील झारंड इराणी स्टील कंपनीमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. इराणी प्रसारमाध्यमांनुसार इराणमध्ये घडत असलेल्या स्फोटांच्या मालिकेत अजून भर पडली. इराणी आयआरएनएने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये आगीच्या ज्वाला गगनाला भिडल्या असल्याचे दिसत आहे. हवेमध्ये होणारे स्फोट आणि आगीचा लोळ दिसत असून स्फोटाबरोबर उडालेले धातूचे तुकडे स्पष्ट दिसतायत.

 

इराणमध्ये अश्या घटना वारंवार दिसून येतायत. गेल्याच आठवड्यात इराणमधील सर्वात मोठे खर्ग हे  नौदल जहाज आगीत नष्ट झाले आणि बुडाले. ही आग कशामुळे लागली ते स्पष्ट झाले नाही. याशिवाय, तेहरानच्या दक्षिणेकडील भागात गेल्याच आठवड्यात तेल रिफायनरीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या काही आठवड्यात इराणमध्ये अनेक पेट्रोकेमिकल प्लॅन्टमध्ये आगीची नोंद झाली आहे.

 

झारंडच्या राज्यपालांनी कोणतीही जीवित हानी झाली नसून आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वृत्तपत्रांना सांगितले. घटनेच्या ठिकाणी अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा ताबडतोब उपलब्ध असल्याने मोठा अपघात टळला. भट्टीमधील वितळलेला धातू मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो झाल्यामुळे ही घटना घडली असून येथे कोणताही स्फोट झाला नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

iran blasts_1  
 
 
 

झारंड इराणी स्टील कंपनी ही मिडल ईस्ट माईन्स अँड मिनरल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट होल्डिंग कंपनी ( एमआयडीएचसीओ) चा एक भाग आहे, ज्याला या वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प प्रशासनाच्या मान्यतेखाली आणले होते.

 

इराणी धातू इंडस्ट्री पासून मिळणारा महसूल हे इराणी राज्यकर्त्यांचा संपत्ती मिळवण्याचा मुख्य स्रोत आहे. मोठ्या प्रमाणावर विनाशक कृत्ये करणे, शस्त्रास्त्रे वाढविणे आणि ती वितरित करणे, दहशतवादी गटांना निधी पुरविणे आणि देशविदेशात अंदाधुंदी फैलावून मानवी हक्कांची पायमल्ली करणे यासाठी या पैशाचा विनियोग केला जातो. अशी माहिती अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने दिली.

 

इराणच्या प्रत्येक लष्करी तळांजवळ कमीतकमी एकदा तरी असे स्फोट झाले आहेत. द गार्डीयनच्या वृत्तानुसार इराण आणि इराण समर्थक सैन्यासाठी ड्रोन्ससह अनेक प्रकारची एअरक्राफ्ट बनवणाऱ्या इराणच्या इस्फाहान प्रांतातील इराण एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रियल कंपनीत (एचईएसए) मोठा स्फोट झाला आहे.

 

इस्फहानमधील शाहीन शाहार येथील सेपहान नारगोस्टर रसायन आणि फटाके कारखान्यात स्फोट झाल्याचे नुकतेच इराणी प्रसारमाध्यमांनी सांगितले. हा कारखाना औद्योगिक व व्यावसायिक स्फोटके बनवतो.

 

गेल्या वर्षी, इराणमध्ये स्फोट आणि आगीची मालिकाच घडली होती. अनेक पेट्रोकेमिकल प्लॅन्ट्स आगीच्या भक्षस्थानी पडले होते. इराणी अधिकाऱ्यांनी यापैकी अनेक घटनांचा अपघात असा उल्लेख केला असला तरी यामध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

 

सतत लागणाऱ्या आगी आणि स्फोट हे काहीतरी वेगळेच दर्शवत आहेत. इतरांनी अधिकारी मात्र या गोष्टी बाहेर पडू नयेत म्हणून त्यांना अपघाताचे नाव देत असते तरी स्फोटांची आणि आगीची शृंखला  बघता हा अपघात नसून घातपात आहे असे म्हणायला वाव आहे.

 

Source : google, The jerusalem post, The guardian, IRNA