लडाखमधील हालचालींना पुन्हा वेग.
         Date: 06-Jun-2021

 लडाखमधील हालचालींना पुन्हा वेग.

 

- प्राची चितळे जोशी. 

 
( ICRR Defense / Military Hardware)

 

चीनने पूर्व लडाखमध्ये तडकाफडकी सुमारे ५० ते ६० हजार सैन्य तैनात केलंय. त्यामुळे भारतानेही ताबडतोब त्याच्या तोडीस तोड सैनिकांची तैनात केली आहे. मे २०२० पासून चीन आणि भारत लडाखमध्ये समोरासमोर उभे ठाकलेत. चीनने एलएसी जवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रास्ते आणि दारुगोळा तैनात केलाय. भारतानेही जोरदार तयारी केली आहे.

 

भारताने आपले टी-९० रणगाडे लडाखमध्ये तैनात केले आहेत. गेल्यावर्षी ३० ऑगस्टपासून पॅंगॉन्ग लेकची दक्षिण बाजू लढवता लढवता भारताने आजूबाजूची अनेक शिखरे हस्तगत केली होती. यानंतर, भारताने चुशुलमधील १५००० फुटांवरील रेझान्ग ला, रेचीन ला आणि मुखप्री शिखरावर रणगाडे आणि तोफखाना तैनात केला होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील करारानंतर दोन्ही बाजूनी दक्षिण लडाखमधील अनेक ठिकाणांवरुन माघार घेतली होती. पण तरीही दौलत बेग ओल्डीसारख्या काही जागांवर सैनिक आमने- सामने आहेत. भारत सध्या एलएसी मधील हॉट स्प्रिंग्स, गोग्रा आणि देपसांग या मोक्याच्या आणि संघर्षाच्या जागांवर सजग आहे. 

 

भारताने प्रथमच लडाखमध्ये स्वयंचलित के-९ वज्र तोफखाना तैनात केला आहे. २०१८ मध्ये तो भारतीय सैन्यात दाखल झाला. पण रणांगणावर तैनात होण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. यात एक १५५ मिमी तोफ आहे जी १८ ते ५२ किमी पर्यंत मारा करू शकते. याचे ट्रॅक रणगाड्यासारखे असल्याने तो कोणत्याही प्रकारच्या जमिनीवरून जाऊ शकतो. याचं इंजिन खूप शक्तिशाली आहे आणि तो ६७ किमी वेगाने प्रतितास धावतो. यात पाच सैनिक मावू शकतात आणि त्यांना संपूर्ण संरक्षण मिळते.

 

 K-9 Vajra_1  H

 
भारतीय सैन्याने फेब्रुवारीमध्ये लडाखच्या मैदानावर त्याची चाचणी सुरू केली. के-९ वज्रमध्ये रणगाडे आणि तोफा या दोन्हीची वैशिष्टये आहेत. याचे चिलखत शत्रूच्या आगीपासून बचाव करते आणि कितीही खडकाळ जमीन असली तरी याचे ट्रॅक्स अतिशय वेगाने धावू शकतात. तोफेप्रमाणे दूरवरच्या शत्रूवर आग देखील ओकू शकते.

 

पॅंगॉन्ग लेकजवळ सध्या चीनच्या बाजूने काही हालचाल नसली तरी भारत गाफील राहिला नाहीये. भारताचे सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) अतिशय सतर्क आहेत आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. पॅंगॉन्ग लेकजवळील सैनिकांची फळी मजबूत आहे. असे भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी सांगितले.

 

Source : Republicworld, india, google