इस्त्राईल आणि युएई हे इराणकडे समान शत्रू म्हणून पाहतात आणि ह्यात लपून राहण्यासारखे काहीच नाही. आखाती देश आणि मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणात इराणी वर्चस्व रोखण्यासाठी दोन्ही देशांनी कित्येक वर्षांपासून एकत्र काम केले आहे. दोन्ही देशांनी त्यांचे इंटलिजन्स शेअरींग आणि लष्करी संबंध सुधारले आहेत.पडद्यामागील मुत्सद्दी संबंध दृढ केले आहेत. इस्राईल-युएई सामंजस्य कराराने त्यांच्या संबंधांच्या विकासाला आणखी उत्तेजन मिळाले आहे. या कराराचा इराणने तीव्र विरोध केला होता.
सौदी अरेबियाने अशा कुठल्याही सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली नसली तरी शांतपणे इस्राईलशी स्वतःचे संबंध बनवले आहेत. गेल्या वर्षी इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सौदी अरेबियाचा ऐतिहासिक दौरा केला होता त्यावरून हे स्पष्ट होते.
पॅलेस्टाईन-इस्त्रायल मध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्तिथीवर सौदी-अमीराती (युएई) कडून पॅलेस्टाईनला पाठींबा देणार कुठलच विधान अद्याप करण्यात आलेले नाही. त्याचा इराणला होणारा त्रास आणि भविष्यातली भीती ते त्यांच्या तेहरान टाइम्स या मुखपत्रातून लपवू शकले नाहीत.
"गाझावरील युद्धाने दाखवली सौदी-अमीराती (युएई)ची
इस्त्रायलबरोबरची वाढलेली जवळीक"
बहुतेक इस्लामिक आणि अरब तसेच इतर राज्यांनी गाझा आणि पॅलेस्टाईनमधील नागरिकांवर होणार्या इस्त्रायली अत्याचाराचा तीव्र निषेध करत असताना अबु धाबी आणि रियाध मात्र पॅलेस्टाईन लोकांवरील इस्त्रायली हिंसाचाराकडे कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे असे त्यात म्हटले आहे.
या दोन राज्यांनी आणि त्यांच्या बहरेन सारख्या सहयोगी देशांनी इस्त्रायलने वेढलेल्या गाझाच्या लोकांसाठी कमीतकमी नैतिक आधार देणारा एक शब्दही काढला नाही. त्यामुळे गाझावरील युद्ध सुरू असतानाच, पॅलेस्टाईनवरील इस्त्रायली गुन्ह्यांवरील सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांच्या निष्क्रियतेबद्दल अरबी जगातील जनतेत संताप आणि निराशेची लाट उसळली आहे
गेल्या वर्षी झालेल्या इस्त्रायल- संयुक्त अरब अमीरात यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे पालन करत युएई ने याबद्दल मौन पाळले आहे. वरवर पाहता आपली स्थिती संतुलित करण्यासाठी युएईने पॅलेस्टाईनच्या इस्त्रायली हल्यांमध्ये बळी पडलेल्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
युएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन जाएद अल नाह्यान यांनी पॅलेस्टाईनमधील संकटावर एक वरवरचे निवेदन करत असे म्हटले की इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वाढत्या हिंसाचाराबद्दल त्यांना चिंता आहे. नुकत्याच झालेल्या लढाईतील सर्व पीडितांसाठी त्यांनी शोकही व्यक्त केला.
फक्त इस्राईलच्या कृत्यांचा पाढा वाचत आणि पॅलेस्टाईन बद्दल मौन राखत इतकं सगळं होऊनही युएई गप्प का असा सवाल इराणने त्यांच्या या मुखपत्रातून केला आहे. सुरुवातीला असा अंदाज होता की इस्त्रायल- संयुक्त अरब अमीरात यांच्यात झालेल्या सामंजस्य करार म्हणजे ट्रम्प प्रशासनाच्या दबावाखाली युएईने इस्रायलशी संबंध नॉर्मल केले असावेत असा होता परंतु आता इस्राईलने पॅलेस्टाईनमध्ये मानवी हक्कांचे स्पष्टपणे उल्लंघन करत असल्याचे दिसत असताना युएई चे मौन हेच सिद्ध करते की इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याचा त्यांचा निर्णय ट्रम्प यांच्या दबावाखाली घेतला गेला नव्हता तर तो सर्वस्वी त्यांचाच निर्णय होता असे इराणने म्हटले आहे.
सौदीचे इस्त्राईलशी संबंध अद्याप नॉर्मल केले नसले तरी सौदीने हेच केले जे युएई ने केले. सौदी अरेबियाने पॅलेस्टाईनमधील इस्त्रायलींच्या कारवाई पासून स्वत:ला दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, गाझावरील युद्धाच्या सौदी माध्यमांच्या कव्हरेजची बारीक अभ्यास केल्यास रियाधने युद्धाकडे दुर्लक्ष केले आहे. अल-अक्सा मशिदीवर झालेल्या इस्त्रायली हल्ल्याचा सौदी अरेबियाने निषेध केला पण गाझा पट्टीमध्ये पॅलेस्टाईन लोकांवर होणाऱ्या अत्याचारावर मात्र कोणतेच भाष्य केले नाही.
उलट सौदी अरेबियाने इस्त्रायली अधिकाऱ्याला त्यांच्या अल अरबच्या वृत्तवाहिनीवर पॅलेस्टाईनवरील गुन्ह्यांचे समर्थन करण्यासाठी एअरटाईम देखील दिला. सौदीच्या मालकीच्या अल अरबच्या वृत्तवाहिनीने गेल्या काही दिवसांत दोनदा इस्राईलचे अरबी भाषेचे प्रवक्ते अविचय अद्रयने होस्ट केले होते त्यात ते इस्त्राईल गाझामधील असहाय्य मुले व स्त्रियांना मारत आहे ते कसे योग्य आहे हे सांगत होते.
पॅलेस्टाईनच्या दुःखाबद्दल सौदी आणि एमरातीच्या अनास्थेमुळे अरब जगातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संताप वाढला आहे. इराणने त्यांच्याशी असलेले संबंध सुधारण्याच्या सौदीच्या इच्छेबद्दलही शंका व्यक्त केली आहे. कारण इराणने पॅलेस्टाईनवरील इस्त्राईलच्या अत्याचाराचा तीव्र निषेध केला आहे असेही या वृत्तपत्रात म्हटले आहे. इराण आणि सौदी अरेबियातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी बगदादमध्ये पडद्यामागील चर्चा आयोजित केली होती. या चर्चेचे आतापर्यंत कोणतेही ठोस निकाल लागलेले नाहीत आणि इस्त्राईल-गाझा भडकल्यानंतर ते आणखी गुंतागुंतीचे होतील अशी अपेक्षा आहे कारण सौदी आणि अमीराती लोक इस्त्राईलकडे जास्त झुकलेले आहेत आणि इराणसाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर आणि धोकादायक आहे असे इराणला वाटत आहे