Date: 23-Apr-2021 |
लब्बाईक हिंसाचार आणि इम्रान खानची भूमिका.
- प्राची चितळे जोशी.
(ICRR Content Generation )
तहरीक-ए-लब्बाईक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टर धार्मिक गटाने पाकिस्तानात हिंसाचार माजवला आहे. गेल्या रविवारी त्यांनी लाहोरमध्ये जोरदार प्रदर्शने केली. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत ४ पोलीस मृत्युमुखी पडले. तर ८०० च्या वर जखमी झाले. डीएसपी सकट १२ पोलिसांचे पोलीस चौकीत शिरून अपहरण केले गेले. पोलिसांनी बाहेर पडावे म्हणून त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. पोलिसांनी अचानक आमच्या ठिकाणांवर छापे मारले असं टीलपीचं म्हणणं आहे तर अपहरण केलेल्या पोलिसांना सोडवण्यास आम्ही गेलो होतो असं पोलिसांचं म्हणणं आहे.
१९२ शहरांना वेठीस धरल्यामुळे टीएलपीवर पाकिस्तान सरकारने "दहशतवादी संघटना" असे जाहीर करून बंदी घातली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी बुधवारी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ही घोषणा केली. या बंदीच्या अंतर्गत टीएलपीच्या सदस्यांना राजकारणात सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्यांची संपत्ती सुद्धा जप्त केली जाऊ शकते असं त्यांनी सांगितलं.
फ्रान्समध्ये गेल्या वर्षी चार्ली हेब्दोने प्रेषित मोहम्मदांची बदनामी करणारी जी कार्टून्स प्रसारित केली त्याचा राग म्हणून किंवा निषेध म्हणून फ्रान्सच्या राजदूताची हकालपट्टी करण्याची टीएलपी मागणी गेल्या वर्षापासून टीएलपी करत आहे. पाकिस्तान सरकारने २ ते ३ महिन्यात फ्रांसच्या राजदूताला परत पाठवण्यात येईल असा करार १६ नोव्हेंबर २०२० रोजी टीएलपीचे प्रमुख खादिम रिजवी यांच्यासोबत केला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ ला टीएलपी आणि सरकार यांच्यात पुन्हा एक बैठक झाली आणि २० एप्रिल पर्यंत फ्रान्सच्या राजदूताला परत पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले. गेल्या वर्षी खादिम रिझवी निर्वतल्यानंतर सर्वसंमतीने त्यांच्या मुलाला साद रिझवीला प्रमुख बनवण्यात आले. त्यालाच प्रदर्शनादरम्यान पोलिसांनी अटक केल्याने हा जमाव भडकला.
देशाला वेठीस धरल्यामुळे, सामान्य जनतेला त्रास दिल्यामुळे, रस्त्यावर उतरून देशाच्या संपत्तीची नासधूस केल्यामुळे आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे टीएलपीला आतंकवादी म्हणून घोषित करून त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली असल्याचे पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी ट्विटरवर स्पष्ट केले.
फ्रेंच राजदूताला परत पाठवून ईशनिंदा थांबणार आहे का? त्यासाठी जगातल्या सर्व मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरज आहे असे इम्रान खान म्हणाले. प्रेषित मोहम्मदाला अपशब्द वापरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी आणि पाश्चिमात्य देशांना वठणीवर आणण्यासाठी सर्व मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येऊन एक लॉबी स्थापन करणे आवश्यक आहे. ब्लास्फेमी कायदा अमलात आणण्याविषयी या लॉबीने एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रेषित मोहम्मदांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही.' असं ५० मुस्लिम देशांनी मिळून ठरवलं पाहिजे. जर कुठल्या देशात प्रेषितांचा अपमान होत असेल तर आपण सर्व मिळून त्यांच्यावर व्यापार बंदी घातली पाहिजे. आणि हा उपाय नक्कीच यशस्वी होईल. केवळ फ्रेंच राजदूत परत पाठवून ईशनिंदा थांबणार नाही. ती जगातल्या कोणत्या ना कोणत्या देशात चालूच राहील. तेव्हा आपण मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येणं आवश्यक आहे.
फ्रेंच राजदूताला ब्लास्फेमीच्या कायद्याखाली हाकलून देण्यात यावे असे अनेक मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे. पाकिस्तानात ब्लास्फेमी म्हणजे ईशनिंदा हा खूप संवेदनशील विषय आहे. ईशनिंदा करणाऱ्याला सरळ मृत्युदंडाची शिक्षा होते. १९९० पासून जवळपास ८० च्या वर माणसांना जमावाने ठार केलंय.
तहरीक-ए- लब्बाईक पाकिस्तान सरकारची डोकेदुखी ठरला आहे. कट्टरपंथीय असलेली ही संघटना देशाचं आणि नागरिकांचं नुकसान करत सुटलीय. त्याला इम्रान खान सरकार कसा आळा घालतोय हे बघणं रंजक ठरेल.