चाबहार बंदरावरील व्यापाराच्या वृद्धीसाठी जेएनपीटी, दीनदयाल बंदरांनी मालवाहू जहाजांना दिली सवलत.
         Date: 02-Mar-2021

चाबहार बंदरावरील व्यापाराच्या वृद्धीसाठी जेएनपीटी, दीनदयाल बंदरांनी मालवाहू जहाजांना दिली सवलत.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk )

 

चाबहार बंदर इराणच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर सीस्तान-बलुचिस्तान प्रांतात भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने वसवले गेले आहे. हे बंदर पर्शियन आखाताच्या बाहेर आहे आणि पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा सागरी संबंध न येता भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून इथे सहजपणे प्रवेश केला जातो.

 

चाबहार बंदरातील व्यापार वाढविण्यासाठी मोठी मोठी जहाजे आणि मालवाहू जहाजे यांच्यावरील करामध्ये इराण, जवाहरलाल नेहरू बंदर आणि दीनदयाळ बंदर यांनी सवलत देऊ केली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यापासून ट्रान्झिट कंटेनरच्या टर्मिनल हॅण्डलिंग शुल्कावर पन्नास टक्के सूटही देण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयाने दिली.

 

चाबहार बंदरासंबंधित मुख्य करारामधील अडचणी लक्षात घेता भारत आणि इराण यांच्यात ६ मे २०१८ रोजी एक औपचारिक असा छोटा करार (शॉर्ट लीज ऍग्रीमेंट) करण्यात आला.  या कराराच्या अटी आणि शर्ती दहा वर्षाच्या करारापेक्षा भिन्न आहेत. आतापर्यंत टर्मिनलवर सुमारे १२३ जहाजे दाखल झाली असून जवळपास १८ लाख टन मालवाहू जहाजांवरील माल उतरवला गेला आहे. या शॉर्ट लीजचे नूतनीकरण २५ जून २०२१ करण्यात येईल.

 

एकाच वेळी या टर्मिनलवर चार मोठी जहाजे थांबू शकतात. बंदराची लांबी १२४० मीटर इतकी असून ७० एचए बॅकअप क्षेत्र आहे.

 

chabahar_1  H x
 

कराराच्या अटींनुसार, सध्या भारत ८५ मिलियन खर्चून पहिल्या टप्प्यातील दोन टर्मिनल्स सुसज्ज करून वापरू शकतो. मुख्य करारानंतर भारत दहा वर्षासाठी चाबहारचे शाहिद बेहेष्टी बंदर वापरू शकेल.

 

सीओएनसीओआरने भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यापासून मॉस्कोमधील व्होर्सीनॊ टर्मिनलपर्यंत व्हाया शाहिद बेहेष्टी बंदर चाबहार येथून आयएनएसटीसी (आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन कॉरिडोर) मार्गाद्वारे शिपिंग सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. चाबहार पर्यंत सागरी मार्गाचा उपयोग करून नंतर रस्ता आणि रेल्वेमार्गे वाहतूक करता येईल. हा प्रस्ताव विचाराधीन आहे.

 

जानेवारीत भारताने चाबहार बंदराला २५ दशलक्ष डॉलर्सच्या दोन मोबाईल हार्बर क्रेन दिल्या.  वेनिस जवळ अजून दोन क्रेन्स लोडींगसाठी उभ्या आहेत आणि त्या मार्च अखेरीस चाबहारला पोचतील. तर आणखी दोन क्रेन्स जून अखेरीस दिल्या जातील. मोबाईल हार्बर क्रेन वितरित झाल्यानंतर रेल्वेवर बसविलेल्या क्रेन खरेदी करण्याची योजना आहे असे संजय बंडोपाध्याय या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

२०१७ पासून चाबहार बंदरातून भारताने १.१ लाख टन गहू, डाळी आणि इतर साहित्य भरलेले ४,८०० कंटेनर अफगाणिस्तानमध्ये पाठवले आहेत.

 

चाबहार बंदर हे सामरिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं बंदर आहे. भारत, इराण, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि इतर सीआयएस राज्ये या सर्वाना व्यापारी दृष्टीकोनातून जोडणारे असे हे बंदर आहे.

 

चाबहार बंदराच्या विकासामुळे भारत आणि इराणमधील सागरी व्यापारास चालना मिळून आर्थिक संबंध तसेच परस्पर संबंध वृद्धिंगत होतील.

 

Source : youtube, google, financial express, hellenicshippingnews