शौर्यगाथा- ४ शालाटेंगची लढाई
         Date: 07-Dec-2021

शौर्यगाथा- ४ 

शालाटेंगची लढाई

 
Brigadier Lionel P Sen_1&
 

बडगामच्या लढाईनंतर दुसऱ्याच दिवशी सरदार वल्लभभाई पटेल आणि संरक्षणमंत्री सरदार बलदेवसिंग काश्मीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले असताना, शत्रूच्या अफाट संख्येबद्दल सांगून लवकरात लवकर अधिक कुमक पाठवण्याची विनंती ब्रिगे. सेन यांनी पटेलांजवळ केली. तसे आश्वासन देऊन ज्या दिवशी सकाळी पटेल दिल्लीला परत गेले त्याच दिवशी संध्याकाळी 'ऑप्स रूम' मध्ये असतानाच दिल्लीहून पायदळाच्या(infantry) दोन बटालियन्स, तोफखान्याचे (artillery) बॅटरी स्क्वॉडर्न आणि एक चिलखती गाड्यांचे स्क्वॉडर्न आणि त्यांच्याबरोबर रस्ता दुरुस्तीसाठी इंजिनियर्सची माणसे दिल्लीहून श्रीनगरकडे रवाना झाली आहेत अशी बातमी ब्रिगे. सेन यांना मिळाली, आणि त्यांना नवा हुरूप आला. आज हे गांव जाळले, ते गांव लुटले अशा बातम्या सतत येत असूनही हा खंबीर आणि चाणाक्ष सेनानी खचला नव्हता आणि त्याने आपल्या सेनेलाही खचू दिले नव्हते. यातून काय आणि कसा मार्ग काढायचा याचा विचार करत ते रात्रंदिवस ऑप्स रूममधील नकाशासमोर बसलेले असत. असाच विचार करत असताना त्यांच्या लक्षात आले, की चहूबाजूंनी टोळ्यांमध्ये विखुरलेला शत्रू जर एकत्र एखाद्या ठिकाणी सापडला तर त्याच्या बीमोड करणे अधिक सोपे आणि परिणामकारक असेल.

केलेली लूट लादून नेण्यासाठी टोळीवाले ज्या लॉऱ्या किंवा ट्रक घेऊन आले होते, ते घेऊन पुढे जाण्यासाठी त्यांना कायमच मोठ्या आणि मुख्य रस्त्याची आवश्यकता होती. लहान रस्त्यांवरून या लॉऱ्या किंवा ट्रक अंत घुसवून पुढे जाणे त्यांना अशक्य होते. आणि त्यांची हीच कमकुवत कडी ओळखून ब्रिगे. सेन यांनी आपला पुढचा व्यूह रचला. या टोळीवाल्यांचा मुख्य रस्ताच बारामुल्लाजवळ आपल्या सेनेने बंद केला असल्यामुळे हे टोळीवाले इकडे तिकडे पांगून हल्ले करत होते. हा रस्ताच खुला केला तर..? त्यांनी त्यांची योजना डोक्यात पक्की केली आणि पट्टनजवळची 1 शीख बटालियन मागे घेण्याचे आदेश दिले! त्या निर्णयावर दिल्लीत बराच गोंधळ झाला, अगदी सेन यांना तात्काळ बडतर्फ करण्याची देखील मागणी केली गेली, मात्र पुन्हा एकदा सरदार पटेल त्यांच्यामागे भक्कम उभे राहिले. 1 शीख मागे घेण्यापूर्वी ब्रिगे. सेन यांनी आपला व्यूह श्रीनगरपासून उत्तरेला 5-10 किलोमीटर्सवर असणाऱ्या शालाटेंग या गावाजवळ रचला होता. त्यांच्या आदेशाप्रमाणे पट्टनजवळची 1 शीख बटालियन मागे घेऊन ती शालाटेंग रस्त्याजवळ मैल दगड 4 पर्यन्त मागे घेतली गेली. भारतीय सेनेने माघार घेतली, बडगामच्या लढाईनंतर भारतीय सेनेचे मनोधैर्य खचले आहे अशा बातम्या उठवून दिल्या. परिणाम व्हायचा तोच झाला. 7 नोव्हेंबर 1947 या दिवशी शालाटेंगच्या मैल दगड 6 ते मैल दगड 8 मध्ये हजारोंच्या संख्येने शत्रू गोळा झाल्याचे आणि सुमारे दीड -एकशे ट्रक्स एकामागोमाग एक उभे असल्याची बातमी घिरट्या घालणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या विमानांकडून मिळाली. लगेचच बांदीपूरच्या दिशेकडे रिकॉनिन्स पेट्रोलिंग वर असणाऱ्या लेफ्टनंट नोएल डेव्हिड या 7 cavalry रेजिमेंटच्या तरूण अधिकाऱ्याला आपल्या डेमलर फेरर प्रकारच्या दोन चिलखती गाड्या(रणगाडे नव्हेत) घेऊन गंदरबलच्या आधीच्या रस्त्याने पश्चिमेकडे वळून शालाटेंगच्या पिछाडीला गपचूप पोचण्यास सांगितले गेले. रायफल रेंजजवळ असणारी पॅरा कुमाऊँ ही पलटण हळूहळू टोळीवाल्यांच्या दक्षिणेला सरकून तयारीत आपली जागा घेऊन दबा धरून बसली. आघाडीवर 1 शीख पलटण होतीच. एका बाजूने झेलम आणि नांगरलेली भुसभुशीत जमीन होती. एकूण शत्रू पुरता वेढला गेला होता. ज्याक्षणी लेफ्टनंट डेव्हिडने तो ईप्सित स्थळी पोचल्याचे कळवताक्षणीच ब्रि. सेन यांनी आपल्या सेनेला ‘गो ‘ आदेश दिला, आणि मग पुढची जवळजवळ पंधरा मिनिटे मागून डेव्हिडच्या चिलखती गाड्या आणि पुढून 1 शीख पलटणीने तुफान गोळीबार सुरू केला. त्यानंतर पॅरा कुमाऊँच्या जवानांनी संगिनी चढवून हल्ला केला. टोळीवाल्यांना पळायला देखील जागा मिळेना. नांगरलेल्या जमिनीत त्यांचे पाय रुतू लागले. त्यातच भारतीय वायुसेनेची विमाने येऊन पोचली आणि त्यांनी पळणाऱ्या पठाणांवर स्ट्रॅफिकिंग करून आणखी बिकट अवस्था केली. जवळ जवळ दोन तासांच्या या तुंबळ लढाईनंतर भारतीय सेनेने बाजी पलटवली. शत्रूची कमकुवत बाजू अचूक ओळखून तिचा फायदा घेत येईल असा व्यूह रचून बुद्धीचातुर्याने संख्याबलावर विजय मिळवता येतो हे या लढाईने पुन्हा एकदा सिद्ध केले होते. ब्रिगेडियर सेन सारखा खंबीर, निर्भय आणि युद्धनिष्णात सेनानी होता, म्हणूनच काश्मीरचे रक्षण करणे शक्य झाले होते. जवळजवळ 472 घुसखोर एकट्या शालाटेंगजवळच मारले गेले. शिवाय इतरत्र एकूण 146 मृतदेह मिळाले. जवळजवळ 138 ट्रक तसेच मागे टाकून अखेर घुसखोर पुन्हा मुझफ्फराबादच्या दिशेने पळू लागले. आपल्या सेनेने पाठलाग करत करत उरीपर्यंतचा भाग पुन्हा ताब्यात घेतला. मात्र त्यानंतर अधिक पुढे जाणे थोडेसे कठीण असणार होते, कारण जसजशी सेना एखादा प्रदेश जिंकत पुढे जाते तसतशी मागून मिळत असणारी रसद आणि कुमक देखील ताणली जात असते. ताब्यात घेतलेल्या प्रदेशांची व्यवस्था नि तिथली संरक्षण व्यवस्था नीट लावल्याशिवाय पुढे पाऊल घालणे हा वेडेपणा ठरू शकतो. अचानक शत्रूचा मोठा हल्ला समोरून आला आणि सेनेमागे पुरेशी ताकद आणि कुमक नसेल तर बाजी पलटू शकते. आणि म्हणूनच उरीला पोचताक्षणीच ब्रिगे. सेन यांनी अधिक कुमक पाठवणीची मागणी वारंवार करायला सुरुवात केली. आणि नेमकी कुठे माशी शिंकली असावी याविषयी अजूनही मतप्रवाह आहेत, परंतु कोणत्याही कारणाने का होईना आपल्या सेनेला आवश्यक कुमक पुरवठा वेळेवर मिळत नव्हता ही वस्तुस्थिती होती. इतकेच नव्हे तर लढणाऱ्या सैनिकांसाठी आवश्यक सोयीसुविधा देखील पुरेशा प्रमाणात मिळत नव्हत्या. या कोणत्याही अडचणींना न जुमानता आपली सेना बहुतांश ठिकाणी एकाकीच पराक्रमाची शर्थ करत होती. शालाटेंगच्या लढाईनंतर बराच काळ कोणताही मोठा हल्ला झाला नाही. भारतीय सेनेला कुमक न मिळाल्यामुळे त्यांनी चढाई थांबवली आणि पराभवाने हबकलेल्या पाकिस्तानला सावरायला वेळ मिळाला. त्यानंतर 2-3 वेळ त्यांनी उरी परत घ्यायचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. उरीचा पक्का बंदोबस्त करण्यात बराच अवधी खर्ची पडला. यानंतर पूंज-हाजीपीर खिंड, भटगिरा , माहुरा वीजकेन्द्रावरचा हल्ला अशा अनेक लहान लहान लढाया भारतीय सेना सतत लढवत होती. छोट्या मोठ्या चकमकी झडत होत्या. शालाटेंगनंतर पुन्हा एकदा भारतीय सेनेचे युद्ध आणि डावपेच कौशल्य प्रत्ययास आले ते लिंबर नाल्याच्या लढाईत!

बारामुल्ला-उरी रस्त्यावर, झेलमच्या उत्तरेला एक नाला जातो, त्याचं नाव लिंबर नाला. हा नाला जिथे झेलमला मिळतो तिथेच दक्षिणेच्या किनाऱ्यावर नौशेरा शहर आहे. उरी ते बारामुल्लामध्ये पसरलेल्या 161 पायदळ ब्रिगेडला ‘धडा शिकवण्यासाठी एका मोठ्या हल्ल्याची तयारी झाली होती. त्यासाठी लिंबर नाला या ठिकाणी मोठ्या संख्येने म्हणजे जवळ जवळ दोन ते अडीच हजार सैनिकांना, पाकिस्तानी ब्रिगेडिअर खलीलच्या नेतृत्वाखाली एकत्र केले गेले होते. जागरूक हेरखात्याकडून वेळीच मिळालेल्या बातम्यांमुळे भारतीय सेना आधीच सावध झाली होती. आजूबाजूच्या खबऱ्यांकडून आणि अन्य मार्गांनी देखील लिंबर नाल्याजवळ अशी फौज जमत असल्याच्या बातमीला पुष्टी मिळाली होती. ब्रिगे. खलीलच्या नेतृत्वाखाली सज्ज झालेल्या या टोळीचे नाव होते 'आझाद काश्मीर पूंज’. इकडे 161 पायदळ(infantry) ब्रिगेड देखील ब्रिगे. सेन यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारीत होती. फक्त हल्ल्याची नेमकी वेळ कळत नव्हती.. अखेर ती वेळ एक वायरलेस सांभाषणातून कळली. आणि 10 एप्रिल 1948 रोजी,काळोख पडल्यावर 3 गढवाल ही पलटण महार मशीनगन्सचा एक विभाग घेऊन निघाली आणि रातोरात बारामुल्लामार्गे जाऊन त्यांनी शिखर 7129 ताब्यात घेतले. हे समजताक्षणी खलील ने शिखर 7706 वर असणाऱ्या त्यांच्या जवानांकडे आणखी कुमक पाठवली. हे बातमी कळताक्षणी ब्रिगे. सेन यांनी नौशेरामधील तोफांच्या सहाय्याने शिखर 7706 ला अक्षरश: भाजून काढले. त्याशिवाय आता खुद्द लिंबर नाल्यावरही भारतीय तोफखाना आग ओकू लागला. 11 एप्रिलची सारी रात्र खलीलची फौज होरपळून निघाली. 12 एप्रिलल सकाळीच 3 गढवाल पलटणीने शिखर 7706 जिंकून घेतले. तर 13 एप्रिलला सकाळी 4 कुमाऊँ आणि माऊंटन बॅटरीच्या तोफांनी मिळून माहुराजवळ चे कोपरा हे ठिकाण ताब्यात घेतले. आता ब्रिगेडियर खलील आणि त्यांची आझाद काश्मीर पूंज तिन्ही बाजूंनी घेरली गेली. चौथ्या बाजूला पीरपंजालच्या विशाल पर्वतरांगेने रस्ता रोखला होता. अखेर लिंबर नाल्यातले 2500 पठाण उघड्या नाल्यातून धावू लागले आणि अलगद 3 गढवाल पलटणीच्या उखळी तोफांचे लक्ष्य बनले. अगदी नेमक्या मुहूर्तावर भारतीय वायुसेनेची दोन विमाने देखील सहज घिरट्या घालत घालत तिकडे पोचली. वास्तविक ती या योजनेत सहभागी नव्हती. पण खालची परिस्थिती दिसताक्षणी त्यांनी लगेच पर्वत चढून पळू पाहणाऱ्या पठाणांना स्ट्रॅफिंग करून मारले. त्यादिवशी संध्याकाळी चार पर्यन्त लिंबर नाल्याची लढाई चालली आणि त्यात ब्रिगेडियर खलील आणि त्यांच्या सेनेचा पार धुव्वा उडाला. सगळी मिजास झटक्यात उतरली.

आणि 1947-48 च्या युद्धात 161 पायदळ(infantry) ब्रिगेड आणि अन्य सर्व पलटणींनी केवळ श्रीनगर वाचवले असे नव्हे तर बारामुल्ला, उरीसारखी शहरे पुन्हा शत्रूच्या तावडीतून मुक्त केली. ब्रिगे. एल. पी. सेन यांनी अपुरी कुमक आणि साधनसामग्री, प्रतिकूल वातावरण या सगळ्याचा सामना करत अप्रतिम रणनीती आणि युद्धकौशल्य दाखवत या सर्व लढाया जिंकल्या आणि काश्मीर वाचवले. काश्मीरच्या पश्चिमेला अशी धुमश्चक्री चालू असतानाच पाकिस्तान तिकडे गिलगिटचा घास गिळून स्वस्थ बसले नव्हतेच. गिलगिट स्काऊट या तुकडीच्या मदतीने स्कर्दू, कारगीलमार्गे थेट लडाखची राजधानी लेह गिळंकृत करण्याचा नवा घाट ते घालत होते- 'ऑपरेशन स्लेज!' त्याविषयी पाहूया पुढल्या भागात.

जय हिंद!