Date: 03-Dec-2021 |
शौर्यगाथा – 1
विषयप्रवेश
1971 साली भारताच्या सहाय्याने बांग्लादेश या एका नव्या देशाची निर्मिती झाल्याचा इतिहास आपणा सर्वांनाच ठाऊक आहेच. 2021 हे त्या युदधातल्या दिमाखदार विजयाचं सुवर्ण महोत्सवी वर्षं आहे. 3 डिसेंबर 1971 ला सुरू झालेलं हे युद्ध 16 डिसेंबर 1971 ला म्हणजे तब्बल चौदा दिवसांनी पाकिस्तानच्या सपशेल शरणागती नंतरच थांबलं. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने, भारताने स्वातंत्र्य मिळाल्यापासून 71 पर्यन्त लढलेल्या एकूण चार ते पाच युद्धांचा विस्तृत आढावा यथामती आणि यथाशक्ती घेण्याचा प्रयत्न करण्याचा मानस आहे. त्यातली 62 आणि 71 ची युद्धे सोडता अन्य सर्व युद्धे ही काश्मीरच्या भूमीवर आणि काश्मीरच्या भूमीसाठीच लढली गेली असल्यामुळे काश्मीरविषयी अधिकाधिक ऊहापोह करण्याच्या दृष्टीनेच सुरुवातच काश्मीरच्या ओळखीपासून करणे उचित ठरेल.
काश्मीर! केवळ नाममात्रेच अतिशय डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्ग, बर्फाच्छादित आणि उत्तुंग डोंगररांगा, आल्हाददायक गारवा, कमळांनी भरलेली सरोवरे, शिकारे, सफरचंद, केशर, त्याचबरोबर, अगणित परकीय आक्रमणं, रणगाडे, तोफा, युद्ध, गोळीबार, देशाचं दु:खद विभाजन, त्यामुळे झालेला संघर्ष, विश्वासघाताचं दु:ख, लेच्यापेच्या नेतृत्वामुळे या विभागाला सोसावे लागलेले अनन्वित अत्याचार, आणि तरीही भारताप्रती आपली निष्ठा, विश्वास आणि प्रेम टिकवून ठेवून सतत झुंजत राहणारी इथली जनता हे सगळं सगळं क्षणार्धात समोर उभं ठाकतं! एकीकडे इतका स्वर्गीय प्रदेश आपला आहे याचा अभिमान तर दुसरीकडे त्या नंदनवनाला जपण्यात आपण कमी पडत असल्याची बोचणी घेऊनच प्रत्येक सजग आणि संवेदनशील भारतीय वावरत असतो.
काश्मीरची कथा तशी खूप खूप मागे नेली तर नीलमत पुराण किंवा महाभारतकालापर्यन्त मागे नेता येते. महाभारतामध्ये काश्मीरप्रदेशाचे वर्णन आहे तर नीलमत पुराणामध्ये काश्मीरच्या निर्मितीची कथा येते. ही कथा खरी किंवा खोटी मानली तरी त्याकाळात काश्मीर प्रदेश अस्तीत्वात होता आणि तो भारताचाच भाग होता याविषयी किंतु रहात नाही. काश्मीरची भौगोलिक रचना काहीशी दुर्गम तरीही सुंदर अशीच आहे. जगातली सगळ्यात मोठी पर्वतमाला–हिमालय, जिने काश्मीरचा बराचसा भाग व्यापलेला आहे. या पर्वतमालेतील अनेक लहान मोठ्या पर्वतरांगा काश्मिरात पसरलेल्या आहेत. त्याविषयी थोडे जाणून घेऊया.
काश्मीरमध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ आणि तिबेट या पाच देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत. पैकी भारताच्या उत्तर सीमेवर पूर्वपश्चिम जाणारी हिमालयाची सगळ्यात मोठी पर्वतरांग आहे ती म्हणजे ‘काराकोरम रेंज ‘ सध्या ही रांग पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहे. सुप्रसिद्ध ‘के 2’ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर याच पर्वतरांगेत येते. आणि याच रेंजमधून चीन पाकिस्तानमधला काराकोरम हायवे देखील जातो आहे! काराकोरम रेंजच्या पश्चिमेला बाल्टिस्तान प्रदेश असून, काराकोरमच्या दक्षिणेकडे लडाखची छोटी पर्वतरांग येते. लडाखच्या खालच्या बाजूस झंस्कारचा डोंगराळ भाग असून त्याच्या पश्चिमेस काश्मीरचे खोरे आहे. शिवालिक रेंजचा भाग असणारी पीरपंजाल ची पर्वतरांग, काश्मीर खोऱ्याच्या पश्चिमेला उभी आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याचे एकूण क्षेत्रफळ 2,22,236 चौ.कि.मी असून त्यातला जवळजवळ 78,114 चौ.कि.मी. प्रदेश पाकिस्तानने व्यापलेला आहे, तर 37,555 चौ.कि.मी चा भूभाग हा चीनने गिळलेला आहे. थोडक्यात जवळजवळ एक तृतीयांश काश्मीर हे भारताच्या प्रत्यक्ष ताब्यात नाही. असं का? असं काय घडलं म्हणून हा इतका महत्त्वाचा भाग आपण आपल्या हातातून जाऊ दिला? त्यासाठी असे काय डावपेच खेळले गेले? आपली सेना इतकी निधड्या छातीची, कणखर, शूर आणि अत्यंत निष्ठावान असूनही हा प्रदेश का वाचवता आला नाही? असे कित्येक प्रश्न सतत समोर येत असतात.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांनी आपली सत्ता सोडून इथून काढता पाय घेतला. त्यामागे अनेक ज्ञात-अज्ञात भारतीय स्वातंत्र्यवीरांनी दिलेली कडवी झुंज, असीम त्याग, बलिदान यांचा वाटा सर्वाधिक आहे यात संशय नाहीच. त्याशिवाय, दुसऱ्या महायुद्धामध्ये जरी इंग्लंड जेता होता, तरी युद्धाच्या झळीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आला होता. इतक्या लांबून भारतातली सत्ता सांभाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि आर्थिक बळाची टंचाईदेखील होतीच. भारताच्या भूमीवरचे वर्चस्व सोडून देणे जरी ब्रिटनला भाग होते, तरी इतक्या सहजासहजी ते तिथला हक्क सोडणार नव्हते! का? भारतातील साधनसंपत्ती आणि बाजारपेठ याशिवाय आणखी एक अतिशय महत्त्वाकांक्षी कारण या मागे होते, ते म्हणजे भारताचे भौगोलिक स्थान! 1904 साली इंग्रज भूगोलशास्त्रज्ञ मॅकिंडर यांनी आपला मर्मभूमी सिद्धांत (theory of heartland) पहिल्यांदा मांडला. त्यानुसार रशिया हा जगातील मर्मभूमी प्रशासक आणि म्हणूनच बलाढ्य राष्ट्र ठरत होते. अर्थातच, दुसऱ्या महायुद्धानंतर रशियावर वचक ठेवण्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेला देखील पूर्व गोलार्धातील एक मोक्याची जागा ताब्यात असणे आवश्यक वाटत होते. त्यादृष्टीने आणि एकूणच भौगोलिक स्थान लक्षात घेता भारताइतका उपयुक्त पर्याय अन्य कोणताही असू शकत नव्हता. आणि म्हणूनच जरी भारतावरील सत्ता सोडणे भाग होते तरी ब्रिटनला भारत पूर्ण हाताचा जाऊ देणे परवडणारे नव्हते. मुळातच फाळणीची चिथावणी आणि काश्मीर प्रश्न चिघळवण्याचे मूळ यात लपले होते. ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीमध्ये ब्रिटिश निपुण होतेच! त्याप्रमाणे 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य देताना संस्थानांना देश म्हणून भारतात विलीन होण्या न होण्यासंबंधीचे अधिकार देऊन अधिकाधिक अराजक माजवण्याचा पहिला प्रयत्न केला गेला, जो वल्लभभाई पटेल या लोहपुरुषाच्या प्रयत्नांमुळे बहुतांशी निष्प्रभ झाला. हैदराबाद आणि काश्मीर ही दोन संस्थाने विलीन झाली नाहीत. हैदराबाद संस्थान बलप्रयोगाद्वारे विलीन करून घेतले गेले. काश्मीर संस्थानाने भारताशी एक वर्षाचा ‘जैसे थे’ करार केला होता, कारण काश्मीरचे महाराज हरिसिंग यांना पाकिस्तान किंवा भारत कुठल्याही राष्ट्रांत विलीन व्हायचे नव्हते. मात्र बहुसंख्य मुस्लीम असणाऱ्या काश्मिरी जनतेला आणि बक्षी गुलाम महंमद, मिर्झा अफजल बेग, सेयाद मीर कासीम,गुलाम महंमद सादिक इत्यादी नेत्यांना धर्माधारित द्विराष्ट्र संकल्पना मान्य नव्हती, त्यांना भारतातच सामील व्हायची इच्छा होती. अत्यंतिक अहंकारी आणि मुस्लीम धर्माधिष्ठित राष्ट्र हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवणाऱ्या मुहम्मद अली जीनांना हे मान्य होणं अशक्य होतं. कारण हा त्यांचा धडधडीत अपमान होता! स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल या नात्याने त्यांनी निर्णय घेतला की काश्मीर पाकिस्तानलाच मिळाले पाहिजे!! त्यापायी आपल्याच धर्मातील अन्य बांधवांचे हाल होऊ शकतील त्यांना घरदारला मुकावे लागू शकेल असा कोणताही विचार करण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही. धर्मापेक्षाही अहंकार मोठा ठरला होता! म्हणूनच त्यांनी काश्मीर घेण्यासाठी कारवाया सुरू केल्या. सगळ्यात आधी पाकिस्तानातून येणारे अन्नधान्य पेट्रोल इ . आवश्यक गोष्टींचा पुरवठा बंद करून तेथील जनतेला नमवायचा प्रयत्न केला. तो साध्य होत नाही म्हटल्यावर पाकिस्तानातीलच वायव्य प्रदेशातील अत्यंत क्रूर अशा पठाण टोळ्यांना हाताशी धरून काश्मीर संस्थान बळकावण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. या पठाणांच्या छोट्या छोट्या टोळ्या करून त्या काश्मीर संस्थानाच्या हद्दीत घुसवल्या जाणार होत्या. या टोळ्यांचे नेतृत्व पाकिस्तानी सैनिक करणार होते, अर्थातच गणवेश न घालता! भरपूर दारूगोळा, शस्त्रास्त्रे अन्य साधनसामुग्री या सर्व टोळ्यांच्या स्वाधीन केली गेली. काश्मीर संस्थानात घुसून अगदी मुक्त हैदोस घालण्याची पूर्ण सूट देऊन, जमवलेली लूट लादून नेण्यासाठी सुमारे 500 ट्रक किंवा लॉऱ्यासुद्धा पुरवल्या गेल्या होत्या. आणि काफीरांवर सूड उगवण्याची ही संधी आहे असे सांगत त्यांना धडधडीत सूचना दिल्या गेल्या त्या समोर येईल ते गांव लुटण्याच्या, जाळण्याच्या आणि सापडेल ती स्त्री भोगण्याच्या! सूड? कसला सूड होता हा? पाकिस्तानला नाकारून तेथील जनतेने भारतात विलीन व्हायचा निर्णय घेतला याचा सूड? जीनांच्या अहंकाराला डिवचल्याचा सूड? की केवळ काफीर असण्याचीच शिक्षा जी तेथील जनता अगदी आजतागायत भोगते आहे?
22 ऑक्टोबर 1947 रोजी पठाण टोळ्यांचा पहिला हल्ला झाला, तो काश्मीर संस्थानच्या हद्दीत असणाऱ्या मुजफ्फराबाद या सीमानिकट गावावर! जवळजवळ पांच हजार पठाण मुझफ्फराबादमध्ये घुसले.. आणि पुढचा नंगानाच कथन करण्याची देखील शक्ती नाही.. तर भोगणाऱ्यांचे काय झाले असेल! भारत हे नवे राष्ट्र निर्माण होऊन अवघे दोन महिने झाले होते. या दोन महिन्यांत देखील विभागलेल्या मालमत्तेचे वाटप करण्यातच भारतीय प्रशासनाची निम्मी ताकद खर्ची पडत होती. ‘पितृतुल्य’ नेत्यांचे लाडके अपत्य असणाऱ्या पाकिस्तानला त्याच्या वाटणीची शस्त्रसामग्री आणि अन्य उपकरणे देण्याच्या कमी आपले धुरंधर सेनानी जुंपले गेले असतानाच पाकिस्तानचे मेजर जनरल अकबरखान मात्र एक वेगळाच व्यूह रचण्यात गुंतलेले होते. पठाण टोळ्यांना आणि आपल्या प्रशिक्षित सैनिकांच्या सहाय्याने काश्मीरचा घास घेण्याचा एक धूर्त आणि तितकाच क्रूर व्यूह त्यांनी रचला – ऑपरेशन गुलमर्ग!!
ऑपरेशन गुलमर्गचे च रूपांतर पुढे 1947 -48 च्या युद्धात झाले. कसे ते पुढल्या भागात पाहूया.