Date: 10-Dec-2021 |
शौर्यगाथा- ६
भारत-चीन युद्ध- १९६२
1962 साली चीन आणि भारतामध्ये झालेले युद्ध हे केवळ एकाने जमिनीवर आक्रमण केले आणि दुसऱ्याने ती जमीन वाचवण्यासाठी प्रतिकार केला इतक्या सरळपणे रंगवता येणार नाही. त्यामागे अनेकविध घटना घडून गेल्या होत्या आणि त्याची परिणीती अखेर ऑक्टोबर 1962 रोजी युद्धात झाली होती.
1947 साली भारत स्वतंत्र झाल्यावर एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपल्या राजकीय-भौगोलिक सीमांची निश्चिती करून त्या तात्काळ सुरक्षित करून घ्यायला हव्या होत्या. ऑक्टोबर 1947 साली लगेचच पाकिस्तानने काशीरवा हल्ला केल्याने तेवढी उसंत मिळाली नाही. मात्र पाकिस्तानच्या या घुसखोरीच्या अनुभवानंतर तरी शहाणे होऊन तत्कालीन नेतृत्वाने हे काम पुरे करायला हवे होते. पण तसे झाले नाही. 1914 सालच्या सिमला करारामध्ये ब्रिटिशांनी सैन्यबळावर आखलेली मॅकमोहन रेषा चीनशी आधीच चर्चा करून मान्य करून घेणे अगदी सहज शक्य होते. मात्र ते ही केले गेले नाही. 1957 मध्ये चीनने तिबेट-सिंकियांग रस्ता बांधल्यावर मात्र ही शक्यता देखील संपुष्टात आली. एकूणच चीनची एक देश म्हणून वागणूक अविश्वासार्ह आहे हे सरदार वल्लभभाईनी पूर्वीच जोखले होते. 1950 मध्ये मृत्यूपूर्वी काही दिवस आधी त्यांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात असे स्पष्ट म्हटले होते की ‘आपण चीनला मित्र समाजात असलो तरी चीन आपल्याला मित्र मानत नाही.’बारा वर्षे आधी या द्रष्टया नेत्याने दिलेला इशारा तत्कालीन राजकीय नेतृत्वाला विचारात घ्यावसा वाटला नाही म्हणूनच 1962 ची नामुष्की ओढवली. 1948 मध्ये चीनला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1949 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापन झाले. स्थापना झाल्यापासून आपल्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यात तत्परता दाखवत 1951 पर्यन्त चीनने अक्साई चीनमध्ये आपल्या चौक्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ केली. भारतीय नेतृत्वाला मात्र त्याला महत्त्व द्यावेसे वाटले नाही. मॅकमोहन रेषा हीच आम्ही आमची सीमा मानतो आणि त्या सीमेवर आम्ही अन्य कुणालाही येऊ देणार नाही आशा वल्गना संसदेत करण्यापलीकडे त्यांनी काहीही पावले उचलली नाहीत. उलट चीनला यूनोमध्ये स्थान मिळावे म्हणून भारताने धडपड चालवली होती! 1954 मध्ये पंचशील करार झाला ज्याद्वारे भारताने तिबेटवरचा चीनचा अधिकार मान्य केला. यावेळी सादर झालेल्या नाकाशात मॅकमोहन रेषाच सीमा म्हणून दाखवली होती आणि चीनने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. ‘हिन्दी चिनी भाई भाई’ ही उत्तम धूळफेक ठरलेली सुप्रसिद्ध घोषणा याचवेळी दिली गेली. 1956 मध्ये नेहरूंनी चाऊ -एन -लाय ला, 1,20,000 चौ. कि. मी. चा भारतीय भूभाग चीनचा म्हणून दाखवला गेला असल्याचे लक्षात आणून दिले. त्यावर त्या नकाशातल्या चुका आहेत ,दुरुस्त केल्या जातील असे चीनकडून सांगितले गेले.
1959 मध्ये माओच्या चीनने तिबेटचा घास घेतला. तिथल्या कित्येक शांतिप्रिय आणि नि:शस्त्र बौद्ध लोकांना शस्त्राच्या बळावर आणि रक्तपाताच्या आधारावर नमवले. कित्येक तिबेटी आणि शेवटी खुद्द दलाई लामादेखील भारताच्या आश्रयाला आले. आणि त्यांना भारताने आश्रय दिला याचा चीनला राग आला. आणि भारत तिबेटमधील बंडाला पाठिंबा देते आहे असा आरोप करायला त्यांनी सुरुवात केली. 1961 मध्ये ले.जनरल कौल यांची नियुक्ती केल्यावर देखील लष्कराच्या प्रत्येक निर्णयावर नेहरूंचा प्रभाव होताच. याच सुमारास चिनी सैनिकांनी मॅकमोहन रेषेजवळ गस्त घालण्यास सुरुवात केली. आणि हळूहळू भारताच्या ताब्यातील भगत येण्यास देखील सुरुवात केली. नेहरू मात्र अजूनही ‘हिन्दी चिनी भाई भाई च्या स्वप्नातून बाहेर येत नव्हते. युद्धसज्जता आणि एकूणच सैन्याच्या उभारणीसाठी आवश्यक खर्चात वाढ करण्याची गरज त्यांना वाटत नव्हती. कारण मुळात चीन भारतावर हल्ला करणारच नाही अशी पूर्ण खात्री तत्कालीन सेनाप्रमुख आणि संरक्षणमंत्री बाळगून होते. अशी खात्री होण्यामागे त्यांचे असे काही निष्कर्ष आणि अभ्यास असेलही, पण तरीही सावधगिरी बाळगत युद्धसज्ज राहण्यात कोणतीच अडचण नव्हती.
1961 च्या मे मध्ये चिनी सैनिकांनी देहरा कंपास वर कब्जा केला आणि चिप चॅप नदीवर एक ठाणे उभे केले. चीनच्या या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘फॉरवर्ड पॉलिसी’ चा अवलंब केला, मात्र ही सगळ्यात मोठी घोडचूक ठरणार होती.
रझांगलाची लढाई
हे युद्ध भारताच्या दोन प्रमुख सीमाभागांमध्ये लढले गेले. काश्मीरमध्ये लडाखचा सीमावर्ती भाग आणि ईशान्येला, त्याकाळी नेफा(NEFA- North East Frontier Agency) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणाचल प्रदेशात. पैकी लडाखमध्ये रझांगला, चुशूल, मगर हिल, स्पंगूर गॅप, गुरूंग हिल या भागात तर नेफामध्ये कामांग फ्रंटिअर डिव्हिजन म्हणजेच तावांग, से ला, बोम्दि ला ई. ठिकाणी प्रमुख लढाया लढल्या गेल्या.
पूर्व लडाख म्हणजेच काश्मीर राज्याचा उत्तर-पूर्वेकडील पर्वतमय प्रदेश आहे. या भागात पाऊस किंवा बर्फ फारसे पडत नसले तरी थंडी मात्र बेसुमार पडते, तापमान अगदी उणे तीस अंशांपर्यंत देखील खाली जाते. निसर्गसौंदर्याने नटलेल्या काश्मीर खोऱ्याच्या अगदी विरूद्ध हा भाग आहे, उंचच उंच भव्य डोंगर रांगा असणाऱ्या य प्रदेशात फारशी हिरवळ बघायला मिळत नाही. त्यामुळे इथला निसर्ग एक वेगळंच आणि भव्य रांगडेपण लेऊन उभा आहे. लडाखची राजधानी असणारे लेह हे ठिकाण श्रीनगरपासून 216 मैलांवर असून त्याची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे 11000 फूट आहे. लेह मधून तिबेटमध्ये जाण्यासाठी सिंधू नदी मार्गे डेमचोककडून ल्हासाला तर दुसरा छान्गला खिंडीमधून तांगत्से- चुशूलमार्गे रुडोकला जातो. चुशूल हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 14300 फुट उंच असून भारत -तिबेट सीमेपासून ते फक्त पंधरा मैल दूर आहे. चुशूलची दरी चार मैल रुंद आणि 25 मैल लांब आहे. या दरीच्या दोन्ही बाजूंना सुमारे 19000 फुट ऊंची असणारे खडकाळ आणि भव्य पर्वत आहेत. एकूणच चुशूलचे भौगोलिक स्थान बऱ्यापैकी मोक्याचे आहे. त्याशिवाय त्याला लष्करी महत्त्व होते ते तिथल्या बारा महीने वापरता येणाऱ्या धावपट्टीमुळे! या धावपट्टीवर तिबेट घेतल्यापासूनच चीनचा डोळा होता. मात्र 1962 मध्ये चीन हल्ला करण्याची शक्यता निर्माण होईपर्यंत चुशूल भारत सरकारच्या खिजगणतीत देखील नव्हते. चीनच्या हल्ल्यानंतर सरकार जागे झाले आणि त्यांनी लेह-चुशूल रस्ता जरा बरा सुधारून घेतला. सप्टेंबर 1962 मध्ये 114 पायदळ(infantry) ब्रिगेडला लेहला हलवले गेले. चुशूलची धावपट्टी सुरक्षित ठेवण्याचे मुख्य काम या ब्रिगेडला दिले गेले होते. ब्रिगेडियर तपेश्वर रैना 114 ब्रिगेडचे कमांडर होते. त्यांनी 13 कुमाऊँ या पलटणीला लगेचच चुशूलकडे पाठवून दिले. या पलटणीने आपल्या विविध कंपन्या चुशूलच्या आजूबाजूच्या उंच पर्वतांवर मोर्चेबांधणीसाठी पाठवून दिल्या. त्यापैकी 'सी' कंपनी रझांगलावर मोर्चे बांधणार होती. या कंपनीचे कमांडर होते मेजर शैतानसिंग. रझांगला वर पोचल्यावर तिकडे लगेचच खंदक खोदण्याचे आणि अन्य व्यवस्था उभ्या करण्याचे काम सुरू झाले. ही कामे चालू असताना आजूबाजूला नजर ठेवण्यासाठी नायक हुकूमचंदच्या हाताखाली छोटी टोळी देऊन त्यांना टेहळणीसाठी पाठवले गेले होते. तिथल्या खडकाळ जमिनीत खंदक खोदताना कित्येक जवानांच्या हाताला फोड आले होते. वरून भुरुभुरु पडणाऱ्या बर्फापासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे गरम कपडे नव्हते, लढाईसाठी अत्यावश्यक सामान देखील गरजेहून कमीच होते. अपुऱ्या सामग्रीनिशी शत्रूला किती काळ थोपवून धरू शकू याची प्रत्येकालाच शंका होती, तरी हार मानून बसायला कोणी तयार नव्हते. इकडे हुकूमचंद आपल्या टोळीनिशी टेहळणी करत असताना आत्तापर्यंत तरी काही वावगे दृष्टीस पडले नव्हते..
18 नोव्हेंबर1962, रविवारची पहाट होती. चार वाजण्याचा सुमार असेल. अजूनही तसा अंधारच होता. रात्रभर थंडीत अवघड जागी पहारा देऊन जवानांचे अंग आंबून गेले होते. इतक्यातच खालून अस्पष्ट खूसफूस ऐकू आल्याचा भास हुकूमचंदाला झाला. लगेच त्याने सर्व जवानांना सावध केले आणि आता सावधपणे कानोसा घेऊ लागले. पुन्हा एक अस्पष्ट कुजबूज ऐकू आली. तशी लगेच हातातल्या मशीनगन्स 'कॉक' करून सगळे पवित्र्यात बसले. आता मात्र खालून कुणीतरी चढून येत असल्याची स्पष्ट चाहूल मिळाली आणि सगळेच पूर्ण सावध झाले. हुकूमचंदाने आपले 'व्हेरी लाइट पिस्तूल काढून त्यात लाल प्रकाश देणारे काडतूस भरले. धुक्यातून स्पष्ट होत जाणाऱ्या आकृत्या चिनी सैनिकांच्याच आहेत आशे खात्री झाल्यावर लगेच हुकूमचंदाने आपले पिस्तूल उडवून लाल प्रकाश देणारे काडतूस हवेत उडवले. काहे अंतरावर खंदक खोदणारे सी कंपनीचे जवान आणि शिवाय आजूबाजूच्या ठिकाणांवर मोर्चे लावून बसलेल्या सगळ्याच कंपन्या सावध झाल्या. हुकूमचंदाने काडतूस उडवताक्षणीच ठरलेल्या संकेताप्रमाणे हुकूमचंद आणि त्याच्या टोळीतील जवानांनी आपल्या लाइट मशीनगन्स मधून तुफान गोळीबार करायला सुरुवात केली. हे इतक्या झटकन घडले की काही समजायच्या आताच कित्येक चिनी सैनिक जागीच खाली कोसळले. चीनच्या पहिल्या तुकडीची वासलात लावून हुकूमचंद लगेच आपल्या टोळीला घेऊन मुख्य खंदकापाशी जाऊन सी कंपनीला मिळाला आणि पुढील हल्ल्याची वाट पाहू लागला. मात्र आता सैनिकांऐवजी चिनी तोफांचे गोळे येऊन पडू लागले. जसजसे उजाडू लागले तसतसा मारा अधिकच तीव्र होऊ लागला. सी कंपनी चुशूलमधील मुख्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतानाच टेलिफोनची वायर तुटली.(चिनी सैनिकांनी त्या मुद्दाम तुटाव्यात असाच मारा केल्याचे देखील म्हटले जाते. तसे असेल तर रणनीतीचा उत्तम नमुना मानता येईल.) आणि सी कंपनीचा मुख्यालयांशी संपर्क तुटला! रझांगलाबरोबरच चीनने मगर हिल, गुरूंग हिल, स्पंगूर गॅप आणि खुद्द चुशूलवर देखील मारा करायला सुरुवात केली होती. प्रत्येक ठिकाणाहून मुख्यालयाशी संपर्क होत होता. फक्त रझांगलाची बातमी कळत नव्हती. इकडे 18 तारखेपासून सुरू झालेला हल्ला 19 नोव्हेंबरला अधिक तीव्र झाल्यावर आखीर त्या सर्व ठिकाणांहून माघार घ्यावी लागली. मात्र ब्रिगे. रैना यांनी उरल्या सुरल्या सेनेसह पश्चिमेच्या दुसऱ्या पर्वतरांगेमध्ये संरक्षक फळी उभारली. आता भारतीय ठाणी अधिक उंचावर असल्यामुळे चुशूल घेण्यासाठी चिनी सैनिक खाली उतरेनात. त्याशिवाय पहिल्या धडकेतच एकूण तीन ठिकाणी माघार घेण्यापूर्वी भारतीय सेनेने त्यांची जबरदस्त हानी केली होती याचाही अंदाज ब्रिगे. रैनांना आला. हे सगळ होत असतानाही 13 कुमाऊँच्या सी तुकडीबद्दल काहीही संपर्क होत नव्हता. अखेर 19 च्या रात्री तेथील दोन जखमी जवान कसेबसे दुसऱ्या एका चौकीवर पोचले. त्यांच्याकडून कळलेला वृतान्त असा होता- हुकूमसिंग चीनच्या पहिल्या तुकडीवर हल्ला करून परत आल्यावर सी कंपनीच्या खंदकांवर तोफेचा भडीमार सुरू झाला. अतिप्रचंड मारा करूनही सी कंपनीचे अहिर जवान मागे हटत नाहीत म्हटल्यावर आता त्यांनी अधिक जास्त वजनाचे गोळे टाकायला सुरुवात केली. तिथल्या खडकाळ जमिनीवर ते गोळे फुटून तुकडे अधिक उंच आणि लांब उडत होतेच शिवात तेथील टणक जमिनीच्या देखील कपच्या उडून त्या जवानांच्या अवयवांत घुसत होत्या. तरीही तिथल्या प्रत्येक अहिर जवानांनी पराक्रमाची शर्थ करून चीनचा पहिला हल्ला परतवून लावला होता. एकट्या सी कंपनीने तोफा आग ओकत असताना, रणगाडाविरोधी रॉकेट्स, एअरबर्स्ट आजूबाजूला फुटत असताना देखील चीनच्या दोन तुकड्यांची पूर्ण वासलात लावली होती! त्या धुमश्चक्रीतही नर्सिंग असिस्टंट जीवाची बाजी लावून जखमी जवानांवर उपचार करत होता. पोटात दोन गोळ्या लागूनही मेजर शैतानसिंग आपली मशीनगन घेऊन लढत होते. अखेर चीनच्या तिसऱ्या तुकडीच्या हल्ल्यासमोर मात्र सी कंपनीचा निभाव लागला नाही आणि रझांगला पडले.
जानेवारी 1963 मध्ये चुशूल गावचा एक गुराखी सहज फिरत फिरत रझांगलावर गेला.. आणि..रझांगलाच्या लढाईचे नैसर्गिकरित्या पूर्ण गोठलेले युद्धचित्र तिथे पाहायला मिळाले.. एखादा सिनेमा मध्येच पॉज करून ठेवावा तसे..!
बातमी कळताच 114 ब्रिगेडचे ब्रिगे. रैना लगेचच फेब्रुवारी 1963 मध्ये तेथील जवानांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसचे काही अधिकारी, आणि प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोची काही माणसे रझांगलावर गेली. तेव्हा प्रत्येक मृतदेह होता त्याच स्थितीत गोठून गेला होता. प्रत्येकाच्या हातात त्याचे त्याचे शस्त्र शेवटपर्यंत तसेच धरलेले दिसत होते, अगदी नर्सिंग असिस्टंटच्या हातातली मॉर्फिन भरलेली इंजेक्शनची सीरिंज तीन महिन्यानंतरदेखील तशीच हातात धरलेली होती.अगदी मेजर शैतानसिंग यांचा मृतदेह देखील एका घळीत सापडला तेव्हा एक हात पूर्ण जायबंदी झाला होता तरी दुसऱ्या हातातली स्टेनगन सोडलेली नव्हती..!
चुशूलला गेलात तर तिथल्या हायग्राऊंडवर या जवानांचे स्मारक उभे आहे. 'गवताची एक काडी ही न उगवणारा- ओसाड प्रदेश' म्हणून आपल्याच देशातल्या नेत्यांकडून हिणवल्या गेलेल्या या लडाखची भूमी या आणि अशा कित्येक अनाम वीरांच्या रक्ताने भिजलेली आहे याचा विसर कसा पडू द्यायचा!!
अशाच वीरांच्या नेफातल्या बलिदानाची गाथा पुढल्या भागात!
जय हिंद!