सुभाष- एमिली...
सुभाष- एमिली...
(कणखर सुभाषचंद्रांचा मृदू कोपरा....)
आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि स्वतंत्र भारताचे पहिले अल्पकालीन राष्ट्रपती सुभाषचंद्र बोस जन्मदिन विशेष
प्रेमकथा म्हटली की त्यात एक राजकुमार आणि एक राजकुमारी असतेच. या ही प्रेमकथेत आहेत. त्यांचं एकमेकांवर जीवापाड- अगदी जीवापाड प्रेमही होतं. पण त्यांची प्रेमकथा गोड-गुलाबी कधीच नव्हती, त्या गुलाबी रंगात युद्धाचे आणि पारतंत्र्याचे लाल-काळे गडद रंग मिसळून गेले होते. तरीही अजिबात झाकोळून गेली नाही त्यांची प्रेमकहाणी, उलट त्या धामधुमीच्या पार्श्वभूमीवरही टवटवीत राहिली.
१९३४ सालची एक सकाळ होती. त्यासकाळी अचानकच एका कामासाठी एमिलीला निरोप आला. डॉ. माथुर यांच्याकडून. तुझ्याजोगतं एक काम आहे, दुपारी मुलाखतीसाठी ये’ त्याप्रमाणे एमिली दिलेल्या पत्त्यावर पोचली. इंग्रजी शॉर्टहॅँड टायपिंगचं काम होतं. कोणी एक प्रौढ तरुण पुस्तक लिहिणार होता त्यासाठी सेक्रेटरी आणि टायपिस्ट म्हणून तिची निवड झाली. महायुद्धाचे दिवस होते. तिच्या आजोबांचे पादत्राणांचे दुकान होते, मात्र मंदीच्या लाटेत ते सगळे बुडाले होते. तिचे वडील पशुवैद्य होते, मात्र तो ही व्यवसाय फारसा बरा चालत होता असे दिसत नव्हते. एकूणच घरी तशी गरिबी होती, त्यामुळे पैशाची आवश्यकता होतीच. हळूहळू एमिली या नोकरीत रमली. त्या तरुणाची- सुभाषची कहाणी ऐकून आणि त्याचं मोठेपण अनुभवून ती थक्क होत गेली. तिच्याही नकळत त्याच्या प्रेमात पडत गेली.
इकडे सुभाषची परिस्थितीही वेगळी नव्हती. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याची आस असणाऱ्या त्याच्या मनात वास्तविक अन्य कोणत्याही मृदू भावनेला थारा नव्हता. याधीही कित्येक मदनिकांची मागणी नम्रपणे नाकारून त्याने ब्रह्मचर्य पाळलं होतंच. तरीही आता आपल्या मनाचा असा गोंधळ का उडतोय हे त्याला समजत नव्हतं. हळूहळू आपण एमिलीची वाट पाहतोय, तिच्या येण्यासाठी आपण आतुर होत जातोय हे लक्षात आल्यावर त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यचा आटोकाट प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला. भारत स्वतंत्र व्हावा म्हणून हर तऱ्हेने प्रयत्नशील असणाऱ्या सुभाषने एमिलीला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. एमिली वस्तुस्थितीपासून कधीही अनभिज्ञ नव्हतीच. तिला उंच पर्वत खूप आवडत असत असं ती म्हणे. तिच्यासाठी सुभाषसुद्धा एखाद्या अभेद्य पर्वतासारखाच होता. अविचल निर्धार आणि आकाश व्यापणारी स्वप्ने पाहणारा पर्वत! आपण एका निखाऱ्याशी गाठ बांधतो आहोत याची पूर्ण कल्पना तिला होती. त्याच्या देशकार्यात कधीही अडथळा म्हणून येण्याची तिची इच्छा नव्हतीच. मात्र त्याच्यासह निखारा होऊन जळण्याचीच आस तिला होती. सुभाष तिच्या निर्धारापुढे नमला, आणि १९३७ साली ते दोघे गुप्तपणे विवाहबद्ध झाले. मुद्दामच ही गोष्ट उघड केली गेली नव्हती, कारण सुभाषचे इंग्लंडविरोधी धोरण भविष्यात एमिलीला त्रासदायक ठरू शकत होते. तिला आणि तिच्या अन्य कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकत होता. आधीच महायुद्धाच्या धामधुमीने जगणं अशक्य होत चाललं होतं. लग्नानंतर काही काळाने सुभाष पुन्हा आपल्या मायदेशी परतला आणि एमिली शकुन्तलेसारखी आपल्या दुष्यंताची वाट पाहण्यात दिवस कंठू लागली.
यानंतर थेट १९४१ साली सुभाष पुन्हा परतून आला. मात्र आता तो ओरलॅंडो मॅझ्युटा म्हणून निसटून, लपत छपत जर्मनीत आला होता. इंग्लंड विरोधात जर्मनीची लष्करी मदत मागण्यासाठी! जर्मनीशी हात मिळवून भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि तितकाच आत्मघातकी डाव मनात योजून सुभाष पुन्हा आला होता. यातला धोका उमजण्याइतकी एमिली हुशार होती. सुभाषच्या या नव्या योजनेमुळे तिच्या मनात होणाऱ्या उलथापालथींची कल्पना करवत नाही. तरीही ती निर्धाराने उभी होती, सुभाषची ताकद होऊन! याच सुमारास तिला त्यांच्या बाळाची चाहूल लागली होती! ज्याच्या सहवासाची अधिकधिक ओढ या दिवसांत असायची तोच असा आपलं आयुष्य जळत्या आगीत फेकायला निघालेला होता. त्याचा पाय आपल्या आणि बाळाच्या ओढीने मागे फिरणार नाही याची काळजी तिने सदैव घेतली. १९४२ मध्ये त्यांची मुलगी, अनिता जन्माला आली. अनिता अवघी दोन महिन्यांची असतानाच तिचा पिता तिथून निघाला आणि.. परतून आलाच नाही! १९४५ साली थेट सुभाषच्या अपघाती मृत्यूची बातमी कळली आणि एमिली शेंकेल-बोसचा उंच पर्वतकडा.. कायमचा कोसळला!
यानंतर एमिलीने पुन्हा लग्न केले नाही. अनिताला, सुभाषच्या छोट्या परीला मोठं करण्यात तिने आयुष्य वेचलं. भविष्यातल्या कित्येक घडामोडींमुळे आपल्या मुलीला अनिताला ती आपल्या पित्याचं नाव देऊ शकली नाही. पण त्यांचा वारसा मात्र निश्चित देत राहिली. कोण कुठला एक अपरिचित तरुण, ना आपल्या देशाचा न धर्माचा.. त्याच्यावर जीव लावून एमिलीने त्याची संस्कृती, त्याचा देश आपला मानला. कधी न पाहिलेल्या भारताच्या स्वातंत्र्याची इच्छा तिनेही मनोमन धरली, आणि त्यासाठी तिच्या सर्वस्वाला जाऊ दिलं.
आज तिच्या सुभाषचा जन्मदिवस! २३ जानेवारी! सुभाषचंद्रांचं स्मरण करताना त्यांच्यासाठी विरह सोसणाऱ्या त्यांच्या पत्नीचं स्मरण करणं अनुचित ठरू नये!
--- मैत्रेयी गणपुले