Date: 14-Aug-2020 |
भारताला सक्षम करण्यासाठी ग्रेट निकोबार बेटावर उभारणार ट्रान्सशिपमेंट बंदर- पीएम मोदी
बंगालच्या उपसागरात निकोबार बेटांवर पर्यायी पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी एक ट्रान्सशिपमेंट बंदर उभारण्यासाठी भारत १०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा विचार करीत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. अंदमान निकोबार बेटांना जलद गती इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी समुद्राखालील ऑप्टिकल फायबर प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी ही माहिती दिली.
१,२२४ कोटी खर्च करून चेन्नई ते अंदमान-निकोबार अशी २,३१२ किलोमीटर लांबीची सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आली आहे. या केबलमुळे ही दोन्ही बेटे जगाच्या संपर्कात अधिक सक्षमपणे जोडली जातील. या केबलमुळे स्वस्त आणि चांगली इंटरनेट सेवा मिळणार आहे.
"ग्रेट निकोबार येथे अंदाजे १०,००० कोटी रुपये खर्च करून ट्रान्सशीपमेंट बंदर बांधण्याचा प्रस्ताव आहे. हे बंदर तयार झाल्यावर मोठी जहाजे येथे उभी राहू शकतात," असे व्हिडिओ लिंकद्वारे आयोजित उद्घाटन समारंभात ते म्हणाले.
अंदमान निकोबार ही सामरिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची बंदरे आहेत. या बंदरावरील कंटेनर ट्रान्सशीपमेंट टर्मिनलचे दोन भौगोलिक फायदे आहेत. पूर्व-पश्चिम आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गाच्या जवळ असल्याने मालाची ने-आण करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदाही होईल. निसर्गतः पाण्याची खोली अधिक असल्याने नवीन घडणीची मोठी मोठी जहाजे सुद्धा येथे आरामात उभी राहू शकतात.
ट्रान्सशीपमेंट बंदरात मोठ्या जहाजांनी नांगर टाकल्याने भारताचा समुद्री व्यापार वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील असे पंतप्रधानांनी सांगितले.
जागतिक स्तरावर भारताला महत्त्वाचा सहभाग नोंदवायचा असेल तर जलमार्ग आणि बंदरांचे जाळे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. पायाभूत सुविधांच्या विकासामधील कायदेशीर आणि इतर अडचणी वेळोवेळी आणि सातत्याने दूर केल्या जात आहेत. पश्चिम किनारपट्टीवर ग्रीनफील्ड बंदरे तयार करण्यासाठी आणि पूर्वेकडील अंतर्गत भागात खोलवर बंदरे तयार करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी पूर्ण झाल्या असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
मासेमारी, मत्स्यपालन, माशांची शेती, aquaculture यासारख्या निळ्या अर्थव्यवस्थेमुळे अंदमान आणि निकोबारच्या विकासाला गती मिळेल. तसेच या बेटांवर अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. समुद्राखालील केबलमुळे पर्यटनाला चालना मिळेल.
चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते लिटल अंदमान आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्विप या सेवा अंदमान निकोबारच्या मोठ्या भागात १० ऑगस्ट पासून सुरू झाल्या आहेत. या केबलमुळे ४ जी मोबाईल सेवा, टेली- एज्युकेशन, टेलिहेल्थ, ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस यासारख्या डिजिटल सेवांना चालना मिळेल.
अधिकृत आकडेवारीनुसार, पोर्ट ब्लेअरवर प्रति सेकंद 400 गीगाबाईट (जीबी) ची गती प्रदान केली जाईल आणि इतर बेटांवर ती प्रति सेकंद 200 जीबी असेल. समुद्राखालून केबल टाकण्याचे काम बीएसएनएलने २४ महिन्यांपेक्षा कमी वेळेत म्हणजेच विक्रमी कालावधीत पार पाडले. अतिशय कठीण काळ चालू असतानाही वेळेपूर्वी काम पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी बीएसएनएलचे कौतुक केले.
मोबाईल व इंटरनेट कनेक्टिव्हिटी व्यतिरिक्त जमीन, हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणची या बेटाची जोडणी जोमाने सुरु आहे. उत्तर आणि मध्य अंदमानला जोडण्यासाठी दोन मोठ्या पुलांचे काम हाती घेण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
पोर्ट ब्लेअर विमानतळाची क्षमता वाढवून ती १२०० प्रवाशांपर्यंत करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा बांधून पूर्ण झाल्या की समुद्री विमान सेवा सुरु होईल. बेटांमधील जलसंपर्क सुधारण्यासाठी कोची शिपयार्ड येथे तयार केलेली चार जहाजे लवकरच दिली जातील.
भारताला जर आर्थिक महासत्ता बनायचे असेल तर त्याला आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. जलमार्ग, हवाईमार्ग आणि महामार्ग यांचे जाळे मजबूत असेल तर भारत जगातील स्पर्धेत पुढे जाऊ शकतो असे आपल्या भाषणाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
अनुवाद - प्राची चितळे जोशी.
( ICRR Media Monitoring Desk )
Source : youtube, google, news18, news18india, indiatoday, economictimes
Transshipment Port at Great Nicobar Island
Photo Courtesy- Google