Date: 01-Jun-2020 |
लडाखमध्ये तणावाची परिस्थिती.
भारत आणि चीन यांच्या लडाख जवळील सीमेवरील सैनिकांच्या तैनातीबद्दल भारत सरकार मौन बाळगून आहे. सरकारचे मौन अनेक अफवांना जन्म देतंय. या सगळ्या अफवा आणि सरकारकडून अधिकृत बातमी नसल्यामुळे लडाखमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. एका रात्रीत अचानक सैनिकांची संख्या वाढली असल्याने सगळीकडे अजूनच दहशत निर्माण झालीय असे श्लोक गावातील नगरसेवक नामग्याल याकझी यांनी सांगितले.
" चिनी जिथे घुसले आहेत त्या गलवान नाल्यापासून माझे गाव १२० किमी वर आहे. सैन्य, दारूगोळ्याच्या टाक्या आणि तोफा असलेली वाहने रात्री आमच्या गावातून फिरतात. नक्की काय चालले आहे ते कुणालाच ठाऊक नसल्याने सगळे भीतीच्या छायेत वावरत आहेत. तीन दिवसापासून आमची मोबाईल कनेक्टिव्हिटी तोडून टाकण्यात आलेली आहे. लष्करासाठी ओझे वाहक (हमाल) म्हणून काम करणाऱ्या गावकऱ्यांना ५ मे रोजी परत पाठवून देण्यात आले आहे. " असे याकझी यांनी सांगितले.
पाच मे रोजी खरा त्रास सुरु झाला. चिनी सैन्य दौलत बेग ओल्डी भागात घुसले आणि ते तिथे चार दिवस होते. चार दिवसानंतर ते परत निघून गेले. त्यानंतर पाच दिवसांनी चिनी सैनिक एकाचवेळी फोर फिंगर्स, हॉट स्प्रिंग आणि गॅलवान नदी या तीन ठिकाणाहून भारताच्या हद्दीतील पॅंगॉन्ग लेक मध्ये घुसले.
" चिनी सैन्य किती च्या संख्येने दाखल झाले हे सांगणे कठिण आहे. पण पॅंगॉन्ग लेकच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनी सांगितले की चिन्यांनी त्या भागात आपले तंबू ठोकले आहेत आणि भारताच्या हंगामी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. या पूर्वीच्या घुसखोरीपेक्षा यावेळची परिस्थिती वेगळी आहे. यावेळची चिनी सैन्याची संख्या खूप मोठी आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे."
या महामारीच्या दिवसात युद्धजन्य परिस्थिती ही चिंतेची बाब आहे. येथील लोकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी सरकारने जबाबदार व्यक्तीला पाठवून या लोकांना शांत केले पाहिजे. ते खूप घाबरलेले आहेत.
चिनी लोक डेमचोकच्या कुरणात आधी भटक्या लोकांना पाठवतात. इथल्या हालचालींचा अंदाज घेतात आणि मग त्याच्या मागून पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चे सैनिक पाठवतात. अनेक वर्षांपासून चिनी भटके आमच्या जमिनी, आमची कुरणे खाऊन टाकत आहेत. आमचे सैन्य आम्हाला या भागात फिरकू देत नाहीत म्हणूनच या भटक्यांचं फावतं. असे नामग्याल म्हणाले.
" अत्ताचा स्टॅंडऑफ, ही घुसखोरी देशासाठी खूप मोठा धोका आहे. आपण काय करू शकतो? आपली जमीन आपण याना देऊन टाकायची का? भारतीय सैन्य चिन्यांना भारी पडेल यात शंकाच नाही. तरी सुद्धा आम्हाला भीती वाटते. सरकार काहीच सांगत नाही. सोशल मीडियावरून उडत आलेल्या बातम्यांवरून आम्ही फक्त अंदाज बांधतोय. सॅटेलाईटने घेतलेली छायाचित्रे पाहून आम्हाला येथील हालचाल कळतेय. " नामग्याल यांनी सांगितले.
लडाखमध्ये चिन्यांची घुसखोरी अनेक वर्ष चालूच आहे. पण मोदी सरकार यावेळच्या त्यांच्या घुसखोरीला नक्कीच चांगले प्रत्युत्तर देईल असे भाजपचे लडाखचे माजी अध्यक्ष शेरिंग दोर्जय म्हणाले.
गेल्या २०-३० वर्षात आम्ही डीबीओ सेक्टरमधील बराचसा भाग गमावला आहे. एलएसीवरील आमच्या पायाभूत सुविधा अतिशय खराब आहेत. आयटीबीपी आणि लष्कराला पाहिजे तितकी गस्त घालता येत नाही. कमांडर्सना त्यांची आज्ञा कुठल्याही वादविवादाशिवाय किंवा चर्चेशिवाय अमलात आणली जायला हवी आहे. आणि या भांडणात आम्ही आमची जमीन गमावत आहोत असे दोर्जय म्हणाले.
दोर्जय लेहचे रहिवासी आहेत. त्यांना इथल्या हवामानाचा अंदाज आणि सवय आहे. अत्ता लेह विमानतळावर बरेचसे सैनिक उतरले आहेत. पण त्यांना लडाखमध्ये तैनात करण्याआधी इथल्या हवामानाशी जुळवून घेण्याकरिता थोडा काळ जाऊ द्यावा लागेल असे त्यांचे म्हणणे आहे.
रिग्झिन स्पलबार हे लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिलचे माजी अध्यक्ष आणि कॉंग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते म्हणतात की सरकारकडून कोणतीही अधिकृत माहित मिळत नसल्याने लेह मधील लोक घाबरले आहेत. त्यांना खूप असुरक्षित वाटत आहे.
आमच्या कुरणांवर अतिक्रमण करणे ही चीनसाठी नेहमीची गोष्ट झाली आहे. पण या कुरणांवर गुजराण करणाऱ्या आपल्या देशातल्या लोकांचं काय? आमची चांगली कुरणे चीनने घेतली आहेत. एका रात्रीत ते गलवान नाला आणि पॅंगॉन्ग लेक मध्ये घुसले आहेत. आमच्या खेड्यातून आम्हाला त्यांनी ठोकलेल्या तंबूतील लाईट स्पष्टपणे दिसतो. सरकारने नक्की काय चालेल आहे त्याची अधिकृत घोषणा करावी. जेणेकरून आम्ही निर्भयपणे आलेल्या परिस्थितीला तोंड देऊ. खंबीरपणे आमच्या प्रदेशाला साथ देऊ आणि आपला प्रदेश चिन्यांच्या घशात जाण्यापासून रोखण्यास मदत करू.असे तेथील प्रत्येक नागरिकाचे म्हणणे आहे.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk )
Source: wikipedia, youtube, google search, news18
Ladakh tense about future.