Date: 02-May-2020 |
कोरोनाव्हायरसची महामारी पसरण्यासाठी चीनने वेळीच सावधगिरी बाळगली नसल्याचा जेव्हा जेव्हा चीनवर आरोप केला जातो तेव्हा तेव्हा आशिया ते आफ्रिका, लंडन ते बर्लिन सगळीकडील चिनी राजदूत अतिशय आक्रमकपणे राजनैतिक धोरणात्मक पद्धतीने याचा विरोध करतात.
ते "वुल्फ वॉरियर' या प्रकारात मोडतात. म्हणजे ते कोल्ह्यासारखे धूर्त खेळी खेळणारे आहेत. देशभक्त आहेत. धडाडीचे आणि कर्तृत्ववान आहेत. जणू काही ते ब्लॉकबस्टर चित्रपटातील हिरो सारखे अमेरिकेतील, आफ्रिकेतील आणि साऊथईस्ट रशियातील वाईट लोकांना आपल्या चातुर्याने मारूनच टाकतील.
ते उलट्या काळजाचे आहेत. त्यांचा अशाप्रकारचा कठोर दृष्टिकोन अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कठोर शिस्तीखाली तयार झाला आहे. शी जिनपिंग माजी अध्यक्ष डेंग झिओपिंग यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले आहेत. चिनी महत्त्वाकांक्षा काय आहे हे आधीपासून उघड न करता आधी मुत्सद्देगिरी बाळगून आपल्याला हवी तशी परिस्थिती निर्माण करून मगच योग्य ठिकाणी घाव घालण्याची शी ची पद्धत आहे. पुन्हा एकदा चीन जागतिक शक्ती म्हणून अव्वल स्थानी असल्याचे सर्वानी मानावे यासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्याचे आदेश चिनी राजदूतांना देण्यात आले आहेत.
चिनी राजदूत गुई कॉंग्यु यांनी ' शक्तिशाली अश्या चीनला टक्कर देऊ पाहणारा कुडमुड्या देश ' अश्या शब्दात स्वीडनची निर्भत्सना केली. व्हायरसच्या संबंधी एकाच पार्टीची कशी हुकूमशाही चालते यासंबंधी एक लेख लिहिणाऱ्या स्वीडिश पत्रकाराची दूतावासाच्या संकेतस्थळावर अवहेलना केली गेली.
तज्ञांचे म्हणणे आहे की बीजिंग आपल्यावर हल्ला करणाऱ्याला कधीही मोकळे सोडत नाही. सर्वतोपरी ते त्याच्यावर सूड उगवते. व्हायरसविषयी जर कोणी चीनवर हल्ला चढवला तर चीन गप्प बसणार नाही. ते प्रतिहल्ला करेल. चीनने जर प्रतिहल्ला केला नाही तर चीनसाठी ते जास्त त्रासदायक असेल असे रेन्मीन विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास विभागाचे प्राध्यापक शी यिनहॉंग म्हणाले.
चिनी राजदूत मोठ्या प्रमाणात फेसबुक आणि ट्विटर यांचा यासाठी वापर करून घेत आहेत. गम्मत अशी आहे की या प्लॅटफॉर्म्सना चीनमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. चिनी राजदूत झाओ लिजियान यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. ज्यांचे ट्विट पाकिस्तानमधून केले जाते. त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये अमेरिकेचे माजी यू.एन. राजदूत सुसन राईस यांना " जातीयवादी " असे संबोधले आहे.
हे नवीन शैलीतील मुत्सद्दी राजदूत अतिशय कडक भाषा वापरून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आणि याद्वारे आपल्या देशातील लोकांमध्ये चीनविषयी राष्ट्रप्रेम जागृत होण्यास मदत होत आहे. चीनची प्रतिमा इतर देशांपुढे कशी आहे याचा विचार न करता ते अशी भाषा वापरून चीनची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांची ही भाषा परदेशात स्वागतार्ह नाही. चिनी दूतावासाने ' फ्रेंचांनी आपल्या नर्सिंग होम कामगारांना आणि त्यांच्या रहिवाश्याना उपासमारीने आणि आजाराने मरण्यास सोडून दिले ' असे असे निवेदन दिले. यावरून चिनी राजदूताला खडसावण्यासाठी दूतावासात बोलावण्यात आले.
चीनच्या नायजेरिया, घाना आणि युगांडा येथील राजदूतांनाही त्यांनी आफ्रिकन व्हायरसवरून केलेल्या हेटाळणीबद्दल आफ्रिकन देशांकडून जाहीर बोलणी खावी लागली. यासंबंधी झिम्बाब्वेमधील चिनी दूतावासाने एका ट्विट द्वारे "तथाकथित वांशिक भेदभाव" असे शब्द वापरून आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली.
चिनी अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की पाश्चात्य लोक ढोंगी आहेत. जेव्हा ते ह्या रोगाला थोपवू शकले नाहीत तेव्हा त्यांनी चीनच्या नावाने खडे फोडायला सुरुवात केली. चीनला दोष देणारा लेख छापल्याबद्दल बर्लिनमधील चीनच्या दूतावासाने बिल्डला एक ओपन लेटर पाठवले ज्यात त्यांनी वृत्तपत्राचा "बॅड टेस्ट" म्हणून उपहास केला.
थायलंड मध्ये दूतावासाच्या फेसबुक अकाउंटवर टीकाकारांना " अनादर करणारे" म्हटले आहे. तसेच व्हायरसच्या व्युत्पत्तीविषयी भाष्य करणाऱ्यांना " इतिहासाचा विश्वासघात " म्हणून संबोधले आहे. हॉंगकॉंग आणि तैवानच्या स्थितीविषयी आवाज उठवणाऱ्याना इतिहासाची तोडफोड करणारे म्हटले आहे.
या विषाणूकडे बीजिंग पाश्च्यात्य देशात नेतृत्व निश्चित करण्याची संधी म्हणून पाहत आहेत. अनेक नेत्यांनी वैद्यकीय उपकरणे व पथके पाठविल्याबद्दल चीनचे कौतुक केले असून सर्बियाच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनच्या ध्वजाचे चुंबन घेऊन आपली चीनविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
चीनची प्रतिमा उंचावण्यासाठी चीनने अनेक डमी लोक चीनच्या बाजूने ट्विट करण्यासाठी तयार केले आहेत. अनेक डमी आणि फेक अकाउंट्स काढून चीन जगासमोर ट्विट द्वारे आपली प्रतिमा चांगली करू इच्छित आहे. कम्युनिस्ट पार्टीविषयी चांगले चांगले ट्विट्स हे डमी करतात. चीनने स्वाहिली, अरबी, स्पॅनिश आणि डझनभर अन्य भाषांमध्ये प्रसारित होणाऱ्या मीडियाला निधी पुरवायला सुरुवात केली आहे.
चीन पुन्हा शक्ती आणि युक्ती वापरून आपले स्थान बळकट करण्याच्या मागे आहे. त्याचे सर्व अधिकारी शी जीनपिंगच्या हाताखाली तयार झालेले आहेत. सर्वांना राष्ट्रप्रेम आणि कम्युनिस्ट पार्टी या दोनच गोष्टी माहित आहेत.
- प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source : indiatoday
China's diplomats show teeth in defending virus response