Date: 30-Mar-2020 |
अफगाणिस्तानातील गुरुद्वारावर प्राणघातक हल्ला करणारा मुहसीन केरळ मधील पीएफआयचा सदस्य.
काबूल मधील शिखांच्या धर्मस्थळावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन हल्लेखोरांमध्ये एक केरळचा. इस्लामिक स्टेट ने शुक्रवारी या हल्लेखोरांचा एक व्हिडीओ आणि काही फोटोग्राफ प्रसिद्ध केले. त्यांनी अबू खालिद अल -हिंदी अशी ज्याची ओळख करून दिली तो केरळ मधल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टरपंथी इस्लामिक संस्थेचा कार्यकर्ता असल्याची माहिती केरळ पोलिसांनी दिली. त्याचे खरे नाव मोहम्मद मुहसीन असे आहे. केरळ मधील एका मंदिरावर दगडफेक करणाऱ्या लोकांत तो होता. त्याच्यावर आरोप ठेवल्यानंतर तो दुबईला गेला असे इंडिया टुडेला पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
दुबईमध्ये तो शाजीर मंगलासेरी याच्यासोबत काम करत होता. दुबईमधून तो आयएसच्या कॅम्पमध्ये पुढील ट्रेनींगसाठी अफगाणिस्तानला गेला. मुहसीन याची फॅमिली केरळ मधील कन्नूर जिल्ह्यातल्या पय्यन्नूर येथे राहते. त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तो दोन वर्षांपासून गायब असल्याचे सांगितले. तो इसिस मध्ये गेल्याचे आम्हाला पोलिसांकडूनच कळले असे त्याच्या भावाने सांगितले. मुहसीन इंजिनिअर असल्याची माहिती सर्व प्रसार माध्यमांनी दिली असली तरी तो केवळ नववी नापास असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तो पहिल्यापासूनच कट्टरपंथी होता. शाळा सोडल्यानंतर तो इस्लामिक कट्टरपंथीयांच्या गटात सामील झाला. त्याच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचे अनेक गुन्हे आहेत.
भारतातून मे २०१६ मध्ये इसिस मध्ये भरती होण्यासाठी खोरासान प्रांतात आतापर्यंत शंभरच्या वर लोक गेल्याची नोंद आहे. यातील ३० व्यक्ती या केरळमधून थेट अफगाणिस्तानच्या खोरासान प्रांतात गेल्या तर जवळपास ७० व्यक्तींनी आधी आखाती देशात जाऊन मग तिथून अफगाणिस्थानात आपल्या कुटुंबासह प्रयाण केले. या लोकांपैकी ७ लोक अमेरिकेच्या एअर स्ट्राईक मध्ये मारले गेले. इसिसने भारतात मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले आहेत. नांगरहार आणि कुनार प्रांतात २०१४ पासून इसिस कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांचे २५० अधिकृत सभासद आहेत.
इस्लामिक स्टेटचा भारतातील आणि भारताबाहेरील अनेक देशातील लोकांवर प्रभाव आहे. अनेक लोक आपला स्वतःचा देश सोडून इसिसमध्ये भरती होत असल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडतच असतात. इसिसच्या क्रूरतेला तर सीमाच नाही. एकदा इसिस मध्ये भरती झाली की मृत्यूशिवाय त्यातून सुटका नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके लोक इसिसच्या विळख्यातून सुटून आले आहेत. भारतातही इसिसने आपले जाळे विणले आहे. लहान आणि तरुण मुलांना धर्माच्या नावाखाली दहशतवादी कृत्ये करायला प्रवृत्त करणे आणि त्यांना इसिसमध्ये सामील करून घेऊन दहशतवादाचे ट्रेनिंग देणे हे वर्षानुवर्षे चालूच आहे.
भारतातून इसिसमध्ये दाखल होणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) वर अनेक दहशतवादी गटांना मदत केल्याचा आरोप आहे. खून, अपहरण, धार्मिक तेढ माजविणे यासारख्या देशास आणि समाजास हानिकारक असणाऱ्या गोष्टी करण्यात ती आघाडीवर आहे. पीएफआय केवळ मुस्लिम समाजासाठी काम करते. मुस्लिम लोकांना न्याय मिळावा, समान हक्क , सुरक्षा आणि स्वातंत्र्य मिळावे यासाठी ती काम करते. या संघटनेचे पाच लाखाहून जास्त सभासद आहेत. आणि ते सगळे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, मणिपूर, गोवा आणि राजस्थान येथे कार्यरत आहेत. बंदी आणलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेशी तिचे संबंध आहेत. शरियत कायद्यानुसार सगळ्यांनी वागावे असा त्यांचा हट्ट आहे. यांच्या अनेक पोटशाखा आहेत ज्या एनजीओ चालवतात. दलित ऑर्गनायझेशन आणि नक्षलवाद्यांशी सुद्धा यांचे चांगले संबंध आहेत. समाजसेवा आणि मानवाधिकार यांच्या बुरख्याआड त्यांची दहशतवादी कृत्ये चालूच असतात. दहशतवादी कृत्यांना लागणार पैसा या संघटनेला आखातातून पुरविला जातो. अनेक मुस्लिम उद्योजक याना पैसा पुरवितात. अलीकडेच सीएए च्या विरोधात त्यांनी छुपी मदत केली असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या संघटनेचा मोहम्मद मुहसीन कार्यकर्ता होता हे लक्षात घ्यायला हवे.
- प्राची चितळे जोशी.
(ICRR Content Generation)
Kabul gurdwara attacker was active member of PFI: Kerala police