Date: 17-Feb-2020 |
ऋषी सोनूक- इंग्लंडच्या अर्थाला अर्थ देणारा भारतीय.
- सारंग लेले, आगाशी.
आजपासून साधारण तीन आठवड्यांनी म्हणजे ११ मार्चला ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ब्रिटिश सरकारचा अर्थसंकल्प मांडला जाईल. युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय ब्रिटनच्या जनतेने घेतल्यानंतर म्हणजे 'ब्रेगझिट'नंतरचा हा महत्वाचा अर्थसंकल्प आहे.
काळाचं चक्र हे अनाकलनीय असतं. ते कधी कोणत्या दिशेने फिरेल हे सांगता येत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातला पैसा लुटून आपली तिजोरी भरणाऱ्या ब्रिटिशांच्या तिजोरीच्या चाव्या ह्यावर्षी एका भारतीय वंशजाच्या हाती आल्या आहेत. ऋषी सोनुक नावाचा ३९ वर्षाचा तरुण इंग्लंडचा अर्थमंत्री आणि ब्रिटिश अर्थखात्याचा प्रमुख ह्या भूमिकेत येत्या ११ मार्चला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये त्यांचा अर्थसंकल्प सादर करेल. २.८३ ट्रीलियन डॉलर्स इतका जीडीपी (आणि ४२,५०० डॉलर्स हे दरडोई उत्पन्न) असलेला अर्थसंकल्प सादर करणारे ऋषी हे भारतीय वंशाचे पहिले अर्थमंत्री असतील.
२०१५ आणि २०१९ ह्या दोन्ही वेळेला ऋषी यॉर्कशायर परगण्यातून हुजूर पक्षातर्फे निवडणूक लढवत ब्रिटिश संसदेत निवडून आले. (यॉर्कशायर हा आपल्यासाठी परिचयाचा शब्द आहे कारण सचिन तेंडुलकरने इथूनच आपल्या काउंटी क्रिकेटची सुरवात केली होती.)
गेल्या तीनचार वर्षातला त्यांचा राजकीय प्रवास फार वेगवान ठरला आहे. २०१७- १८ अशी दोन वर्षं व्यापार खात्याचे स्वीय सचिव म्हणून काम केल्यावर जून २०१८ मध्ये ऋषींना राज्यमंत्रीपद (कनिष्ठ मंत्रीपद) मिळालं.
ह्यानंतर दिडच वर्षात अर्थमंत्री साजिद जावेद ह्यांनी राजीनामा दिल्यावर ऋषी सुनाक ह्यांची नियुक्ती अर्थमंत्री ह्या पदावर करण्यात आलीय. बोरिस जॉन्सन ह्यांनी नवीन अर्थ सल्लागार मंडळाची स्थापना केलीय. आणि त्याची जवाबदारीदेखील सुनाक ह्यांच्याकडे असेल.
केवळ ३९ वर्षाचे असलेल्या ऋषी सुनाक ह्यांचा जन्म साऊथहॅम्पटनचा. हॅम्पशायर परगण्यातला. त्यांचे आजीआजोबा मूळचे पंजाबचे. त्यांनी भारतातून पूर्व आफ्रिकेत आणि नंतर तिथून इंग्लंडमध्ये स्थलांतर केलं. आई उषा ह्या फार्मासिस्ट तर वडील यशवीर हे डॉक्टर. शाळेत अत्यंत हुशार असलेल्या ऋषीनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र ह्यात शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी पुढे अमेरिकेच्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधून एमबीए केलंय. अमेरिकेच्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 'फुलब्राईट' नावाची शिष्यवृत्ती मानाची समजली जाते. नोबेल आणि पुलितझर पुरस्काराचे अनेक मानकरी आपल्या कॉलेजच्या आयुष्यात ह्या शिष्यवृत्तीचे विजेते होते. सोनुक हेही ह्या शिष्यवृत्तीचे मानकरी आहेत.
इन्फोसिसच्या नारायण मूर्तींची कन्या अक्षता ही ऋषी ह्यांची पत्नी आहे. ११ डाऊनिंग स्ट्रीट ह्या आपल्या नवीन निवासस्थानी ऋषी हे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन ह्यांचे शेजारी असतील.
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये मध्यवर्ती निवडणुका झाल्या आणि बोरिस जॉन्सन ह्यांच्या हुजूर पक्षाला ६५० पैकी ३६४ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. इंग्लंडच्या सामान्य जनतेचा कल स्पष्ट करणारी ही निवडणुक 'ब्रेग्झिट' ह्या एका मोठ्या मुद्द्याभोवती फिरत होती. युरोपियन महासंघात न राहण्याचा निर्धार ब्रिटिश जनतेने ह्या निवडणुकांमध्ये दाखवून दिला आणि बोरिस जॉन्सनना मोठ्या फरकाने निवडून दिलं. ह्यापूर्वी काँझर्व्हेटिव्ह पक्षाला इतकं स्पष्ट बहुमत १९८७ साली मार्गारेट थॅचर ह्यांच्या नेतृत्वाखाली मिळालं होतं. त्यामुळे बोरिस जॉन्सन ह्यांचा हा विजय ऐतिहासिक म्हणायला हवा. ऋषी ह्यांच्यासोबत भारतीय वंशाच्या अनेकांनी बोरिस जॉन्सनना सुरवातीपासून ब्रेग्झिटकरिता पाठिंबा दिला होता. आता ह्या विजयानंतर सोनुक ह्यांच्या खांद्यावरची जवाबदारी फार मोठी आहे.
ब्रिटनच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात निर्मितीक्षेत्राचा वाटा मोठा आहे आणि ब्रेग्झिटचा दुष्परिणाम ह्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. देशात येणारी गुंतवणूक आटत चाललीय. तज्ज्ञांच्या अंदाजे १७० बिलियन डॉलर्स इतका प्रभाव ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर पडू शकेल. शिवाय करप्रणालीची नवीन रचना सामान्यांना अपेक्षित आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात अर्थव्यवस्था सांभाळायचं काम सोनुक ह्यांच्याकडे असणारे.
बोरिस जॉन्सन ह्यांच्या सरकारमध्ये ह्यावेळी ऋषी सुनाक ह्यांच्या व्यतिरिक्त प्रीती पटेल (गृह), अलोक शर्मा (व्यापार आणि उद्योग), सुएला ब्रेवरमन (ऍटर्नि जनरल) हे तिघे भारतीय वंशाचेदेखीक जवाबदारीची धुरा सांभाळताहेत.
ह्या सर्वांच्या निष्ठा इंग्लंडच्या प्रति दृढ असणे, ह्यात गैर काहीही नाही. मात्र त्यांची नियुक्ती हा एक काव्यगत न्याय आहे हे निश्चितच.
- सारंग लेले, आगाशी.
(ICRR Content Generation)
काळाच्या चक्राचा दुसरा फेराही इंग्लंडच्या बाबतीत आता चालू झाला आहे. ग्रेट ब्रिटनच्या भूमीचे इंग्लंड, स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्श हे चार प्रामुख्याने भाग होतात. स्कॉटलंड ह्या प्रदेशाला स्वायत्तता असली तरी स्कॉटिश लोकं स्वतः ला ब्रिटिश समजत नाहीत. २०१४ साली स्कॉटलंडला इंग्लंडपासून वेगळं करण्याच्या मागणीमुळे तिथे बहुमत घेण्यात आलं होतं. त्यावेळी स्कॉटिश लोकांनी इंग्लंडसोबत राहण्याचा निर्णय दिला होता. मात्र २०१९ डिसेंबर निवडणुकांमध्ये स्कॉटिश नॅशनल पार्टीला ५४ पैकी ४९ जागा मिळाल्या आहेत. स्कॉटलंडला युरोपियन महासंघात राहण्याचा अधिकार आहे आणि ब्रेग्झिटचा निर्णय त्यांना लागू होत नाही, असं स्कॉटिश नॅशनल पार्टीचं म्हणणं आहे. एका मोठ्या विषयावर इतकी मतभिन्नता स्कॉटलंड-इंग्लंड वादासंदर्भात फार महत्वाची आहे.
ह्या मतभिन्नतेची वाटचाल स्कॉटिश लोकांना इंग्लंडपासून फारकत घेण्याची संधी देण्याकडे होऊ शकते. भविष्यात इंग्लंडच्या फाळणीची बीजांना ह्यामुळे खतपाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.