३७० नंतर युद्धासाठी पाकिस्तानी जनतेचा सैन्यावर दबाव!
         Date: 06-Aug-2019
३७० नंतर युद्धासाठी पाकिस्तानी जनतेचा सैन्यावर दबाव!
 
(ICRR Af-Pak)

 
काश्मीर यापुढे "द्विपक्षीय" मुद्दा नाही??
 
 
भारताने कलम ३७० आणि ३५-अ ला एका झटक्यात मुठमाती देऊन आणि सध्याच्या जम्मू काश्मीर राज्याचे २ केंद्रशासित प्रदेशात विभाजन करून पाकिस्तानला आणि जगाला जो धक्का दिलाय तो अनपेक्षित आणि जीवघेणा आहे. आजपर्यंत काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तानमधील "द्विपक्षीय" मुद्दा आहे यात तिसऱ्या देशाची मध्यस्थी चालणार नाही, अशी भारताची भुमिका होती. ३७० रद्द करून भारताने काश्मीरचं देशात संपूर्ण विलीनीकरण केल्यानंतर आता कोणत्याही क्षणी भारतीय विदेश मंत्रालय, काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा असुन तो आता "द्विपक्षीय मुद्दा" राहिलेला नाही असं निःसंदिग्धपणे जगाला सांगु शकतं.
 
 
शिवाय काल पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी म्हटल्याप्रमाणे ३७० रद्द केल्यानंतर भारत अमेरिकन अध्यक्ष ट्रंम्प यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव मान्य करू शकतं पण मध्यस्थी "पाकव्याप्त काश्मीर" च्या मुद्दयांवर असेल. अशी घोषणा भारताने खरंच केली, तर चीनला तो जबरदस्त धक्का असेल. कारण "सिपेक" पाकव्याप्त काश्मीरमधुन जातो आणि पाकीस्तान पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा अमेरिकेच्या हातात गेला तर मोठ्या अडचणीत सापडेल.
 
 
भारत असं करेल का माहित नाही पण खरंच केल्यास तो दिवस अभूतपूर्व असेल. पण भारताच्या या एका
घोषणेने पाकिस्तानमध्ये आगडोंब उसळेल यात जराही शंका नाही!
 
 
पाकिस्तानी सैन्यासाठी काश्मीर हे सतत पैसे देणारं ए.टी.एम. मशीन होतं. पाकिस्तानी सैन्य पोटॅटो चिप्स, चप्पल, सिमेंट, पेट्रोलियम, तयार कपडे, खेळणी, कोल्ड्रिंक्स आणि आता नव्याने सोन्याच्या खाणी अशा अब्जावधी डॉलर्सच्या उद्योगधंद्यात सक्रिय आहे. शिवाय देशात वीज आणि पाणी बिले, जमीन महसुलसुद्धा पाकिस्तान आर्मी जमा करते. यातला कित्येक पैसा सैन्य अधिकाऱ्यांच्या थेट खिशात जातो. फौजी अधिकारी विदेशात प्रॉपर्टी तयार करतात आणि देश रसातळाला जातो, हे चक्र १९४७ पासुन अव्याहतपणे चालु आहे.
 
 
पण या पापांवर पांघरूण घालण्यासाठी आणि जनतेच्या मनात सैन्याच्या बाबतीत अतोनात आदर निर्माण करण्यासाठी सेना सतत भारत द्वेष आणि हिंदु द्वेष याचा वापर करत असते. यात काश्मीर हे एक महत्वाचं "यंत्र" त्यांच्या हातात आहे. काश्मीर शिवाय पाकिस्तान पुर्ण होऊ शकत नाही, ही भावना पाकिस्तानी लोकांच्या मनात रुजवण्यात सैन्य यशस्वी झालं आहे. काश्मीरचा गांजा भरलेली ही "चिलीम" काल फुटल्याने पाकिस्तानी सैन्याची धावाधाव उडाली आहे.
 
 
३७० नंतर पाकिस्तानी जनतेची प्रतिक्रिया आणि दबाव...
 
 
इम्रानच्या अमेरिका दौऱ्यात ट्रंम्प यांनी भारत- पाकिस्तानमध्ये काश्मीर मुद्यावर मध्यस्थीची तयारी उघडपणे दर्शवल्याने पाकिस्तानचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यातच मध्यस्थीची विनंती खुद्द मोदी यांनी मला केली अशी थाप ट्रंम्प यांनी मारल्याने भारत अडचणीत सापडला होता. पाकिस्तानला काश्मीरचा मुद्दा परत एकदा जगभरात वापरता येईल अशी शक्यता वाटत होती तेवढ्यात भारताने अनपेक्षित कारवाई करत हा मुद्दाच संपवला. आता पाकिस्तानी जनता पाकिस्तानी सैन्यावर "काहीतरी" करण्याचा दबाव वाढवत आहे. जगभरच्या दबावाने आणि डब्यात गेलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सध्या अटक केलेले अतिरेकी आणि संघटना यांना खुली सूट देण्याची उघड मागणी होत आहे.
 
 
पण अशा संघटना मोठा परिणाम करू शकत नाहीत, त्यामुळे परत एकदा पाकिस्तान जिहादी अतिरेकी आणि पाकिस्तानी सैनिक यांची "हायब्रीड कॉम्बॅट युनिट्स" तयार करून नियंत्रण रेषेवर मोठा धुमाकुळ घालू शकतो. सध्या काश्मीरमध्ये असलेला बंदोबस्त आज ना उद्या उठवल्यावर तिथे मोठा उद्रेक घडवुन आणणे, स्लीपर सेल्स द्वारे संपूर्ण भारतात रक्तपाताचा प्रयत्न, कारगिल सारखा प्रयत्न करून काही भाग ताब्यात घेऊन भारताला लढायला भाग पाडणे आणि या सगळ्यातुन जगाला आण्विक युद्धाची भीती घालणे असे पाकिस्तानचे प्रयत्न दिसत आहेत. आज कॉर्प्स कमांडर्सच्या कॉन्फरन्स नंतर पाकिस्तानी सैन्य प्रवक्त्याने वापरलेली भाषा भडकाऊ आहे, त्यांच्या वक्तव्यात, "पाकिस्तानी सेना याला कोणत्याही थराला जाऊन उत्तर द्यायला तयार आहे" अशी भाषा वापरलेली आहे.
 
 
याचाच एक भाग म्हणून पाकिस्तान दिल्ली येथील त्यांचा राजदूत परत बोलावुन भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडु शकतो. आजच अशा अर्थाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
 
 
सोशल मिडीयावर पाकिस्तानी नागरीक स्वतःच्या सैन्याची हेटाळणी करत आहेत, आता निषेध आणि विधाने थांबवा आणि प्रत्यक्ष काहीतरी करा. तुमची मिसाईल्स आणि टँक्स काय १४ ऑगस्टच्या परेडसाठी आणले आहेत का? तुम्हाला अमेरिकेने मूर्ख बनवलं, ट्रम्पने पाने पुसली, उद्दाम मोदी तुम्हाला किंमत देत नाही, बालाकोटला ते येऊन परत गेले आणि तुम्ही आरडाओरडा करण्यापलीकडे काहीच करत नाही, ही अत्यंत शरमेची बाब आहे! या आणि अन्य तिखट प्रतिक्रिया पाकिस्तानी सैन्य- सरकार यांच्या विरोधात येत आहेत. यातुन बाहेर येण्यासाठी पाकीस्तान कोणत्याही थराला जाऊ शकते यात शंका नाही.
 
 
पाकिस्तानी सैन्यासमोरचे पर्याय...
 
 
सध्याच्या भीषण आर्थिक संकटामुळे पाकिस्तानी सेना थेट युद्धात उतरण्याची शक्यता नाही. पण आपल्या जिहादी प्रॉक्सिज आणि स्लीपर सेल्स वापरून धुमाकुळ घालण्याची मोठी शक्यता आहे. शिवाय रेफरंडम २०२० आणि अन्य विभाजनवादी चळवळींना खतपाणी घालण्याचीही खात्री आहे. पण यावेळी अन्य एक मोठा धोका पाकिस्तानी सैन्यासमोर आ- वासुन उभा आहे. पुर्वी "काश्मीर" म्हटल्यावर पंजाबी, सिंधी, बलुच , पश्तुन सगळे पाकिस्तानी एका झेंड्याखाली उभे राहत होते. आज बलुचिस्तानमध्ये सैन्यावर आणि फ्रंटियर कॉर्प्सवर रोज हल्ले होत आहेत. पश्तुन बहुल वझिरीस्तान प्रचंड अस्वस्थ आहे. पश्तुन डुरंन्ड लाईन पुसून टाकण्याची भाषा करत आहेत.
 
 
तरीही पाकिस्तानी सैन्याने लष्करी साहसवाद केलाच तर एका तडाख्यात पाकिस्तानची शकले उडू शकतात. १९७१ ला भारताला प्रत्यक्ष सैन्य पाठवुन बांगलादेश स्वतंत्र करावा लागला, पण यावेळी सैन्य नं पाठवता, फक्त भारताची पश्चिम सीमा पेटती ठेऊन किंवा ७० ते ७५ किमीचा एक दणदणीत "मिलिटरी पंच" मारून हा परिणाम साधता येऊ शकतो.
 
 
पाकिस्तानच्या धार्मिक- भावनिक संकल्पनेपासुन सिंधी, बलुच आणि पश्तुन खुप खुप लांब गेले आहेत आणि भारताच्या "मदतीची" आतुरतेने वाट बघत आहेत. पाकिस्तानी सैन्य प्रवक्त्याने म्हटल्याप्रमाणे पाकिस्तान अशी "मदत" करण्याची संधी भारताला देईल?
 
 
आपल्याला युद्ध नकोच; पण युद्ध "हवे" का "नको" हा प्रश्न विचारला गेल्यास... लादले गेल्यास काय करणार?
 
 
---- विनय जोशी