२१ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर भारतीय नौदलाला पाकिस्तानची सबमरीन पीएनएस साद शोधण्यात यश मिळाले.
         Date: 25-Jun-2019

२१ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर भारतीय नौदलाला पाकिस्तानची सबमरीन पीएनएस साद शोधण्यात यश मिळाले.

 

पाकिस्तानने पुलवामावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. तेव्हा भारताने आपल्या नौदलाची चालू असलेली सर्व ऑपरेशन्स रद्द करून त्यांना पाकिस्तानी जलसीमेजवळ मोठ्या प्रमाणात तैनात केले.

 

पाकिस्तानी सबमरीन शोधण्यासाठी भारताने अरबी समुद्रात न्युक्लियर आणि कन्वेन्शनल सबमरीन तैनात केल्या होत्या.


 

भारतीय नौदलाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानला असे वाटले की आपल्या शहीद जवानांचा बदला घेण्यासाठी भारत आपल्या नौदलाचा वापर करेल. परंतु भारताने मात्र पाकिस्तानला गाफील ठेवून खैबर पख्तुनख्वा प्रांतातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या बालाकोटमधील तळांवर एअर स्ट्राईक केले. 

 

त्याचवेळी नियंत्रणरेषेवरील पाकिस्तानी लष्करावर भारत करडी नजर ठेवून होताच. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की बालाकोटच्या स्ट्राईक नंतर पाकिस्तानचे अगोस्त क्लास सबमरीन पीएनएस साद अचानक पाकिस्तानी किनारपट्टीवरून नाहीसे झाले. पीएनएस साद हे एअर इंडिपेन्डन्ट प्रपल्शन सबमरीन आहे. म्हणजेच याच्यामध्ये अशी प्रणाली आहे की जी या सबमरीनला इतर कोणत्याही सबमरीन पेक्षा जास्त काळ पाण्याच्या आत दडवून ठेऊ शकते. त्याचमुळे हे नाहीसे झाल्यावर भारतीय नौदल हे शोधण्यासाठी खूप प्रयत्न करीत होते.

 

पाकिस्तानच्या पीएनएस साद चे शेवटचे लोकेशन बघता ते जिथून गायब झाले होते तिथून ३ दिवसात गुजरातच्या किनाऱ्यावर पोहचू शकते किंवा मुंबईतील वेस्टर्न फ्लीटच्या मुख्यालयाजवळ ५ दिवसात पोहचू शकले असते. देशाच्या सुरक्षेला यापासून फार मोठा धोका संभवत असल्याने भारताने या सबमरीनला शोधण्यासाठी कंबर कसली होती. गायब झालेल्या या सबमरीनला शोधण्यासाठी नौदलाने अँटी-सबमरीन वॉरफेअर आणि एअरक्राफ्ट ताबडतोब तैनात केले.

 

या काळात कोणत्या कोणत्या ठिकाणी हे जाऊ शकते याचा साधारण अंदाज घेऊन नौदलाने गुजरात, मुंबईसह इतर राज्यातील किनाऱ्यांवर सुद्धा कडक शोधमोहीम राबविली. सर्व शक्यतांचा अंदाज घेऊन P-8ls ला पाचारण करण्यात आले. पाकिस्तानची सबमरीन भारतीय हद्दीत घुसून देशाचे नुकसान करू नये म्हणून नौदलाने सगळ्या प्रकारची सावधगिरी बाळगली होती. भारताने या कामी न्युक्लियर सबमरीन आयएनएस चक्र आणि नवीनच असलेल्या स्कॉर्पीन- क्लास सबमरीन आयएनएस कलवरीला सुद्धा तैनात केले. भारतीय किनारपट्टीजवळ किंवा पाण्यात काही संशयास्पद हालचाल होतेय का याची तपासणी करण्यासाठी सॅटेलाईटचीही मदत घेण्यात आली. या सबमरीनला कुठल्याही परिस्थितीत शोधून काढून पृष्ठभागावर आणायचे आणि आवश्यकता भासल्यास त्यावर कडक कारवाई करायची असे नौदलाने ठरविले होते.

 

२१ दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर भारतीय नौदलाला पाकिस्तानचे पीएनएस साद पाकिस्तानच्या पश्चिमी किनारपट्टीवर सापडले. भारताच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी ते लपवून ठेवण्यात आले होते.

 

भारतीय नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डिके शर्मा यांनी सांगितले की भारतीय नौदलाच्या ताकदीपुढे पाकिस्तान नौदलाला खुल्या महासागरात प्रवेश करणे जोखमीचे वाटले. त्यांनी आपले नौदल मकरनच्या किनाऱ्यापर्यंतच तैनात केले. सूत्रांनुसार भारताने एअर क्राफ्ट कॅरियर आयएनएस विक्रमादित्य सह ६० युद्धनौका अरबी समुद्राच्या उत्तरेला तैनात केल्या होत्या. 

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: defencenews

 

Indian Navy hunted for Pak Sub PNS Saad for 21 days after Balakot Air Strike.