बांगलादेशने १९७१ च्या जनसंहाराला संपूर्ण जगात "जिनोसाईड" म्हणून नोंदण्याची मागणी संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली आहे.
         Date: 03-Apr-2019

 बांगलादेशने १९७१ च्या जनसंहाराला संपूर्ण जगात "जिनोसाईड" म्हणून नोंदण्याची मागणी संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली आहे.

 

फाळणीआधीच्या पाकिस्तानने २५ मार्च १९७१ रोजी पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेल्या ईस्ट पाकिस्तानी नागरिकांच्या अतिशय क्रूर अश्या नरसंहाराबद्दल (ऑपरेशन सर्चलाइट) पाकिस्तानी लष्कराविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघाकडे दाद मागितली आहे. जगातील सर्वात वाईट असा हा नरसंहार त्या वेळच्या पाकिस्तानी सैन्याने घडवून आणला होता.

 

"या हत्याकांडासंदर्भात आंतरराष्ट्रीय संस्था, तज्ज्ञ, इतिहासकार आणि परदेशी पत्रकारांनी स्पष्ट मत आणि पुरावे दिलेले आहेत. या अत्याचारांचे चांगले दस्तऐवजीकरण केले गेले आहे. अनेक अभ्यासू नोंदी आणि पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढे पुरावे आणि माहिती उपलब्ध असताना देखील या हत्याकांडाची नोंद किंवा या नरसंहाराची दखल संयुक्त राष्ट्रसंघासह आंतरराष्ट्रीय जिनोसाईडविषयीच्या चर्चेत कधी केली गेली नाही. आमच्या बाबतीतही घडलेल्या या १९७१ च्या जिनोसाईडला एक ओळख देण्याची मागणी मी संयुक्त राष्ट्रसंघाकडे करीत आहे," असे संयुक्त राष्ट्रसंघातील बांगलादेशचे स्थायी प्रतिनिधी मसूद बिन मोमिन यांनी न्यूयॉर्कमधील पॅनेल बैठकीस संबोधित करताना सुचविले.

 

"अशी निष्क्रियता असूनही आम्ही राष्ट्रीय स्तरावर आमचे कार्य करीत आहोत. शिक्षेची पद्धत संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार स्थानिक युद्ध गुन्हेगारांची चाचणी घेत आहे."

'

"... २५ मार्च, बांगलादेशचा नरसंहार दिवस. १९७१ मध्ये याच दिवशी 'ऑपरेशनल सर्चलाइट' या सांकेतिक नावाने गुप्त आदेशानुसार पाकिस्तानी सैन्याने आमच्या राजधानी ढाकामध्ये आणि देशातील इतर शहरांमध्ये घुसून अत्यंत क्रूरपणे मोठ्या प्रमाणात नागरिकांची हत्या केली. हे हत्याकांड पहाट होईपर्यंत चालू होते. विद्यार्थी, शिक्षक, विचारवंत, अल्पसंख्यांक तसेच विविध सेवा पुरविणारे लोक, विशेषतः पोलीस, ईस्ट पाकिस्तानचे सैनिक यासह हजारो नागरिक या हत्याकांडात ठार झाले. एका रात्रीत ढाका स्मशानभूमी झाली. २५ मार्चचे हे हत्याकांड फक्त बांगलादेशाच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या दृष्टीने इतिहासातील एक काळा अध्याय आहे. म्हणूनच, मार्च २०१७ मध्ये बांगलादेशाच्या संसदेने आणि कॅबिनेटने २५ मार्चच्या त्या काळ्या रात्रीच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस जिनोसाईड दिन म्हणून घोषित केला. या दुर्दैवी रात्री मारल्या गेलेल्या सर्व शहीदांचे मी स्मरण आणि आदर करतो." असे त्यांनी म्हटले.

 

"२५ मार्चचे नियोजित हत्याकांड हे आमची स्वातंत्र्याची मागणी एकदाच आणि कायमची दडपून टाकण्यासाठी केले गेले. परंतु हीच आमच्यासाठी स्वातंत्र्य प्राप्त करण्याची नांदी ठरली. ९ महिन्यांच्या अथक युद्धाने अखेरीस डिसेंबर १९७१ मध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. २५ चा नरसंहार पुरेसा नसल्यागत पुढील नऊ महिने प्रत्येक रात्री पाकिस्तानी सैन्याने आणि त्यांच्या स्थानिक हस्तकांनी संपूर्ण देशातील ३ मिलियन लोक ठार केले. एवढेच नाही तर जवळपास २ लाख स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले आणि १० मिलियन लोकांना बेघर करण्यात आले. या लोकांना निर्वासित म्हणून भारतात आश्रय घ्यावा लागला. इतक्या अल्प कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्या होणे हे जगाच्या इतिहासात कधीच घडले नाही. म्हणूनच हे जगातील सर्वात वाईट नरसंहारांपैकी एक मानले जाते, "असे मोमीन यांनी सांगितले.

 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या जिनोसाईड प्रतिबंधक विशेष सल्लागार अदामा दीयेंग या ढाकामध्ये होत्या. त्यांनी बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांना संयुक्त राष्ट्रसंघात हा मुद्दा मांडण्याचे आश्वासन दिले होते. "कदाचित काही देश याला विरोध करू शकतात. परंतु आम्ही आंतरराष्ट्रीय मंचावर स्वातंत्र्य युद्धाच्या सेशन दरम्यान पाकिस्तानने बांगलादेशात केलेल्या याजिनोसाईडचा मुद्दा नक्की उपस्थित करू," असे दीयेंग यांनी आश्वासन दिले.

 

ऑपरेशन सर्चलाइटचे मुख्य लक्ष्य ढाका विद्यापीठाचे शिक्षक आणि विद्यार्थी होते, जे या विद्यापीठातून पाकिस्तानविरोधी कारवाया करीत होते. हे विद्यापीठ पाकिस्तानविरोधी कारवायांचे ठिकाण होते. त्यामुळेच पाकिस्तानी सैन्याने विशेषतः या विद्यापीठातील तरुण मुलांना लक्ष्य केले जे या चळवळीत प्रामुख्याने सामील होण्याची शक्यता जास्त होती. या ठार मारलेल्या मुलांची बॉडी दुसऱ्या दिवशी शेतात, नदीत तरंगताना तसेच लष्करी छावण्यांजवळ आढळून आली.

 

पाकिस्तानस्थित ब्रिटिश पत्रकार अँथनी मसकॅरेन्हस यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या नरसंहाराला वाचा फोडली. पाकिस्तानी मेजर ने त्यांना सांगितले," हे पवित्र आणि अपवित्रतेचे युद्ध आहे. येथील लोकांची नावे जरी मुस्लिम असली आणि ते स्वतःला मुस्लिम म्हणवून घेत असले तरी ते मनाने हिंदू आहेत. आम्ही आता त्यांचे वर्गीकरण करीत आहोत. जे लोक जिवंत आहेत ते खरे मुसलमान आहेत. आता आम्ही त्यांना उर्दू शिकवू."

 

१९७१च्या सिक्युलर बांग्लादेश समितीचे अध्यक्ष आणि १९७१ च्या ट्रायल ऑफ वॉर क्रिमिनल्सचे अध्यक्ष शहरीअर कबीर म्हणाले," १९७१ मध्ये झालेले हत्याकांड संपूर्ण जगापासून अज्ञात राहिले याचे कारण बांगलादेश आंतरराष्ट्रीय मंचावर या विरोधात आवाज उठविण्यात अपयशी ठरला."

 

२०१६ मध्ये २५ मार्च हा दिवस जिनोसाईड स्मरण दिन म्हणून घोषित करणाऱ्या कमिटीचे कबीर हे एक सदस्य होते.

 

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: ET

 

Bangladesh ups ante on Pakistan; demands UN recognition for 1971 genocide