४०० हिंदू मंदिरांना पाकिस्तान पुनरुज्जीवीत करणार....
         Date: 13-Apr-2019

 ४०० हिंदू मंदिरांना पाकिस्तान पुनरुज्जीवीत करणार....

 

अनेक वर्ष पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदू आपली मंदिरे सरकारकडे परत मागत आहेत. त्यांच्या या दीर्घकालीन मागणीचा विचार करून पाकिस्तानच्या फेडरल गव्हर्नमेन्टने पाकिस्तानातील सर्व हिंदू मंदिरे पुन्हा खुली करून ती या अल्पसंख्यांक हिंदू लोकांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. फाळणीच्या वेळी जेव्हा अनेक हिंदूंनी पाकिस्तान सोडले तेव्हा तेथील मुस्लिमांकडून मोठ्या प्रमाणावर या हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण केले गेले. ज्या हिंदू कुटुंबांनी पाकिस्तानातच रहायचा निर्णय घेतला अश्या ठिकाणच्या मंदिरांवर आणि जमिनीवर तेथील स्थानिक लोकांनी कब्जा केला. अनेक मंदिरांचा वापर सार्वजनिक सुविधांसाठी केला गेला तर काही मंदिरांचे मदरशांमध्ये रूपांतर केले गेले.

 

 

आता या मंदिरांना परत मिळवून त्यांचा ताबा पुन्हा हिंदू समाजाला देण्याची पाकिस्तान सरकारची इच्छा आहे. यासाठी सरकारने ४०० मंदिरे  पुनर्स्थापित आणि पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या उपक्रमाची सुरुवात सियालकोट आणि पेशावर येथील दोन ऐतिहासिक धार्मिक स्थळांपासून होईल. सियालकोटमधील १००० वर्षापूर्वीच्या जगन्नाथ मंदीराचा जीर्णोद्धार केला जाईल. १९९२ मध्ये जेव्हा भारतात बाबरी मशीद पडली गेली तेव्हा या मंदिरावर झालेल्या हल्ल्यात हे मंदिर उध्वस्त केले गेले. तेव्हापासून या मंदिरात हिंदू लोकांनी जाण्याचे सोडले होते. पेशावर मधील न्यायालयाने गोरखनाथांचे मंदिर पुन्हा खुले करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर या मंदिराला सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.

 

आतापासून दरवर्षी पाकिस्तान सरकारकडून दोन ते तीन अश्या ऐतिहासिक वारसा असलेल्या मंदिरांची पुनर्स्थापना केली जाईल.

 

ऑल- पाकिस्तान हिंदू राईट्स मुव्हमेंट ने देशभरात एक सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणात समजलेले सत्य धक्कादायक होते. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात ४२८ हिंदू मंदिरे होती आणि १९९० नंतर त्यातील ४०८ मंदिरांचे रूपांतर खेळण्यांच्या दुकानात, हॉटेलमध्ये, सरकारी कार्यालयात आणि शाळेत केले गेले आहे.

 

अलीकडच्या सरकारी अंदाजानुसार, सिंधमधील कमीतकमी ११ मंदिरे, पंजाबमधील चार, बलूचिस्तानमधील तीन आणि खैबर पख्तुनख्वा येथील दोन मंदिरे २०१९ च्या सुरुवातीला वापरात होती.

 

पाकिस्तानने अलीकडेच गुरु नानक यांचे पंजाब मधील जन्मस्थान असलेले कर्तारपूर साहिब कॉरिडॉर भाविकांसाठी खुले केले. तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील प्राचीन सरस्वती मंदिर, शारदा पीठ हिंदू भाविकांना खुले करण्याचे देखील पाकिस्तान सरकारने ठरविले आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: INDIA TODAY

 

Pakistan to restore, hand over 400 Hindu temples