भारत पहिल्यांदाच महिलांना डिफेन्स अटॅची म्हणून नियुक्त करणार
         Date: 01-Apr-2019

भारत पहिल्यांदाच महिलांना डिफेन्स अटॅची म्हणून नियुक्त करणार

 

लवकरच भारत आपल्या परदेश नीतीअंतर्गत महिलांना संरक्षण दूतावासात डिफेन्स अटॅची पदांवर नियुक्त करेल. सरकारने हा निर्णय वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केल्यानंतर आपल्या तीनही सुरक्षा दलांमध्ये या पदासाठी लायक महिला उमेदवार कोण याची चाचपणी सुरु केली. मिशनच्या पहिल्या टप्प्यात युरोप आणि अमेरिका यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण सहाय्यक म्हणून पदे देण्यात येतील.

 

यापूर्वी भारतात संरक्षणासारख्या महत्त्वाच्या पदांवर पुरुषी वर्चस्व होते परंतु संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्या महिला संरक्षण मंत्री म्हणून धुरा सांभाळल्यापासून या क्षेत्रात महिलांना बरोबरीचा हक्क त्यांच्यामुळे प्राप्त झाला असे म्हटले तर चूक ठरणार नाही. आजमितीला भारतात अनेक महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत जसे की राजदूत, राजनीतीज्ञ, विदेश सचिव.

 
 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्त्रियांची विदेशात डिफेन्स अटॅची म्हणून आळीपाळीने भरती केली जाईल. भारताने जेव्हापासून संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात जोरदार धडक मारली आहे तेव्हापासून डिफेन्स अटॅचीच्या पदाला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. काही महत्त्वाच्या देशांप्रमाणेच संरक्षण नीती हे आता भारताच्या राजनीतीचे महत्त्वाचे अंग आहे.

 

संरक्षण नीती ही मुख्यत्वे नौदलाच्या अखत्यारीत येत होती. परंतु मोदी सरकारने मात्र त्याला अधिक व्यापक बनविले. शेजारील देशांच्या विस्तारित बदलत्या धोरणात्मक परिस्थितीमुळे संरक्षण क्षेत्रात फार मोठी झेप घेणे भारताला शक्य होणार आहे. भविष्यात संरक्षण निर्यातीसाठी एक नवीन बाजारपेठ उघडण्याची क्षमता भारतामध्ये नक्कीच आहे.

 

महिलांना भारतीय लष्कराच्या १० शाखांमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळू शकेल असे या महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. सिग्नल्स, इंजिनियर्स, आर्मी एव्हिएशन, आर्मी एअर डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स, आर्मी सर्विस कॉर्प्स, आर्मी ऑर्डीनन्स कॉर्प्स आणि इंटेलिजन्स या शाखांमध्ये भरती केली जाईल. इंडियन एअर फोर्सच्या सर्व शाखा महिलांसाठी खुल्या असतील. अगदी फायटर पायलट्स सुद्धा.

 

नौदलाने स्त्रियांकरिता नॉन-सी विशिष्ट सुविधा उघडल्या आहेत. महिलांना खलाशाचे प्रशिक्षण देण्यासाठी नवीन "प्रशिक्षण नौका" वापरण्यात येतील. भविष्यात खलाशांचे क्षेत्र सुद्धा स्त्रियांसाठी खुले करण्याचा या मागे उद्देश असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

 

संरक्षण नितीमध्ये महिलांची भूमिका अधिक प्रभावी ठरू शकते. भारताचे संरक्षण आणि सुरक्षा हीत महत्त्वाचे आहे. सखोल आहे. संरक्षणाच्या बाबतीत अधिक पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यामुळेच या पुरुषप्रधान संरक्षण क्षेत्रात स्त्रियांना हलक्या दर्जाची कामे देणे अथवा त्यांना कमी लेखणे अश्या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. मग या पुरुषी अहंकारापुढे भारताचे संरक्षण हीत भले ही बाजूला पडेना का. ही चिंतेची बाब आहे. परंतु जर देशाचे हीत डोळ्यासमोर ठेवले आणि काम केले तर भारत संरक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेईल.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: TOI

 

In a 1st, India to post women as defence attaches abroad