पाकिस्तानच्या खैबर प्रांतातील दहशतवादी छावण्यांविरोधी पश्तुनांचा हल्लाबोल
         Date: 24-Mar-2019
   पाकिस्तानच्या खैबर प्रांतातील दहशतवादी छावण्यांविरोधी पश्तुनांचा हल्लाबोल

(ए एन आय सूत्रांच्या बातमीचा स्वैर भावानुवाद)

डाॅ.आर्या जोशी



भारताने पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रांतातील जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या छावण्यांवर हवाई हल्ला केल्यानंतर या विशिष्ट  भागातील तसेच खैबर प्रांताच्या संघराज्यवादी आदिवासी जनजातींच्या वसाहत प्रदेशांतील पश्तुनांनी तेथील दहशतवादी छावण्यांच्या अस्तित्वाला कडाडून विरोध केला आहे.

 

जिनिव्हामधील चाळिसाव्या मानवी हक्क आणि अधिकार समितीच्या अधिवेशनाच्या निमित्ताने पश्तुनांनी या विषयावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

 

पश्तुन तहफुज चळवळीच्या अंतर्गत (PTM) राजकीय कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी सुरक्षा दलाकडून केल्या गेलेल्या पश्तुनच्या राजकीय कार्यकर्त्यांचे अपहरण तसेच लक्ष्यपूर्वक केल्या गेलेल्या हत्यांकडे जाणिवपूर्वक निर्देश केला आहे.

 

पश्तुन मानवी हक्क आणि अधिकार समितीचे सदस्य फझल उर रहमान याविषयी म्हणतात की आम्हालाही सन्मानाने जगण्याची संधी द्या. आम्ही दहशतवादाच्या विरूद्ध आहोत. आम्हालाही आत्मसन्मानाने जगण्याची इच्छा आहे. संघराज्यवादी आदिम प्रदेशाच्या कोपर्‍याकोपर्‍यावर असलेल्या सैन्याच्या  तपासणी नाक्यांवर आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळते. आम्हाला सत्य आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करणार्‍या समितीची गरज आहे. गेल्या सतरा वर्षात तथाकथित दहशतीच्या या युद्धात नाहक बळी गेलेल्या हजारो लोकाचं स्मरण तरी ठेवलं गेलं पाहिजे!

 

पाकिस्तानी सैन्याकडून  शेकडो निरपराध मारले गेले आहेत,सुमारे ३२,००० लोक छळबळपूर्वक निर्वासित केले गेले आहेत. आम्ही या सर्वाचा जाब विचारत आहोत आणि यासंदर्भात अधिकृत सूत्रांकडून आम्हाला उत्तरे हवी आहेत!

 

बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्याकडून ठार झालेल्या अरमान लोनी या पश्तुनी कार्यकर्त्याला या कार्यक्रमात सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. पोलिसांवर झालेल्या तालिबानी हल्ल्याचा निषेध नोंदविल्याबद्दल त्याला ठार करण्यात आले आहे.

 

छळपूर्वक आणि सक्तीने निर्वासित केल्या गेलेल्या व्यक्तींचा तपास करण्यासाठी अलम जहीब महसूद हा सर्वेक्षण करीत आहे. त्याच्यावर दहशतवादी म्हणून खोटा आरोप नोंदवून त्याला कराचीत अटक करण्यात आली आहे आणि अद्यापही तो तुरुंगात आहे. आम्ही त्याच्या सुटकेची मागणी करीत आहोत.

 

ज्या व्यक्ती शांततेची इच्छा धरून दहशतवादाला विरोध करीत आहेत अशांना लक्ष्यकरून मारले जात आहे याचाच अर्थ पाकिस्तानी सैन्यालाही शांतता प्रस्थापित करण्यात स्वारस्य नाही हे स्पष्टच दिसून येत आहे.

 

खैबर प्रांतात पाकिस्तानी सैन्य जाणीवपूर्वक दहशतवादी छावण्यांना आश्रय देते आहे ,त्यांना तळ ठोकण्यासाठी मदतच करते आहे.

 

पाकिस्तानसाठी काम करणारे दहशतवादी गट अस्तित्वात आहेत. ते त्यांनी अफगाणिस्तानात पाठवले आहेतच. शिवाय या गटांनी खैबर पख्तुन्वा प्रांत तर काबीज केला आहेच पण त्याच जोडीने ते काश्मीर प्रांतातही दहशत माजवीत आहेत,संघर्ष करीत आहेत. यासाठी पाकिस्तान त्यांना प्रशिक्षण देत आहे.

 

या सर्व दहशतवादी  छावण्या मोडून काढणे फार गरजेचे आहे. याचं धक्कादायक कारण हे आहे की ते पश्तुन,बलुच किंवा सिंध यांच्यासाठी काम करीत नसून त्यांची नजर पंजाबी समुदायावर आहे!पीर रियाज हे पश्तुनी कार्यकर्ते नोंदवतात, पठाण हे मूलतः पश्तुनी असून ते कालांतराने पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे रहिवासी झाले आहेत.

 

पंजाबी वसाहतींकडून यासाठी समिती नेमून काम केले जात आहे. पण असे असले तरी आम्ही दहशतवादाला विरोध करीत आहोत आणि या विषयावर आम्ही ठाम आहोत याविषयी पश्तुनी समाजगटांमधे मतैक्य आहे.

 

हा तिढा सुटणार की नाही हे पाकिस्तानच्या मानसिकतेवर आणि पाकिस्तानी सैन्याच्या वागणुकीवर अवलंबून आहे.

पाकिस्तान प्रांतातील आदिम पश्तुनी आता गप्प न बसता जागतिक स्तरावर दहशतवादविरोधी आपले म्हणणे ठामपणे नोंदवीत आहेत याकडे पाकिस्तानने दुर्लक्ष करणे म्हणजे नव्या आव्हानांना निमंत्रण देण्यासारखेच होईल!