बलुचिस्तानातील दुष्काळ मुलींना शाळा-बाह्य करतो आहे.. एक बाहेर न आलेले वास्तव.
         Date: 17-Mar-2019

बलुचिस्तानातील दुष्काळ मुलींना शाळा-बाह्य करतो आहे.. एक बाहेर न आलेले वास्तव.

 

(मुनीर फरज यांच्या लेखाचा स्वैर भावानुवाद)

 

डाॅ.आर्या जोशी

(ICRR Media Monitoring Desk)

 

पाकिस्तान प्रांतातील बलुचिस्तानमधील आत्यंतिक मागासलेपणा ही नाकारण्याजोगी किंवा दुर्लक्ष करण्याजोगी बाब नक्की नाही कारण हे वास्तव सर्वांना माहिती आहेच. या मागासलेपणाची कारणे विचारात घेताना प्रमुख कारण समोर येते आहे ते आहे तेथील साक्षरतेचे अत्यल्प प्रमाण. तेथील महिलांच्या मागासलेपणाचे सर्वात महत्वाचे मूलगामी कारणही अर्थातच शिक्षणाचा अभाव हेच आहे.

 

महिलांच्या विकासातील हा सर्वात मोठा अडथळा  बनत चालला आहे.

 

 

अल्पवयीन मुलींना त्यांचे कुटुंबीय शाळेतून काढतात आणि त्यांचे लग्न लावून दिले जाते. यामुळे अगणित सामाजिक आणि आरोग्याला घातक अशा समस्याही वाढू लागल्या आहेत. अल्पवयातच मुलीचे लग्न करून दिले जात असल्याने लादल्या गेलेल्या विवाहामुळे  बालमातांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढणे ओघाने आलेच!

 

या सर्वाचे मूलभूत कारण आहे बलुचिस्तानातील दुष्काळ आणि अवर्षण!

 

मागील दोन वर्षांपासून दुष्काळाच्या संकटामुळे स्थानिक शेती संकटात आली आहे. शेतीतील उत्पन्न नसल्याने कुटुंबाची आर्थिक वाताहत आणि अन्नधान्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. त्यामुळे वराकडून मिळणार्‍या आर्थिक रकमेच्या मोबदल्यात अल्पवयीन अजाण मुलीचे वयस्कर पुरुषाशी लग्न लावून देणे याची संख्या वाढती आहे.
डब्ल्यू एच् ओ च्या ताज्या अहवालानुसार बलुचिस्तानमधील सुमारे बारा लाख लोकसंख्येपैकी चार लाख लोक हे दुष्काळग्रस्त आहेत.

 

या समस्येमुळे अनेक मुलींना आपल्या प्राथमिक शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. लहान वयात झालेले विवाह अशा मुलींवर होणार्‍या बलात्कारांनाही कारणीभूत ठरत आहेत ही गांभीर्याची बाब आहे!

 

अशा मुलींचे पालक आपल्या मुलीच्या केवळ शिक्षणाचा आणि विकासाचाच नव्हे तर जगण्याचा हक्कही त्यांच्यापासून हिरावून घेऊ लागले आहेत!



२०१६-१७चा पाकिस्तान शैक्षणिक सांख्यिकीचा अहवाल वास्तवापासून शेकडो योजनं दूर आहे. बलुचिस्तानातील शाळाबाह्य मुलींची नोंद त्यात घेतली गेलेली दिसत नाही. पाकिस्तानातील  दारिद्रय ही एक सर्व जगाला माहिती असलेली बाब असतानाच बलुचिस्तानमधील दारिद्रय ही त्याहूनही अधिक खुपणारी गंभीर समस्या बनत चालली आहे आणि त्यावर तातडीने कार्यवाही होणे आत्यंतिक आवश्यक आहे.
 

एकूणच मुलींच्या शिक्षणाबद्दल बलुचिस्तानमधे जाणीव जागृती तुलनेने उशिराच झालेली आहे आणि आता दुष्काळाचे संकट त्या वृत्तीला खतपाणीच घालते आहे.

 

प्राथमिक शिक्षण हा कोणत्याही व्यक्तीच्या घडणीचा मूलभूत पाया असतो आणि जर तोच कमकुवत राहिला तर त्याचे दुष्परिणाम सामाजिक आरोग्याला विघातक ठरू शकतात.



बलुचिस्तानातील वांशिक आदिम समूहांच्या पारंपरिक समजुती,स्वनिर्मित धार्मिक शिकवणी आणि त्यांचा प्रभाव यामुळे तेथील मुलींचे शिक्षण याविषयी  स्थानिकांमधे अनास्थाच आहे. सद्य परिस्थितीतील महिला आणि मुलींची स्थिती याचे पुरेसे बोलके चित्रण करतेच.

२०१४-१५ च्या पाकिस्तानच्या अधिकृत सांख्यिकीनुसार येथील साक्षरता दर ४३%असून महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण २५% एवढेच आहे. म्हणजे इतक्या अत्यल्प प्रमाणात महिलांना स्व- विकासाची संधी उपलब्ध आहे.
 

बलुचिस्तान प्रांतातील साक्षरता दर हा जगाच्या साक्षरता तुलनेत अवघा २%आहे आणि त्याचे दुष्परिणाम दुर्लक्ष करण्यासारखे नाहीतच!

 

या समस्येमागे केवळ शैक्षणिक किंवा सामाजिक कारण नसून  त्याला एक मानवतावादी आयामही आहे ज्याचे महत्व खचितच अविवाद्य आहे.

 

शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असून त्या त्या राज्याने आपल्या प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणे बंधनकारक आहे. मात्र बलुचिस्तान याला अपवाद ठरतो आहे!

 


शिक्षणविषयक योजना आणि साक्षरता दर वाढविण्यासाठीचे प्रयत्न शहरी भागात अधिक प्रमाणात होताना दिसत आहेत. बलुचिस्तानमधील ७५% लोकसंख्या ग्रामीण भागात एकवटलेली असूनही भलहान गावातील शाळांमधे सर्वेक्षणाचाही अभाव आहे. लांब पल्ल्यांची अंतरे,शाळांमधे संसाधनांचा अभाव आणि कार्यालयीन दिरंगाई या सर्वाच्या मुळाशी आहे. दिवसेंदिवस मुलींचे शालाबाह्य होणे याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण विकास आणि मानसिकता कुंठित होण्यावरही झालेला दिसून येतो आहे.
 

ही समस्या आणखी एका समस्येला जन्म देते. आदिवासी जनजातीत मुलीच्या लग्नाचे वय तेरा वर्ष आहे. पण या समस्येमुळे त्यापेक्षाही लहान वयात मुलींचे विवाह होत आहेत आणि त्यातून उद्भवणारी अल्पवयीन  माता आणि बालकांचे मृत्यू ही समस्या सामाजिक आरोग्य अधिकच कलुषित करते आहे.

 

बलुचिस्तानची भौगोलिक स्थिती पूर आणि दुष्काळ या दोन्ही नैसर्गिक आपत्तींना जन्म देणारी आहे. अशा परिस्थितीचा विचार करता उद्भवणार्‍या वेगवेगळ्या समस्यांमधून या प्रांताला वाचवायचे असेल आणि शाश्त विकास आणि समृद्धीकडे हा प्रांत न्यायचा असेल तर त्यासाठी दूरगामी शाश्वत आणि ठोस योजना करून त्यांची कार्यवाही होणे ही काळाची गरज आहे.

 

हा फक्त सामाजिक तिढा सुटण्याचा उपाय नाही.भूतकाळात अनेक आयुष्य पणाला लागली आहेतच. पण त्या अनुभवातून शहाणे होऊन मानवतावादी दृष्टीकोनातून अनेक निरपराध कोवळ्या कळ्यांचे आयुष्य वाचविणे याकडे आवर्जून लक्ष देण्याची आणि कार्यान्वित होण्याची आवश्यकता दुर्लक्षून चालणारच नाही.