मोदींच्या अरुणाचल प्रदेश भेटीला चीनचा विरोध. भारताने दिले सडेतोड उत्तर.
         Date: 10-Feb-2019

मोदींच्या अरुणाचल प्रदेश भेटीला चीनचा विरोध. भारताने दिले सडेतोड उत्तर.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवेदनशील सीमावर्ती भागातील भेटीला चीनने कडाडून विरोध केल्यानंतर अरुणाचल प्रदेश भारताचे "अखंड आणि अविभाज्य " अंग असल्याचे भारताने ठणकावून सांगितले आहे.

 

पंतप्रधान मोदींच्या भेटीविषयी नापसंती दर्शविताना चीनने म्हटले आहे की संवेदनशील सीमाप्रश्न त्यांनी विचारात घेतला नाहीय आणि त्याचमुळे भारताने सीमाप्रश्नी होणारी कोणतीही गुंतागुंत टाळली पाहिजे. त्यांच्याकडून कोणतीही अशी कृती घडता कामा नये ज्यामुळे सीमाप्रश्न चिघळेल.

 

 

 

चीनच्या या टीकेला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून आम्ही अनेक वेळा चीनला हा संदेश पोचविला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाने चीनला सांगितले आहे. "भारतीय नेत्यांनी वेळोवेळी अरुणाचल प्रदेशला भेट दिली आहे. भारताच्या इतर भागात जसे ते भेट देतात तशीच ही पण भारताच्याच एका राज्याला दिलेली भेट आहे. अनेक वेळा आम्ही हे चीनच्या निदर्शनास आणून दिले आहे." असे एमईए प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.
 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल अरुणाचल प्रदेशातील ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पाचे उदघाटन करून त्याचा पाया रचला. " सीमेवरील राज्यांशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठीच त्यांचे सरकार खूप झटत आहे. अरुणाचल प्रदेशात राजमार्ग, रेल्वे, हवाईमार्ग आणि ऊर्जा क्षेत्र यांचे महत्त्व ओळखून आमचे सरकार त्यावर काम करीत आहे. ज्याकडे या पूर्वीच्या सरकारने संपूर्ण दुर्लक्ष केले होते," असे त्या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले.

 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांनी मोदींच्या भेटीबाबत म्हटले," चीन-भारत सीमाप्रश्नावर चीनची भूमिका कायमच स्पष्ट आहे. तथाकथित "अरुणाचल प्रदेश" आम्ही जाणत नाही. चीन- भारताच्या पूर्वेकडील सीमावर्ती भागात भारतीय नेत्यांच्या भेटीला आमचा सक्त विरोध आहे."

 

"दोन्ही देशांच्या हिताकडे भारताने लक्ष द्यावे, त्यांचा आदर करावा, द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी चीनच्या बाजूने थोडा विचार करावा आणि सीमाप्रश्न अधिक चिघळेल अश्या कोणत्याही कृत्यापासून भारताने लांब रहावे," असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर पोस्ट केलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे.

 

अरुणाचल प्रदेशचा ईशान्य भाग हा दक्षिणी तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. सीमेवरील तंटा दूर करण्यासाठी आतापर्यंत भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या २१ फैरी झडल्या आहेत.

 

भारत-चीन सीमा विवाद हा ३,४८८ किलोमीटरच्या भूभागासाठी आहे. त्यावर आपले अधिपत्य आहे हे दाखविण्यासाठी चीन कायमच अरुणाचल प्रदेशला भारतीय नेत्यांनी भेट देण्यावर आक्षेप घेत आला आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: Indian Defence News

China 'firmly opposes' PM Modi's Arunachal visit; India hits back.