नियंत्रण रेषेवरील कुंपण कापण्यावरून ​पाकिस्तानात परत एकदा भितीचं सावट
         Date: 19-Dec-2019
नियंत्रण रेषेवरील कुंपण कापण्यावरून ​पाकिस्तानात परत एकदा भितीचं सावट
भारताकडुन  "वेपनाईज्ड डिसिनफॉर्मेशन" चा परिणामकारक वापर 
(ICRR Af-Pak) 
 
भारत-पाकिस्तानमधील तात्पुरत्या नियंत्रण रेषेवरील कुंपण भारताने ५ ठिकाणी हटवण्यास सुरुवात केल्याच्या बातम्यांमुळे पाकिस्तानात खळबळ. पाकिस्तानी विदेश मंत्री संयुक्त राष्ट्रसंघाच्या दारात...
 
LoC fencing cutting India
 
मोदी- शहा जोडीने जगात आणि देशात कुणालाही नं जुमानता ५ ऑगस्टला काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० आणि ३५-अ ला केराची टोपली दाखवल्याने आणि त्यानंतर आगडोंब उसळेल, रक्ताच्या नद्या वाहतील, भारत-पाकिस्तान युद्ध होईल, जगात भारत एकटा पडेल वगैरे वगैरे वर्तवलेल्या शक्यतांपैकी काहीही नं झाल्याने भारतीय नेतृत्व काहीही करेल ही भिती सर्वत्र व्यापलेली आहे. त्यात भर म्हणुन भारतीय गृहमंत्री अमित शहा यांची गेल्या काही दिवसातील विधाने आणि सेनाप्रमुख जनरल रावत यांचं कालचं विधान यामुळे बातम्या- अफवांचा बाजार सध्या तेजीत आहे.
 
 
कॅब बिलावरील चर्चेच्या वेळी अमित शहा यांनी संसदेत परत परत १३० किमी लांबीच्या भारत- अफगाणिस्तान सीमेचा उल्लेख केला. ही सीमा सध्याच्या भारतात नसुन पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान आहे. शहा यांनी पाकव्याप्त भारताचाच आहे आणि तो भारताच्या भौगोलिक सीमेत आला पाहिजे याचा पुनरुच्चार केला. त्यानंतर एका टीव्ही मुलाखतीत शहा त्यांनी एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात पाकव्याप्त काश्मीर आम्ही ताब्यात घेऊ पण कधी हे सांगण्याची टीव्ही स्टुडीओ ही जागा नाही, पण तो ताब्यात घेतल्यावर तुम्हाला कळेलच असं विधान करून नव्या चर्चेला सुरुवात करून दिली.
 
 
मग सेनाप्रमुख जनरल रावत यांनी नियंत्रण रेषेवर वातावरण तणावपुर्ण असुन तिथे कधीही भडका उडू शकतो असं विधान केल्याने शहा यांच्या विधानावरील चर्चा एका वेगळ्या पातळीवर गेल्या. तसं बघता प्रत्यक्ष कारवाई ज्या सैन्याला करायची असते ते असं बोलुन दाखवण्याची शक्यता कमी असते. पण मग या दोन जबाबदार लोकांच्या बोलण्याचा अर्थ काय निघत असावा?
 
 
भारताचं सायकॉलॉजिकल वॉर आणि पाकिस्तानात उडालेला गोंधळ...
 
काल रात्रीपासुन पाकिस्तानी सोशल मिडीया आणि टीव्ही चॅनल्स नियंत्रण रेषेवरील बातम्या सातत्याने प्रसारित करत आहेत. आज काही पाकिस्तानी चॅनल्सनी प्रसारित केलेल्या बातम्यात भारताने नियंत्रण रेषेवरील ५ ठिकाणी काटेरी तारांचं कुंपण पुर्णपणे काढुन टाकल्याच्या बातम्या छापल्या आहेत. काश्मीर आणि नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी सध्या बर्फ पडायची सुरुवात झाल्याने आणि वातावरण अत्यंत प्रतिकुल असल्याने कोणत्याही प्रकारची सैनिकी कारवाई जवळपास अशक्य आहे. त्याशिवाय पाकिस्तानी सेना आणि गुप्तचर संस्था आयएसआय आपापसात मारामाऱ्या करत असताना, भारताने हल्ला करुन त्यांना एकत्र आणण्याची काहीही गरज दिसत नाही. पण भारतीय नेते गेले काही महीने सातत्याने पाकव्याप्त काश्मीर आमचा आहे आणि तो आम्ही नक्की परत घेऊ अशा अर्थाची जाहीर विधाने करत आहेत. याच्या मागे पाकीस्तानावर मानसिक दबाव वाढवुन व्याप्त काश्मीरमध्ये आपली सैन्य तैनाती बारा महीने ठेवायला लावायची रणनीती असु शकते.
 
 
व्याप्त काश्मीर संदर्भात भारतीय धमक्यांनी काय साध्य होईल?
 
पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश आधुनिक रणगाडा युद्धाला (Armored Warfare) तितकासा अनुकुल नाही, आणि आर्मर्ड युद्धाशिवाय गती आणि लवकर परीणाम हातास लागणं कठीण आहे. मग भारत परत परत अशी विधाने का करत असावा? यामागील कारण असं असु शकतं....
 
 
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची भाषा परत परत उच्चारल्यावर पाकिस्तानला आपली सेना मोठ्या संख्येने आणि युद्धसज्ज स्थितीत तिथे तैनात ठेवावी लागेल. सध्याच्या भीषण बर्फवृष्टी आणि प्रतिकुल हवामानात पाकिस्तानने बालाकोट नंतर पाकिस्तानने व्याप्त काश्मीरमध्ये तैनात केलेलं सैन्य मागे घ्यायची सुरुवात केल्याची बातमी आल्यावर भारताने अशी विधाने केली असावीत जेणेकरून पाकीस्तान आपली सैन्य तैनाती कमी नं करता उलट वाढवेल आणि आधीच दुबळ्या अर्थव्यवस्थेवर आणखी दबाव येईल.
 
 
नियंत्रण रेषेवर भारताने खरंच कुंपण हटवलं असेल का?
 
 
काही पाकिस्तानी चॅनल्स म्हणत आहेत त्याप्रमाणे भारताने नियंत्रण रेषेवरील कुंपण ५ ठिकाणी हटवलं आहे आणि पाकिस्तानी विदेशमंत्री भारताने मोठ्या संख्येने टॅंक आणि मिसाईल बॅटरीजसह युद्धसामग्री नियंत्रण रेषेवर जमा केली आहे असा आरोप केला आहे. यापैकी कुंपण हटवणं सहज शक्य आहे (किंवा कदाचित हटवलंही असेल), पण याचा अर्थ लगेच भारत युद्ध करेल असा होत नाही. याचा तात्काळ परिणाम म्हणुन पाकिस्तान आपल्या सैन्याची उलट-सुलट, वाकडी-तिकडी हालचाल करेल. अशा सैन्याच्या हालचालीत एका दिवसात कोट्यावधी रुपयांचा चुराडा होतो. हा खर्च सध्याच्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला परवडणारा नाही. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला आणि अर्थव्यवस्थेला सतत दबावाखाली ठेवण्याचा हा प्रयत्न असु शकतो. अन्यथा भारतात सध्या कॅब विषय ज्वलंत असताना आणि त्यावर मुलाखत चालु असताना शहांना मधेच व्याप्त काश्मीर जिंकणं वगैरे आणण्याचं काम काय असा प्रश्न पडतो. अशाप्रकारच्या अफवांना वेपनाईज्ड डिसिनफॉर्मेशन म्हणतात. आणि बऱ्याच वेळा यातुन अपेक्षित परिणाम मिळतात.
 
 
पाकिस्तानी सेना आणि आयएसआय संघर्षावरुन पाकिस्तानी प्रजेचं लक्ष हटवण्याचा प्रयत्न....
 
 
काही दिवसांपुर्वी पाकिस्तानी सैनिकी न्यायालयाने निवृत्त आयएसआय अधिकारी ब्रिगेडियर रिझवान याला हेरगिरीवरून फासावर चढवलं. त्यानंतर लगेच पाकिस्तानी सेनाप्रमुख जनरल बाजवा याना मिळालेली मुदतवाढ पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली. कोणतेही पाकिस्तानी न्यायालय आयएसआयच्या सक्रीय मदतीशिवाय असा निर्णय देणं पुर्णपणे अशक्य आहे. नंतर माजी अध्यक्ष आणि सेनाप्रमुख जनरल मुशर्रफ याना न्यायालयाने फाशीची शिक्षा घोषित केली. यावर पाकिस्तानी सेनेने अत्यंत आक्रमक आणि तिखट प्रतिक्रिया दिली. यावरुन आयएसआय आणि पाकिस्तानी सेना यांच्यात भयंकर शीतयुद्ध चालु आहे या तर्काला बळकटी मिळत आहे. आणि या सर्व संघर्षामुळे पाकिस्तानची जनता कमालीची अस्वस्थ आहे. म्हणुन या मुद्दयावरून प्रजेचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी नियंत्रण रेषा, भारताची भीती, कॅब आदी मुद्द्यांवरुन पाकिस्तान नेते बोंबाबोंब करत असावे ही एक शक्यता आहे.
 
 
प्रत्यक्षात काय होतंय काही दिवसात कळेलच, पण यापुढे भारताने "काहीतरी" करायचं आणि त्याला पाकिस्तानने फक्त आपला "रिस्पॉन्स" ठरवायचा एवढंच त्यांच्या हातात आहे, ही नवी वास्तविकता जगासमोर आली. यापुर्वी ७० वर्षे पाकिस्तान सतत उचापती करायचा आणि भारत जगभर तक्रार करत फिरायचा हे चित्र यापुढे दिसणे नाही!
 
 
नेमकं चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागेल, पण आतातरी भारत " वेपनाईज्ड डिसिनफॉर्मेशन" परिणामकारक पद्धतीने वापरताना दिसत आहे.
 
 
 
 
(ICRR Af- Pak)