Date: 29-Jan-2019 |
गल्फ मध्ये स्पायवेअर खरेदी करण्यासाठी चुरस.
सोशल मीडियावर अथवा इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याविरुद्ध घडणाऱ्या घटनांवर पाळत ठेवण्यासाठी सायबर सर्व्हेलन्स हे एक उत्तम शस्त्र गल्फला मिळाले आहे. साधारणपणे सायबर स्पायवेअर अरबांच्या हाती २०११ मध्ये पडले ज्याद्वारे सोशल मीडियाचा वापर करून विरोधक कश्याप्रकारे आपल्या चळवळीसाठी लोकांना प्रवृत्त करतात आणि निदर्शनांसाठी कसे समन्वय साधतात याचा उलगडा त्यांना झाला.
त्याचमुळे संरक्षण आणि स्पायवेअर आयुधे बनविणाऱ्या कंपन्यांनी गल्फ शासनाला सर्वात अत्याधुनिक सायबर सर्व्हेलन्स टेक्नाॅलाॅजी विकली आहेत. युके बीएई सायबर सर्व्हेलन्स कंपनीच्या दानिश शाखेने सौदी अरेबिया, युएई, कतार आणि ओमान यांना मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. तसेच या विक्रीस दानिश सरकारकडून मंजुरी मिळाली आहे असे जून २०१७ मध्ये बीबीसीने केलेल्या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.
सौदी अरेबिया आणि युएईला विकल्या गेलेल्या सर्व्हेलन्स सिस्टिम ला एविडेंट असे म्हणतात. ही अशी सिस्टिम आहे जिच्यामुळे सरकार इंटरनेटवरील कोणत्याही गोष्टीवर नजर ठेवू शकते. ही सिस्टिम लोकांचे लोकेशन शोधू शकते तसेच त्यांच्या मोबाईलवरील संशयास्पद ऍप्लिकेशन्स डिकोड करू शकते.
विक्री संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने नक्की काय विचार केलाय हे उघड करण्यास सॅम्युलसन यांनी नकार दिला. बिझनेस करणे आणि दहशतवाद नष्ट करणे याच महत्त्वाच्या बाबी असणार असे तज्ज्ञांचे मत आहे.
या सिस्टिमचा वापर करून अनेक मानवाधिकार कार्यकर्ते गायब करण्यात आले आहेत. मनाल अल-शरीफ या वूमन राईट आक्टिविस्ट ने सांगितले की विरोधक एकमेकांना "भिंतीलाही कान असतात" असं सांगून सावध करायचे परंतु आता मात्र गल्फ स्टेट मधील लोक एकमेकांना "स्मार्टफोनला कान आहेत" असे सांगतात.
"कोणताही देश गल्फ प्रमाणे आपल्या नागरिकांना वागवत नाही. गल्फ सरकारकडे चिक्कार पैसा आहे त्यामुळे ते आधुनिक सर्व्हेलन्स सॉफ्टवेअर खरेदी करू शकतात," असं मनाल अल-शरीफ ने सांगितले.
जरी एकमेकांशी औपचारिक राजनैतिक संबंध नसले तरी सुद्धा डेन्मार्क व्यतिरिक्त हे गल्फ देश इस्राएल कडूनही अत्याधुनिक सर्व्हेलन्स सिस्टिम खरेदी करीत आहेत.
इस्राएलच्या एनएसओ ग्रुप कडून बनविण्यात आलेली पेगासस ही मोबाईल फोन सर्व्हेलन्स सिस्टिम इस्राएल कडून बहरीन, सौदी अरेबिया आणि युएई यांनी खरेदी केली आहे.
एनएसओचा जगात वेगाने प्रसार होत आहे. मानवाधिकारांची पायमल्ली होण्याचे संकेत स्पष्टपणे मिळत आहेत. कमीतकमी सहा देश पेगाससचा गैरवापर करण्यात पूर्णपणे गुंतले आहेत.
ऑगस्ट २०१८ मध्ये द न्यूयॉर्क टाइम्सने सगळ्यात मोठा घोटाळा उघड केला आहे. युएई ने पेगाससचा वापर करून कतारचा सर्वेसर्वा, सौदी प्रिन्स आणि अरब वर्तमानपत्राचा संपादक यांच्यावर पाळत ठेवल्याची ई-मेल प्राप्त केली होती. हा प्रकार तेव्हा बाहेर आला जेव्हा एनएसओ ग्रुपने यूएईला त्यांचे स्पायवेअरचे महागडे कंत्राट सुरूच ठेवण्याची विचारणा केली. कोणतेही वचन देण्याआधी अमिरातीच्या लीडरनी एनएसओ ग्रुप ला एक ई-मेल केली त्यात त्यांनी या तीन लोकांवर तुम्ही पाळत ठेऊ शकाल का अशी विनंती केली. "प्लीज तुम्हाला केलेल्या ई-मेल मधली दोन रेकॉर्डिंग पहा," असे कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले. हीच ती ई-मेल जी न्यूयॉर्क टाईम्सला सापडली आणि सगळा मामला समोर आला.
अबुधाबी सुद्धा इस्राएलची 'फाल्कन आय' नावाची सर्व्हेलन्स सिस्टिम वापरत आहे. या सिस्टिममुळे अमिराती सरकारला देशातील प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले आहे. 'फाल्कन आय' हे कामाचे तसेच वर्तणुकीचे वर्गीकरण करून त्याप्रमाणे रेकॉर्डस् बनविते आणि त्यांचे विश्लेषण करते. अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकांना विश्वासात घेण्याऐवजी अमिरात आता स्वतःचाच स्पायवेअर विकसित करीत आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये अबुधाबी स्थित सायबर सिक्युरिटी कंपनी डार्क-मॅटरच्या सीईओ ने सांगितले की त्यांची कंपनी लवकरच देशाच्या सेवेत स्वतंत्रपणे कार्यरत होईल.
पण हे अर्धसत्य आहे. डार्क मॅटर कंपनीचे जवळपास ८०% ग्राहक हे अमिरात सरकारचे आहेत. गल्फ हॅकर्सचे असे म्हणणे आहे की या कंपनीमध्ये स्वतःच्या नागरिकांवर पाळत ठेवण्याची तितकीशी कुशलता नाही.
एक इटालियन सुरक्षा तज्ज्ञाने मिडल इस्ट आयला सांगितले की ही कंपनी संयुक्त अरब अमीरातच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करते. माजी हॅकर सिमोन मार्गारिटेल्ली यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी या कंपनीसाठी त्याची मुलाखत झाली होती. तेव्हा त्याला सांगण्यात आलेले होते की युएई एक सर्व्हेलन्स सिस्टिम बनवीत आहे जी आयपी, २जी, ३जी, आणि ४जी नेटवर्कचे ट्रॅफिक बदलू शकेल किंवा सुधारू शकेल किंवा वळवू शकेल. मार्गारिटेल्लीला या कामासाठी टॅक्स फ्री १५००० डॉलर्स पगार देण्यात येणार होता पण त्याने नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार करून यासाठी नकार दिला.
देश विदेशातील विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी स्पायवेअरचा वापर केल्याबद्दल सौदी देखील कुप्रसिद्ध झालेच आहे. इटालियन स्पायवेअर हॅकिंग टीम कडून सर्व्हेलन्स आणि हॅकिंग सिस्टिम्स खरेदी करण्यासाठी सौदीने अमाप पैसा ओतला आहे. लीक केलेल्या इमेलमध्ये सौदीने या हॅकिंग टीमला जवळपास ५ दशलक्ष युरो दिल्याचे उघड केले आहे.
गल्फ मधील स्पायवेअर खरेदी करण्याची चुरस बघता मानवाधिकार संस्था आणि काही पाश्चिमात्य देशांना काळजी वाटू लागली आहे. या पेगासस सॉफ्टवेअरची शिकार झालेल्यामध्ये अम्नेस्टी इंटरनॅशनलचा समावेश आहे. या मानवाधिकार संस्थेने सरकारवर आणि विशेषतः इस्राएलवर या स्पायवेअर कंपन्यांवर बंदी आणण्यासाठी दबाव आणला आहे. परंतु इस्राएलच्या संरक्षण मंत्रालयाने हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. त्यामुळे आता या गटांना कायदेशीर कारवाई करावी लागणारसे दिसते.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: fanack
The Race to buy Spyware in the Gulf.