Date: 23-Jan-2019 |
अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने त्यांच्या F-16 विमानांच्या काही भागांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव भारताला दिला आहे. २० बिलियन डॉलर्सचा हा प्रस्ताव आहे. या निर्मितीचा प्रस्ताव भारतालाच देण्यामागे त्यांना भारताकडून मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानांची ऑर्डर मिळविणे हाच उद्देश आहे असे विश्वसनीय वृत्तांकडून समजते.
भारताला लष्करी उपकरणे पुरविण्याच्या स्पर्धेमध्ये अमेरिका सुद्धा आहे. बोईंग F/A-18, साब ग्रीपेन, राफेल, युरोफायटर टायफून आणि रशियन विमाने यांच्याशी अमेरिकेची स्पर्धा आहे. भारत कोणाला आणि किती ऑर्डर देणार यावर खूप चुरस सुरु आहे. नुकतेच भारताने रशिया सोबत ११४ लढाऊ विमानांचा १५ बिलियन डॉलर्सचा करार केला आहे.
लॉकहीडचे रणनीती आणि व्यवसाय वृद्धी उपाध्यक्ष विवेक लाल यांनी राऊटर्स ला सांगितले की आमची कंपनी भारताला F-16 चे जागतिक उत्पादन केंद्र बनवेल ज्यायोगे फक्त भारतातीलच लष्करी गरज नव्हे तर परदेशातील सुद्धा गरज भारत पुरवू शकेल.
"आम्हाला २०० पेक्षा जास्त विमानांची मागणी परदेशातून आली आहे. त्यांची सर्वसाधारण किंमत २० बिलियन डॉलर पेक्षा नक्कीच जास्त आहे. बहरीन आणि स्लोव्हाकिया यांनी भारताला ऑफर केलेल्या F-16 ची ७० विमाने घेतली आहेत. आमची बुल्गारिया आणि इतर १० देशांशी या संदर्भात चर्चा सुरु आहे. F-16 ला चांगले दिवस आले आहेत असेच म्हणता येईल," लाल यांनी माहिती दिली.
पुढील काही महिन्यातच भारताचे संरक्षण मंत्रालय या संदर्भात हवाई दलाशी सल्लामसलत करून या प्रस्तावावर निर्णय घेईल.
भारतीय लष्कराने ४२ स्क्वाड्रन जेट विमाने, ७५० च्या आसपास लढाऊ विमाने यांची मागणी केली आहे. लवकरच १९६० मध्ये वापरात आणलेले रशियन मिग-२१ वायुसेनेतून निवृत्त होईल. त्या नंतर २०३२ पर्यंत ४२ पैकी २२ स्क्वाड्रन जेट सेवेत रुजू होतील असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
फोर्ट वर्थ टेक्सास येथे असलेला F-16 चा कारखाना स्थलांतरित करण्यात येईलच. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतच उत्पादन होईल हा हट्ट सुद्धा याचे स्थलांतर रोखू शकणार नाही. टेक्सास येथील कारखाना अमेरिकेच्या वायुसेनेमधील फिफ्थ जनरेशन F-35 जॉईंट स्ट्राईक लढाऊ विमानांचे उत्पादन करतो.
जरी F-16 चे उत्पादन भारतात हलविले तरी "मेक इन इंडिया" आणि "मेक अमेरिका ग्रेट अगेन" या मोदी आणि ट्रम्प यांच्या दोघांच्याही स्वप्नाला कसलाही धोका पोहोचणार नाही कारण या विमानाचे काही काम हे अमेरिकेत सुद्धा केले जाणार आहे. अशी लाल यांनी माहिती दिली.
"मला वाटते की हे एकमेकांस पूरक आहे. अमेरिका आणि भारत यांच्या सहयोगानेच उत्पादन चालू राहील. दोन्ही देशांमध्ये याचे भाग बनतील आणि उत्पादन स्थलांतरित केलं गेलं तरी या उत्पादनासंदर्भात आवश्यक ती सर्व कारवाई अमेरिकेकडून केली जाईल."
लाॅकहिडने टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिमला त्यांच्या या F-16 साठी भागीदार म्हणून निवडले आहे. त्यांना खात्री आहे की या दोघांच्या भागीदारीमुळे भारतीय वायुसेनेला नवीन आयाम मिळेल.
-प्राची चितळे जोशी.