अमेरिकेकडून मिळालेल्या निधीचा पाकिस्तानकडून दुरुपयोग.
         Date: 16-Jan-2019
अमेरिकेकडून मिळालेल्या निधीचा पाकिस्तानकडून दुरुपयोग.
 

आम्ही दिलेल्या निधीचा सदुपयोग करण्यात पाकिस्तानला अपयश आले असल्याचा आरोप अमेरिकेचे पाकिस्तानातील माजी राजदूत कॅमरून मुन्टर यांनी केला आहे.

 

अमेरिकेने माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या कारकिर्दीत दहशतवाद थांबविण्यासाठी पाकिस्तानला निधी दिला होता असे परराष्ट्र संबंधावर कराची काउन्सिलने आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना मुन्टर यांनी सांगितले.

 

जर डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांची भेट घडू शकली तर ते दोघे कदाचित यावर काही मार्ग काढू शकतील. परंतु त्यांची ही भेट जर आणि तर वर अवलंबून आहे.

 

 

 

दोन जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाण शांतता चर्चेसाठी पाकिस्तानची मदत लागणार असल्याचे बोलून दाखवले होते. अमेरिका अफगाणांशी चर्चा करण्याची इच्छा बाळगून आहे आणि त्या साठी त्यांना इम्रान खान यांना भेटावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 

" ट्रम्प आणि खान यांना राजकारणाचे उत्तम ज्ञान असल्याकारणाने ते दोघे सत्तेवर आहेत. त्यांनी लोकांची नाडी अचूक ओळखली आहे. आणि ते आपल्या बोटाच्या इशाऱ्यावर जे हवं ते मिळवू शकतात. " असे विधान मुन्टर यांनी कराची परिषदेत केले.

 

अमेरिकेला पाकिस्तानला आर्थिक मदत करावयाची इच्छा आहे. यूएस ने आतापर्यंत सिंध आणि बलुचिस्तान या प्रदेशांना शैक्षणिक मदत केली आहे. परंतु या मदतीचा दुरुपयोग केला गेला असेही ते म्हणाले.

 

"पाकिस्तान विकासकामांवर लक्ष केंद्रित करीत आहे. पण आता त्यांनी सुशासनावर सुद्धा लक्ष दिले पाहिजे. अमेरिकेने दिलेल्या निधीचा उचित वापर पाकिस्तानने करणे गरजेचे आहे. अमेरिकेला पाकिस्तानसोबतचे संबंध दृढ करण्याची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी शिक्षण क्षेत्राला मदत करण्याच्या हेतूने त्यामध्ये गुंतवणूक देखील केली आहे." मुन्टर म्हणाले.

 

कराची आणि मुंबई ही दोन शहरे अमेरिकेच्या दृष्टीने आर्थिक केंद्रे आहेत. याचमुळे भारत आणि पाकिस्तानशी उत्तम संबंध ठेवणे अमेरिकेला गरजेचे वाटते. कोणताही प्रश्न युद्ध करून सुटणार नाही. त्याचमुळे आम्ही अनेक देशांशी आमच्या क्षमतेप्रमाणे चर्चा करून प्रश्न सोडविण्यावर भर देतो. भारत, रशिया आणि चीन यांच्याशी देखील आमच्या वाटाघाटी सुरूच आहेत. पाकिस्तान बरोबर अमेरिकेचे संबंध कायमच अनिश्चित राहिले आहेत. सद्यपरिस्थितीत अमेरिकेला असे वाटत आहे की दहशतवादाविरोधात अमेरिकेने जे युद्ध आरंभले आहे त्यामध्ये मदत करण्याची पाकिस्तानची इच्छा नाही.

 

मुशर्रफ यांची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर अमेरिकेला वाटत होते की दोघांमधील संबंध संतुलित राहतील. अमेरिका कायमच स्वतःच्या फायद्यासाठी पाकिस्तानला जवळ करते आणि काम झाल्यानंतर सोडून देते असा गैरसमज पाकिस्तानात पसरला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

रणनितिक स्तरावर पाकिस्तान लष्कराशी अमेरिकेचे संबंध "किमती आणि महत्त्वाचे" आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या क्षमतेमुळेच अमेरिका त्यांचा चांगला मित्र बनला आहे. २०१० साली पाकिस्तानात आलेल्या पुरामध्ये अमेरिकेने केलेल्या मदतीचा त्यांनी उदाहरणादाखल उल्लेख केला. त्या पुरावेळी मदतीकरिता पीपीपी सरकारला मदतीकरिता न बोलावता अमेरिकेने पाकिस्तानी लष्कराला बोलावले होते.

 

दरम्यान, फेडरल मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग फवाद चौधरी यांनी अमेरिकेच्या माजी राजदूतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की," पाकिस्तान- अमेरिका संबंधांची खोली कॅमरून मुन्टर यांना कळलेली नाही. मुन्टर यांना निवृत्त होऊन अनेक वर्षे झाली आहेत. सध्याच्या घडामोडींबद्दल ते अनभिज्ञ आहेत."

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: THE EXPRESS TRIBUNE

Pakistan misused funds given by US.