काश्मीर खोऱ्यातील चिनाब नदीवर बांधला जातोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल.
         Date: 29-Dec-2018

काश्मीर खोऱ्यातील चिनाब नदीवर बांधला जातोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल.

 

लवकरच जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात जास्त उंचीचा रेल्वे आर्च पूल बांधून पूर्ण होणार आहे. रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी या दोन ठिकाणांना जोडणारा हा पूल भारतीय रेल्वेच्या 'जम्मू-उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लाईन' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यास उधमपूरला जोडणाऱ्या मेगा प्लॅनचाच एक भाग आहे. पूर्णत्वास पोहोचल्यानंतर ३५९ मीटर उंचीचा चिनाब नदीवरील हा पूल संपूर्ण जगातील सर्वात जास्त उंचीचा रेल्वे पूल म्हणून नावाजला जाणार आहे. याच्या पायाउभारणीचे काम २०१७ सालीच पूर्ण झाले असून सध्या याची कमान उभारण्याचे काम पूर्ण भरात सुरु आहे.

 

 

 

याच पुलावर वाहनांच्या दळणवळणासाठी १४ मीटर रुंदीचा दुहेरी मार्ग देखील असणार आहे ज्यावर मध्यभागी १.२ मीटर रुंदीचा कठडा असेल. या संपूर्ण पुलास १७ जोड असून कमानीची लांबी ४६९ मीटर असेल. पुलास भूभागाशी जोडण्यासाठी दोन्ही बाजूस ३६ मीटर रुंदीचे मार्ग बनविण्यात येतील. या पुलाच्या बांधकामात वापरण्यात येणारे स्टील हे कुठल्याही प्रकारच्या स्फोटास दाद न देणारे असून एखाद्या आपत्ती प्रसंगी तात्काळ मदत मिळणे शक्य व्हावे म्हणून रेल्वेतर्फे येथे ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम आणि वॉर्निंग सिस्टीम देखील बसविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी भारतीय रेल्वेस DRDO चे साहाय्य मिळत आहे.
 

'जम्मू-उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लाईन' मुळे जम्मू-काश्मीर मधील दळणवळण क्षेत्रात फार मोठी क्रांती होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची लांबी ३४५ किलोमीटर असून चिनाब नदीवरील हा पूल हा केवळ त्याचा एक हिस्सा आहे.

 

२७ डिसेंबरला भारतीय रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी ट्विट करून लवकरच या पुलाचे बांधकाम पूर्ण होत असल्याची घोषणा केली आहे.

 

चिनाब पुलाची काही ठळक वैशिष्टये-

अधिक सुरक्षिततेसाठी पुलाच्या बांधकामात स्फोट विरोधक स्टीलचा वापर.

पुलाची एकूण लांबी १३१५ मीटर (४३१४ फूट)

जमिनीपासून फलाटाची उंची ३५९ मीटर.

पुलाची रचना आणि उभारणीच्या कामात BS: 5400 चा मुख्य मार्गदर्शक नियमावली म्हणून वापर.

२६० किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाच्या वाऱ्यालाही भक्कम उभे राहण्याची क्षमता.

 

बांधून पूर्ण झाल्यानंतर हा पूल प्रत्यक्षात आयफेल टॉवर पेक्षाही अधिक उंचीचा ठरणार आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या बोगीबील पुलानंतर चिनाब नदीवरील हा पूल म्हणजे भारतीय रेल्वेच्या कार्यातील आणखी एक मैलाचा दगड ठरेल कारण जम्मू-काश्मीर मधील भौगोलिक परिस्थिती ही आसाममधील भौगोलिक परिस्थितीपेक्षा नक्कीच खूप वेगळी आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: INDIA TODAY

World's highest railway-arch bridge in J&K over river Chenab.