Date: 28-Dec-2018 |
'धनुष' ची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर.
नोव्हेंबरमध्ये अमेरिकन बनावटीच्या M-777 आणि कोरियन बनावटीच्या K-9 वज्र या दोन तोफांचा भारतीय लष्करात समावेश झाल्यानंतर आता लवकरच भारतीय बनावटीच्या 'धनुष' या तोफेचा आपल्या लष्कराच्या ताफ्यात प्रवेश होणार आहे. स्वीडिश बनावटीच्या बोफोर्स तोफांचा भारतीय अवतार असे या तोफांना म्हणता येईल. परंतु धनुष तोफा पूर्वीच्या बोफोर्स तोफांच्या तुलनेत अधिक अंतरावर मारा करण्यास सक्षम असून त्यात अत्याधुनिक उपकरणेही बसविण्यात आलेली आहेत.
अंतिम निवड प्रक्रियेपूर्वी होणाऱ्या चाचण्यांमध्ये या तोफेने ५००० गोळे डागणे गरजेचे होते, तसेच तीन वेळा तांत्रिक बिघाड व सीबीआय चौकशीमुळे या सर्व प्रक्रियेस विलंब झाला. अर्थात अश्याच प्रकारचा तांत्रिक बिघाड हा M-777 आणि K-9 या तोफांबाबतीत देखील झाला होताच.
आता अंतिम निवडीसाठी केवळ जनरल स्टाफ क्वालिटी रिक्वायरमेंट्स (GSQR) इव्हॅल्युएशन होणे बाकी आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी च्या मते जानेवारीपर्यंत हे GSQR इव्हॅल्युएशन पूर्ण होऊन फेब्रुवारीपर्यंत या तोफा लष्करात समाविष्ट होण्यास हरकत नाही. नाशिकमधील देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरी येथे या समर्पण प्रक्रियेसाठी एका समारंभाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे ज्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
हॉव्हेत्झर तोफांची निर्मिती गन कॅरीएज फॅक्टरी (GCF) या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या (OFB) जबलपूर येथील केंद्रात होत आहे. ही देखील ऑर्डनन्स फॅक्टरीकडून निर्मिती करण्यात येणारी पहिलीच मोठी तोफ म्हणावयास हरकत नाही कारण आत्तापर्यंत OF ने केवळ लहान तोफांचीच निर्मिती केली आहे.
२०१० मध्ये सुरु झालेला हा निर्मिती प्रकल्प ८ वर्षांनंतर अखेर पूर्णत्वास पोहोचत आहे. देवळाली येथील समारंभात ६ तोफा लष्करात समाविष्ट होतील तर डिसेंबर २०१९ पर्यंत अजून १२ तोफा सामील होतील. पुढील वर्षात लष्करास एकूण ४८ १५५*४५ एमएम कॅलिबर तोफांची अपेक्षा आहे. यात १८ धनुष आणि ३० सारंग तोफा असतील. सारंग तोफांची निर्मिती जबलपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत होणार असून त्याबद्दलचा करार संमत झालेला आहे.
GCF ला धनुष तोफांचे अंतिम GSQR इव्हाल्युएशन होईपर्यंत थांबावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात निर्मितीचे आदेश मिळतील. अधिकाऱ्यांच्या मते आता केवळ औपचारिकता बाकी आहे. GSQR इव्हॅल्युएशन म्हणजे केवळ आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व चाचणी अहवालांचे एकत्रीकरण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
GCF कडून पुढील ३ वर्षात भारतीय लष्करास एकूण ११४ तोफा पुरविण्यात येतील. याच्याच धर्तीवर लष्कराकडून त्यांना अजून ४०० तोफा पुरविण्याचे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला सारंग तोफा ३०,४० आणि १०० च्या तुकड्यांमध्ये पुढील ३ वर्षात लष्करात समावेश करतील.
GCF ला आता निर्मितीप्रक्रियेस गती देण्यासाठी आता चांगलीच कंबर कसावी लागणार आहे. लवकरच भारतीय लष्कराकडून ८१४, १५५*५२ एमएम स्थिर तोफांच्या खरेदीसाठी कंत्राट केले जाण्याची शक्यता आहे. या कंत्राटासाठी खासगी कंपन्यांकडून करावी लागणारी खरेदी सुरु देखील झाली आहे. GCF कडून तंत्रज्ञान पुरवठा तत्वावर ही निर्मिती करण्यात येईल.
धनुष तोफेची पहिली चाचणी २०१३ मध्ये पार पडली होती ज्यात तोफेचा गोळा हा त्याच्या आवरणाच्या आतच फुटला होता. त्यानंतर अनेक यशस्वी चाचण्या पार पडल्यानंतर पुन्हा २०१७ मध्ये एक चाचणी अयशस्वी ठरली होती. या सर्वामुळे या प्रकल्पास नियोजित कालावधीपेक्षा जास्त वेळ लागला. परंतु आतापर्यंत या तोफेने ५००० पेक्षा अधिक वेळा तोफगोळे डागले आहेत. तुलना करता युद्धकाळात सुद्धा इतके तोफगोळे डागले जात नाहीत. त्यामुळे आता इतक्या चाचण्यांनंतर आता हे स्पष्ट झालेले आहे की या तोफांमध्ये आता कोणताही तांत्रिक बिघाड राहिलेला नसून त्या पूर्ण क्षमतेनुसार कार्य करण्यासाठी सिद्ध आहेत.
युएसकडून खरेदी करण्यात आलेल्या M-777 या तोफांच्या पहिल्या तुकडीतील एका तोफेच्या बाबतीतही असाच बिघाड अनुभवास आला होता. परीक्षण केले असता धनुष तोफेतील बिघाडाच्या कारणाशी साधर्म्य दर्शविणारी कारणेच समोर आली होती. इतकेच काय तर भारतास पुरविण्याआधी कोरियन लष्करात वापरल्या जात असलेल्या K-9 या कोरियन तोफेतही अश्याच प्रकारचा बिघाड आढळून आला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार इतर कोणत्याही तोफेस भारतीय लष्करात प्रवेश मिळविण्याआधी ५०० वेळा गोळे डागणे गरजेचे असते मात्र धनुष'ला हेच काम ४,९९४ वेळा करावे लागले.
एका तोफेच्या निर्मितीसाठी चिनी कंपनीकडून काही सुटे भाग खरेदी केल्यामुळे मागील वर्षात जुलै ऑगस्ट महिन्यात GCF ला सीबीआय चौकशीस सामोरे जावे लागले होते. हे सुटे भाग म्हणजे तोफेचा बॅरल ज्यावर फिरतो ते बेअरिंग होते. GCF ने निविदा प्रक्रियेतून निवड झालेल्या एका दिल्लीतील कंपनीकडून ही खरेदी केली होती परंतु चौकशीदरम्यान त्या कंपनीने ही बेअरिंग्स चीन मधून खरेदी केल्याचे समोर आले होते. भारतीय लष्करास सुपूर्द करण्यात येणाऱ्या पहिल्या सहा तोफांमध्ये हेच बेअरिंग बसविण्यात आलेले आहे. अजूनपर्यंत या बेअरिंगमध्ये कोणताही दोष आढळून आलेला नाही. या बेअरिंग चे मूळ उत्पादक Rothe Erde या जर्मन कंपनीने शस्त्रास्त्रांवरील एका आंतरराष्ट्रीय कराराचा दाखला देत या बेअरिंग्सचा पुरवठा करण्याचे नाकारले होते परंतु सरतेशेवटी त्यांचा विचार बदलला असून आता ते आपणास या बेअरिंग्सचा पुरवठा करावयास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitorig Desk)
Source: TOI
Wait for Dhanush.