Date: 26-Dec-2018 |
अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार.
रविवारी भारताने अग्नी-4 या आपल्या सक्षम परमाणू घेऊन जाणाऱ्या लॉन्ग रेंज बॅलेस्टिक मिसाईलची आणखी एक चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली.
४००० किलोमीटरचा पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या सरफेस टु सरफेस मिसाईलची चाचणी अब्दुल कलाम बेटावरील एकीकृत परीक्षा केंद्रावरून (आयटीआर) रविवारी सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी पार पाडण्यात आली असल्याचे संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या परीक्षा चाचणी दरम्यान सर्व उद्दिष्टे पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्व रडार्स, ट्रॅकिंग प्रणाली आणि रेंज केंद्रांकडून मोबाईल लॉंचरच्या मदतीने आकाशात झेपावलेल्या क्षेपणास्त्राच्या या उड्डाणाची सर्व माहिती व बारकावे टिपून घेतले. या क्षेपणास्त्राच्या कामगिरीचा मागोवा तसेच नोंद घेण्यासाठी ओडिशाच्या किनारपट्टीवर रडार्स आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल प्रणाली बसविण्यात आली होती. त्याच बरोबर लक्ष्याच्या परिसरात नौदलाच्या दोन नौकाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या.
स्वदेशी बनावटीचे आणि ४००० किलोमीटर अंतराचा पल्ला गाठण्याची क्षमता असलेले हे अग्नी-4 क्षेपणास्त्र एक टू स्टेज मिसाईल आहे. याची लांबी २० मीटर असून वजन सुमारे १७ टन आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या क्षेपणास्त्रामध्ये उच्च दर्जाची विश्वासार्ह्यता आणि अचूकता आणण्यासाठी यात अनेक आधुनिक उपकरणे बसविण्यात आली असल्याची माहिती DRDO च्या सूत्रांनी दिली. यात फिफ्थ जनरेशन ऑन बोर्ड कम्प्युटर बसविण्यात आलेला असून अवकाशात असताना कोणत्याही अडथळ्याच्या प्रसंगी स्वतःचा मार्ग निश्चित करण्याचे अत्याधुनिक वैशिष्ठ्य देखील यात आहे.
अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत विश्वासार्ह्य मानल्या जाणाऱ्या मायक्रो नेव्हिगेशन सिस्टीम वर आधारित अश्या रिंग लेझर गायरो बेस्ड इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम (RINS) च्या समावेशामुळे या क्षेपणास्त्रास अचूक लक्ष्यभेद करणे सहजशक्य होणार आहे.
यावर असलेले उष्णतारोधक आवरण ४००० डिग्री सेंटीग्रेड पर्यंत उष्णता सहन करून आतील तापमान ५० डिग्रीवर ठेऊ शकते. त्यामुळे उच्च तापमानातही यात बसविलेली उपकरणे नियमितपणे कार्य करू शकतील.
आतापर्यंत अग्नी १, अग्नी २, अग्नी ३ आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रांचा समावेश भारतीय लष्करात झालेला आहे. या सर्व क्षेपणास्त्रांमुळे भारताची संरक्षणसिद्धता नक्कीच वाढलेली आहे.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: TOI
Nuclear-capable Agni-IV missile successfully test-fired.